आत्माराम पाटील यांचा अनुभवसिद्ध शेती प्रवास

आत्माराम पाटील यांचा अनुभवसिद्ध शेती प्रवास

कापडणे (ता.जि.धुळे) येथील आत्माराम पाटील यांनी कोरडवाहू शेतीपासून केलेली सुरवात अथक परिश्रमातून बागायतीत रूपांतरित केली. अनेक वर्षांच्या अनुभवातून कांदा शेतीत हुकूमत तयार केली. बाजारातील चढउतार लक्षात घेऊन कांदा चाळ उभारली. बाजारपेठांचा अभ्यास करून कांदा विक्रीचे नियोजन केले. उमराणी बोरे, लिंबू व भाजीपाला शेतीतही यश मिळवले. आज त्यांची मुले समर्थपणे शेतीची जबाबदारी पेलताहेत.  

धुळे  शहरापासून सुमारे १५ किलोमीटरवरील कापडणे गावात सिंचनाच्या ठोस सुविधा नाहीत. दुष्काळी स्थितीने विहिरींची पाणीपातळी घटली आहे. मध्यम, काळी कसदार शेती या भागात आहे. येथील आत्माराम बळीराम पाटील यांची २५ एकर शेती आहे. पत्नी सौ. रंजना, मुले संदीप व नरेंद्र यांची त्यांना भक्कम साथ त्यांना आहे. आत्माराम हे शदर जोशी प्रणित शेतकरी संघटत सुमारे १९८० पासून कार्यरत आहेत. चळवळीनिमित्त गावोगावी फिरणे, दौरे व्हायचे. त्या वेळेस रंजना घर आणि शेतीचा समर्थपणे कारभार पाहायच्या. 

पीकपद्धतीची घडी 
पाटील यांनी पिकांचे अर्थशास्त्र ओळखून आपल्याला फायदेशीर ठरू शकेल अशा पिकांची निवड केली.या भागात उमराण बोरे प्रसिद्ध आहे. त्याची पाच एकरांत लागवड आहे. तीन एकरात लिंबू आहे. पैकी दोन एकरांत १८ एकर जुना लिंबू आहे. त्यातील झाडांची संख्या मर व अन्य समस्येमुळे कमी झाली. सुमारे २५ वर्षे जुनी चिकूची बाग आहे, तर ४० ते ५० वर्षांपासून कांदा पिकातील अनुभव आहे. 

कांदा पिकात हुकूमत 
अनेक वर्षांपासून कांदा घेत असल्याने त्यात पाटील यांनी हुकूमत मिळवली आहे. दरवर्षी खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तीनही हंगामात कांदा असतो. दर व हवामान यांचा अंदाज घेत सुमारे पाच ते आठ एकर क्षेत्र असते. एक ते दीड एकर कांदा बीजोत्पादन घेतात. घरच्या शेतीसाठी वापर होऊन उर्वरित एक ते सव्वा क्विंटल लाल कांद्याच्या बियाण्याची घरूनच विक्री होते. शेतकरी घरी येऊन प्रचलित दरात खरेदी करतात. राजगुरुनगर (जि.पुणे) येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन संचालनालयातून कांद्याचे वाण आणले आहे. चार एकरांत पांढरा तर चार एकरांत लाल कांदा असे सर्वसाधारण नियोजन असते. उन्हाळी कांद्याचे एकरी १० टन तर अन्य हंगामाचे ४ ते ५ टनांपर्यंत उत्पादन मिळते.  

चाळ उभारल्याचा फायदा 
एप्रिलमध्ये चाळीत भरलेला कांदा ऑक्‍टोबर, नोव्हेंबरपर्यंत साठविण्यात येतो. चाळीची ४०० क्विंटल क्षमता आहे. लोखंडी दांडे, पत्रे, हवा खेळती राहण्यासाठी तारांच्या मजबूत जाळीचा वापर असे चाळीचे स्वरूप आहे. चाळीत साठवून योग्य वेळी विकल्याने मागील दोन वर्षे १२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळविणे शक्य झाले. सध्या २०० क्विंटल कांदा चाळीत आहे. दोन टप्प्यांत साठविलेल्या कांदा विक्रीचे नियोजन आहे. उन्हाळ्यातील अतिरिक्त कांदा नरेंद्र व संदीप स्वतः ट्रॅक्‍टर किंवा मालवाहू वाहन घेऊन खेडोपाडी जाऊन विकतात. बाजारपेठांचा सतत अभ्यास हे पाटील यांचे वैशिष्ट्य आहे. मध्य प्रदेशातील इंदूर येथील बाजारालाही प्राधान्य दिले जाते. माल वाहतुकीसाठी ट्रॅक्‍टर आहे. 

लिंबू, बोर, भाजीपाला 
सन १९९४ पासून भाजीपाला (कोबी, टोमॅटो, काकडी) घेतात. सिंचनासाठी दोन कूपनलिका, एक विहीर आहे. तीन सालदार दरवर्षी असतात. उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने लिंबू, बोरांत रासायनिक निविष्ठांचा वापर जवळपास टाळतात. या बागेत नांगरणी केली जात नाही. फुले सरबती लिंबू वर्षभर उत्पादन देत राहतो. लिंबू, चिकू यांची धुळे, शहादा येथील बाजारात विक्री होते. बोरे व्यापारी थेट शेतात येऊन खरेदी करतात. कापसाचे एकरी किमान आठ ते १० क्विंटल उत्पादन घेतात. 

आत्मविश्‍वासातून नियोजन 
सन १९८० ते ८५ या काळात दुष्काळीस्थिती होती. तेव्हा पाच एकर कोरडवाहू शेती होती. त्या वेळी नाईलाजाने नाशिक येथे आत्माराम यांनी काही काळ खासगी संस्थेत चालकाची नोकरी केली; पण मन रमले नाही. वडिलांनी घरीच बोलावून घेतले. पुन्हा नव्या आत्मविश्‍वासाने शेती सुरू केली. विहीर खोदली. पुढे शेतीतील उत्पन्नावर शेती विकत घेतली. पाच एकरांत काटेरी झुडपे, गवत उगवायचे. हे क्षेत्र विकसित करून ते फुलविले. त्यात बोरांची शेती होते. टोमॅटो विक्रीसाठी इंदूरला जायचे. टोमॅटो साठवायला क्रेट नव्हते. तेव्हा देशी कापसाच्या पऱ्हाटीपासून मोठे टोपले तयार करून त्याचा वापर व्हायचा. इंदूर, शहादा (जि. नंदुरबार) येथील बाजारातही मिळेल त्या मालवाहू गाडीने जावे लागे. आजघडीला सर्व प्रयत्नांतून २५ एकरांपर्यंत शेती विस्तारली आहे. शेतकरी संघटनेचे मुख्य कार्यही सुरू असल्याने दोन्ही मुले शेतीची जबाबदारी चोख सांभाळतात. 

 : आत्माराम पाटील, ९४०४५७५२६७, ९४२०७०४६४७ 
 : नरेंद्र पाटील, ९५८८४१३४७७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com