लेअर पोल्ट्रीधारकांसाठी कानमंत्र

सोमवार, 15 एप्रिल 2019

महाराष्ट्रात लेअर (अंडी) पोल्ट्री युनिट्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यात पाचशे ते वीस हजार पक्षी क्षमतेच्या युनिट्सचे प्रमाणही लक्षणीय आहे.

महाराष्ट्रात लेअर (अंडी) पोल्ट्री युनिट्सची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यात पाचशे ते वीस हजार पक्षी क्षमतेच्या युनिट्सचे प्रमाणही लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर, पुणेस्थित ज्येष्ठ पोल्ट्री उद्योजक, भैरवनाथ पोल्ट्री फार्म्स कंपनीचे चेअरमन श्याम भगत यांनी नव्या व लहान आकाराच्या लेअर पोल्ट्रीधारकांसाठी काही बेसिक्स शेअर केले आहेत. त्यातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे -

चार-सहा दिवसांचे उत्पादन स्टॉक करता येतील इतके ट्रे जवळ असणे गरजेचे आहे. अनेकदा ट्रे नसल्याने व्यापारी म्हणेल त्या दराला माल विकावा लागतो.

लेअर पोल्ट्रीत रोज पैसा येतो. पण त्यातील उत्पादन खर्च वजा जाता आपला पैसा किती याचे नेमके गणित काढता आले पाहिजे. पुरेसे खेळते भांडवल हाती नसले तर माल विकण्यासाठी आपोआप दबाव वाढतो.

पेपर रेटच्या तुलनेत ४० ते ५० पैशापर्यंत रेट तोडून विकण्याचे प्रकार वाढत आहेत. आवश्यकता नसताना असे अंडरकटींग करून माल विकण्यामागे अनेकदा ट्रे नसणे, खेळते भांडवल नसणे अशी कारणे आढळतात.

वरील गोष्टींवर लक्ष देऊन धंद्यावर नियंत्रण ठेवावे.

मध्यम आकाराच्या युनिट्सधारकांसाठी  
आधी धंदा माहिती करून घ्या. त्यासाठी काही  वर्ष द्यावी लागतात. लेअर पोल्ट्रीचा धंदा हा पाचशे   ते हजार पक्षी युनिट्स मधूनच समजतो. पाचशे पासून ५० हजार पक्षी क्षमतेचा पल्ला गाठणे यात खरी   प्रगती आहे. एकदम ५० हजाराचे युनिट सुरू केले आणि धंद्याची समज नसली तर अडचणीत येऊ शकता.

मोठ्या युनिट्समधे तुम्ही स्वत: मॅनेजमेंट करत असाल तर फायद्यात राहण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र, स्वत: काम करायचे नाही व व्यवस्थापकही ठेवणे परवडत नाही, अशी स्थिती असेल, तर युनिट फायद्यात येणे अवघड होते. लेअर पोल्ट्री हा पूर्ण वेळ जॉब आहे. अर्धवेळ नाही.