vertical_farming
vertical_farming

वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म ठरतील पर्याय

भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी व्हर्टिकल फार्म हा पर्याय योग्य असून, तो स्वीकारण्यासाठी उशीर करून चालणार नाही, असे मत भारतीय आर्किटेक्ट रुतूशा कापीनी यांनी व्यक्त केले. त्यांनी अत्याधुनिक व्हर्टिकल फार्मचे आरेखन केले असून, बंगळुरू येथे प्रकल्प उभारणीच्या दिशेने कार्यवाही सुरू केली आहे. सर्व प्रयत्न योग्य पद्धतीने कार्यान्वीत झाल्यास, भारतातील हा पहिला व्हर्टिकल फार्म ठरण्याची शक्यता आहे.

२०५० पर्यंत जगाची लोकसंख्या ९ अब्जापर्यंत पोचलेली असेल, आणि त्यातील ७० टक्के लोक हे शहरात राहणारे असतील, असा एक अंदाज आहे. या लोकांच्या आहाराच्या समस्या सोडवण्यासाठी किमान वाहतुकीसह किमान जागेमध्ये शेती करण्याच्या पद्धतीला चालना देण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच भविष्यात व्हर्टिकल फार्मिंगला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. सध्याच्या पारंपरिक पद्धतीमध्ये शेतीचे क्षेत्रफळ वाढण्याला मर्यादा येत आहे. अल्पभूधारकांचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी उभ्या शेतीशिवाय पर्याय नसल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

२३ वर्षीय रुतूशा नागराज कापीनी यांनी ‘दि ऑक्सफोर्ड स्कूल ऑफ आर्किटेक्श्चर’ येथून पदवी मिळवली. अभ्यासादरम्यान ‘व्हर्टिकल फार्मिग’ हा तिच्या प्रबंधाचा विषय होता. या प्रबंधासाठी तिला दोन पुरस्कारही मिळाले. मात्र, अभ्यासातून वाढत्या महानगरातील लोकसंख्येसाठी ताजे अन्न आणि भाज्या पुरविण्यामध्ये येत असलेल्या समस्याही ज्ञात झाल्या. तिचे पालकही आर्किटेक्ट असल्याने २००८ मध्ये व्हर्टिकल फार्मिंग संदर्भात डॉ. डिक्सन डेस्पोम्मियर यांचे भाषण ऐकण्याचा योग आला. त्यातून तिला मिळालेल्या प्रोत्साहनामुळे तिने व्हर्टिकल फार्मिंग हा विषय निवडला होता. संकल्पना सुचल्यानंतर अधिक अभ्यास करण्यासाठी रुतुषाने सिंगापूर येथील स्काय ग्रीन हा व्हर्टिकल फार्म गाठला.

आरेखन आणि निर्मिती तंत्र :
या इमारतीमध्ये आवश्यक त्या वातावरणाची निर्मिती कृत्रिमरीत्या करण्यात येणार असल्याने त्यांचे आरेखन व निर्मिती ही अत्यंत महत्त्वाचे आहे.

प्रकाशाची व्यवस्था : शक्य तिथे सूर्यप्रकाशाची मदत घेतली जाते. त्याच प्रमाणे आवश्यक तिथे आरश्यांच्या साह्याने परावर्तन करून सूर्यप्रकाश पोचवला जातो. तरिही गरज भासल्यास उर्वरीत ठिकाणी कृत्रिम प्रकाशासाठी एलईडी लाईट वापरले जातात.
सिंचन व्यवस्था : पाणी आतमध्ये येण्यासाठी एक इनलेट असून, आतील पाण्याचा पुन्हापुन्हा वापर करणे शक्य होते. त्यामुळे बाह्य वातावरणाच्या तुलनेमध्ये केवळ पाच टक्के पाण्यामध्ये पाच पट अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते.
झाडांची व्यवस्था : रोपांच्या लागवडीसाठी सरकते किंवा आवश्यकतेनुसार जागा बदलणे शक्य असलेले प्लॅटफॉर्म तयार करण्यात येतील. या प्लॅटफॉर्ममध्ये पिकांनी घेतलेल्या पाण्याव्यतिरीक्त उर्वरीत पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था केली आहे. या पाण्याचा पुनर्वापर केला जातो.

उत्पादन :
शहराच्या ताज्या भाज्या व अन्य गरजा भागवणे, हाच मुख्य उद्देश आहे. त्यामुळे त्यात प्रामुख्याने फळे आणि भाज्यांचे उत्पादन घेतले जाईल. पहिल्या टप्प्यामध्ये टोमॅटो, वाटाणा, वांगी, तुळशी, पालक, पुदीना, फ्लॉवर, कांदा, भेंडी, काकडी, लिंबू, ब्रोकोली या सारखी पिके असतील.

प्रकल्पाचे स्थान :
संभावित इमारत ही लालबाग (बंगळुरू) येथील दहा एकर क्षेत्रामध्ये उभारण्यात येईल. त्यात दोन व्हर्टी फार्म असतील. त्याच बरोबरत प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र, स्थानिक बाजार आणि अन्य महत्त्वाच्या कारणांसाठी मोकळी जागा असेल. या साऱ्या उभारणीसाठी दोनशे कोटी इतका खर्च येण्याची शक्यता असून, गुंतवणूकदार व अन्य सर्व बाबींची पूर्तता झाल्यास हा भारतातील पहिला व्हर्टिकल फार्म असेल. हाच प्रकल्प तिने आपल्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही निवडला आहे.

सामान्य शेतकरी यात कुठे असेल?
बंगळुरू येथील लालबाग भागातील एका रिकाम्या जागेची निश्चिती केली. त्याला सरकारी मान्यता मिळवली. यातून सामान्य शेतकऱ्यांना फटका बसणार नाही, असा प्रश्न विचारता रुतुषाने सांगितले, की सामान्य शेतकऱ्यांनी हे तंत्र शिकून घेणे आवश्यक आहे. भविष्यामध्ये जमिनीचे क्षेत्रफळ आहे तेवढेच राहणार असल्याने तुकडे होत होते अत्यंत कमी जमीन शेतकऱ्यांकडे राहणार नाही. त्यामुळे अत्याधुनिक शेतीकडे वळण्याशिवाय पर्यायच राहणार नाही. या उद्देशाने लहान शेतकऱ्यांच्या मोफत प्रशिक्षणासाठी व्यवस्था करण्यात येतील. बाह्य वातावरणातील अस्थिरतेमुळे उत्पादनामध्ये प्रचंड घट होते, हे धोके यातून टाळता येईल. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन व उत्पन्न मिळवणे शक्य होईल, अशी आशा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com