शेतीचे भविष्य - व्हर्टिकल फार्मिंग

Verticle-Farming
Verticle-Farming

सामान्यपणे शेतीमध्ये लागवड करताना आपण आडवे क्षेत्र मोजत असतो. पृथ्वीवरील जमिनीचे प्रमाण हे स्थिर आहे, त्यामुळे भविष्यामध्ये शेती उत्पादनामध्ये वाढ करायची असल्यास आडव्या क्षेत्राला मर्यादा आहेत. अशा वेळी अत्याधुनिक पद्धतीने उभ्या जागेचाही फायदा घेणे गरजेचे बनत जाणार आहे. थोडक्यात, व्हर्टिकल फार्मिंग हे शेतीचे भविष्य असणार आहे.

संपूर्णपणे बंदिस्त ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी कृत्रिमरीत्या प्रकाश, तापमान आणि अन्य आवश्यक घटकांचा वापर करण्याची बाबही आता तुलनेने नवी राहिलेली नाही. या शेतीमध्ये केवळ आडव्या जागेवर शेती करण्याऐवजी उभ्या जागेचा फायदा घेणे शक्य आहे. या उतरत्या पायऱ्या किंवा रॅकवर विविध माध्यमांमध्ये पिकांची वाढ करता येते. माध्यमामध्ये माती, केवळ पाणी (हायड्रोपोनिक्स) किंवा हवेमध्ये मुळांची वाढ करणे (एअरोपोनिक्स) या पद्धतींचा वापर करता येतो. या आधुनिक पद्धतींमुळे ज्या ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी अत्यंत अवघड वातावरण आहे, अशा ठिकाणीही पिकांची वाढ करता येते. त्यामुळे आजवर ज्या ठिकाणी शेती करणे शक्य नव्हते, अशा जागाही शेतीखाली आणता येतील. व्यक्तिगत किंवा सामुदायिक पातळीवर भाज्या किंवा औषधी वनस्पतींची वाढ व्यावसायिकरीत्या करता येईल.  

इतिहास

  • १९१५ मध्ये गिल्बेर्ट इल्लिस बॅले यांनी प्रथम व्हर्टिकल फार्मिंग ही संकल्पना मांडली, त्यावर आधारित त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले.
  • १९३० च्या पूर्वार्धामध्ये बर्केले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर प्रथम विल्यम फ्रेडेरिक गेरिक यांनी केला. 
  • १९८० मध्ये स्वीडिश शेतकरी अॅके ओल्सन यांनी व्हर्टिकल फार्मिंगसाठी खास सर्पिलाकार संरचना तयार केली. या संरचनेमुळे शहरामध्येही कमी जागेमध्ये शेती करणे शक्य होईल, असा त्यांचा दावा होता.
  • सध्याच्या आधुनिक व्हर्टिकल फार्मिंगची संकल्पना १९९९ मध्ये कोलंबिया विद्यापीठातील सार्वजनिक आणि पर्यावरणीय आरोग्य विषयाचे प्रो. डिकसन डेस्पोम्मियर यांनी मांडली. यामुळे शहरी भागामध्ये आवश्यक ताजी फळे, भाज्या यांचे उत्पादन घेणे शक्य आहे. त्यातून वेळ, पैसे, वाहतूक आणि मजूर यांमध्ये बचत शक्य आहे. 

भारतासाठी संधी

  • भारत हा फळे आणि भाज्यांच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर शेतीखालील क्षेत्र मर्यादित होत असताना भारतामध्येही व्हर्टिकल फार्मिंग हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. 
  • पूर्ण कृत्रिम वातावरणामध्ये पिकांची वाढ अत्यंत चांगली होते. पर्यायाने प्रतिएकर क्षेत्रामध्ये उत्पादनात काही पटींपर्यंत वाढ मिळत असल्याने गुंतवणुकीवरील परतावा उच्च असतो. 
  • ही शेती छतावर, बाल्कनी किंवा कोणत्याही बंदिस्त ठिकाणी करता येते. 
  • भारतामध्ये व्हर्टिकल फार्मिंगला मोठ्या संधी असून, हे क्षेत्र वेगाने वाढू शकते.       

व्हर्टिकल फार्ममध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान -
मातीरहित शेती (हायड्रोपोनिक्स) -
मातीशिवाय खनिजद्रव्ययुक्त पाण्यांमध्ये पिकांची वाढ करण्याच्या तंत्रज्ञानाला हायड्रोपोनिक्स असे म्हणतात. यामध्ये पिकांची मुळे ही अन्नद्रव्ययुक्त द्रावणामध्ये बुडालेली असतात. अनेक वेळा पिकांच्या मुळांना आधार मिळावा यासाठी वाळू, रेती, लाकडाचा भुस्सा यांसारख्या उदासीन माध्यमांचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे मातीतून येणाऱ्या किडी, रोगांना अटकाव करणे शक्य  होते. 

अॅक्वापोनिक्स -
यामध्ये मत्स्यपालन (अॅक्वाकल्चर) आणि मातीरहित शेती (हायड्रोपोनिक्स) या दोन तंत्रांचा समन्वय साधण्यात येतो. यात बंदिस्त प्रवाही यंत्रणा (क्लोज्ड लूप) असते. पाण्याच्या टाकीमध्ये मासे पाळले जातात. त्यांची विष्ठा व अन्य भागांमुळे पाण्यामध्ये अनेक अन्नद्रव्ये मिसळली जातात. यातील घन पदार्थ व अमोनियासारखे पिकांच्या वाढीसाठी अनावश्यक घटक जैविक गाळण यंत्रणेद्वारे वेगळे केले जातात. हे पाणी पिकांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्यातून अन्नद्रव्ये पिकांकडून शोषली गेल्याने शुद्ध झालेले पाणी पुन्हा मत्स्यपालनासाठी वापरता येते. माशांच्या टाकीमध्ये तयार होणारा कार्बन डाय-ऑक्साईड वायू हा पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. या पद्धतीमध्ये अत्यंत कमी पाण्यामध्ये पिकांचे आणि माशांचे असे दुहेरी उत्पादन घेता येते. 

आर्द्रतापूर्ण हवेमध्ये पिकांची वाढ  (एअरोपोनिक्स) -
पिकांच्या मुळांची वाढ आर्द्रतापूर्ण वातावरणामध्ये केली जाते. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये फवारणी किंवा तुषाराद्वारे दिली जातात. 

फायदे -

  • व्हर्टिकल फार्मिंगमुळे शेतीला विविध आयाम मिळतात. 
  • यामध्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक प्रकाश, आर्द्रता यासह प्रत्येक घटक कृत्रिमरीत्या पुरवला जातो. परिणामी उत्पादनामध्ये वाढ होते. 
  • एकापेक्षा अधिक मजल्यांवर किंवा रॅकवर पिकांची वाढ केली जात असल्याने उत्पादनात काही पटीने वाढ होते.  
  • पारंपरिक शेतीपेक्षा एक पाऊल पुढे हरितगृह तंत्रज्ञान आणि त्यापुढील पाऊल म्हणजे व्हर्टिकल फार्म असे म्हणता येईल. 
  • सध्या या पद्धतीचा वापर अळिंबी उत्पादन, चारा उत्पादन, स्ट्रॉबेरी उत्पादन, पालेभाजी (उदा. लेट्यूस, औषधी वनस्पती) उत्पादनासाठी केला जातो. 
  • बंदिस्त जागेमध्ये किंवा खराब जमिनी असलेल्या ठिकाणीही या पद्धती उपयुक्त ठरतात. 
  • वर्षभर किंवा बिगर हंगामातही भाज्यांचे उत्पादन घेणे शक्य आहे, त्यामुळे बाजारातील चढ्या किमतीला लाभ मिळू शकतो. 
  • यामध्ये पाण्यासह सर्व घटकांचा पुनर्वापर होतो, त्यामुळे कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन शक्य होते. 

आव्हाने 

  • अत्यंत काटेकोरपणे शेती करावी लागते, त्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची उपलब्धता ही समस्या ठरू शकते.
  • संरचना उभारणी, प्रत्येक आवश्यक घटकाच्या कृत्रिम पूर्ततेची यंत्रणा, वातावरण नियंत्रण अशा सर्व घटकांचा विचार केल्यास प्राथमिक गुंतवणूक प्रचंड मोठी होते. 
  • देशातील परिस्थितीनुसार वातावरण नियंत्रणासाठी अधिक खर्च होऊ शकतो. 
  • यातून निर्माण होणारे सांडपाणी व अन्य टाकाऊ भागांची विल्हेवाट लावणे शहरी भागामध्ये अडचणीचे ठरू शकते. 

अशा आधुनिक तंत्रज्ञानामध्ये कार्यरत स्टार्टअप
भारतीय कृषी संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी व्हर्टिकल फार्मिंग तंत्रावर संशोधन सुरू केले आहे. 

  • पश्चिम बंगाल येथील बिधना चंद्र कृषी विश्वविद्यालय येथील शास्त्रज्ञांनी हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने वांगी आणि टोमॅटोचे व्हर्टिकल फार्म यशस्वी केले आहेत. 
  • पंजाबमध्ये बटाटा बीजोत्पादनासाठी एअरोपोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर शास्त्रज्ञांनी केला आहे. 
  • बेंगळुरू येथील स्टार्टअप ग्रोनोपिया यांनी स्वयंचलित सिंचन होणारी कुंडी तयार केली असून, त्याचा वापर व्हर्टिकल फार्मिंगसाठी होऊ शकतो. 
  • मुंबई येथील यू फार्म टेक्नॉलॉजीज या स्टार्टअपने हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानातून अपार्टमेंट किंवा फूड मार्केटमध्ये उत्पादनयोग्य प्रमाणित फार्म तयार केला आहे.

महादेव काकडे, ७८७५५५९३९१ (व्यवस्थापक - संशोधन, एसबीआय ग्रामीण बॅंकिंग, हैदराबाद)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com