कृषी विभागाच्या लेखी ‘भुईमूग’ केवळ ४१७ हेक्टरवर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Agriculture Department Peanuts only 417 hectares Sowing record

कृषी विभागाच्या लेखी ‘भुईमूग’ केवळ ४१७ हेक्टरवर!

अकोला : जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरी क्षेत्राच्या तुलनेत २१५ टक्के म्हणजे सहा हजार १५२ हेक्टरवर उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी झाली होती. यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग पेरणी केली. मात्र, ७ मार्च पर्यंत जिल्ह्यात केवळ ११ टक्के म्हणजे ४१७ हेक्टरवरच उन्हाळी भुईमूगाची पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे.जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात सतत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने खरीप तसेच रब्बीत चांगली ओल मिळाली. शिवाय भूजल पातळीतही वाढ झाल्याने उन्हाळी हंगामासाठी सुद्धा पोषक स्थिती उपलब्ध झाली.

त्यामुळे गेल्या दोन वर्षात जिल्ह्यातील बहुतांश भागात उन्हाळी पिकांचे क्षेत्र वाढले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उन्हाळी भुईमूग, कांदा, तीळ या पिकांचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. त्यातही सर्वाधिक क्षेत्र भुईमूग पिकाने व्यापल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी सुद्धा जिल्ह्यात सात हजार ५३१ हेक्टरवर एकूण उन्हाळी पिकांची पेरणी झाली होती व त्यापैकी सर्वाधिक भुईमूग पिकाची सहा हजार १५२ हेक्टरवर पेरणी झाली होती. गत मोसमात सुद्धा चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा अधिक क्षेत्रावर उन्हाळी पीक लागवडीची शक्यता होती. बहुतांश भागात तसे चित्र सुद्धा दिसत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उन्हाळी ज्वारी, उन्हाळी सोयाबीन, उन्हाळी मूग, उन्हाळी करडई आणि उन्‍हाळी मुख्य पीक म्हणजे भुईमुगाची मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. परंतु, आश्‍चर्याची बाब म्हणजे कृषी विभागाकडे ७ मार्च २०२२ पर्यंत जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या केवळ २४ टक्के एकूण उन्हाळी पिकांची लागवड झाल्याची व त्यातही भुईमुगाची केवळ ११ टक्के म्हणजे ४१७ हेक्टरवर पेरणी झाल्याची नोंद आहे.

उन्हाळी भुईमूग, सोयाबीनवर शेतकऱ्यांचा भर

यावर्षी महाबीजद्वारे सुद्धा बीज उत्पादनाकरिता मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीन लागवडीवर भर देण्यात आला होता. शिवाय भुईमूगालाही पोषक स्थिती असल्याने यावर्षी जिल्ह्यात उन्हाळी सोयाबीन व भुईमूग लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याची माहिती शेतकरी तसेच व्यापारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे. या खालोखाल कांदा लागवड सुद्धा मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

नोंदीनुसार ७ मार्चपर्यंतची पेरणी

उन्हाळी पीक पेरणी (हे.)

  • भुईमूग ४१७

  • सोयाबीन १०८

  • मूग १५४

  • कांदा ३५०

  • भाजीपाला व इतर ७४

  • इतर गळीतधान्य २५

  • एकूण ११०३

Web Title: Agriculture Department Peanuts Only 417 Hectares Sowing Record Akola

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..