खानू गावाची सेंद्रिय शेतीत आश्‍वासक वाटचाल 

black-rice
black-rice

सेंद्रिय शेती व त्यातून उत्पादित फळे, भाज्यांना बाजारपेठेत असलेली मागणी लक्षात घेऊन शेतकरी या शेती पद्धतीकडे वळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खानू हे सेंद्रिय गाव बनविण्यासाठी पावले उचलली जात आहेत. शेतीचे प्रमाणीकरणही करण्यात येणार असल्याने त्यास बाजारपेठ मिळणे सुकर होणार आहे.

सेंद्रिय शेतीला व त्यातून उत्पादित शेतमालाला मागणी वाढत आहे. काळाची गरज ओळखून खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील खानू गावही सेंद्रिय शेतीकडे वळले आहे. गावचे एकूण क्षेत्र ९९८ हेक्टर आहे. आंबा, काजूसह पारंपरिक पद्धतीने भाताची लागवड केली जाते. त्यानंतर दुबार पीक म्हणून काही शेतकरी भाजीपाला लागवड करतात. पाण्याचा अभाव असल्यामुळे ते क्षेत्र कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यातच शेती  केली जाते. 

मनरेगा योजनेतून २०१५ मध्ये गावात काजूची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. शासनाच्या कृषी विकास योजनेंतर्गत गावात गट स्थापन करण्यासाठी तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी गावातील प्रगतशील शेतकरी संदीप कांबळे यांच्याशी चर्चा करून त्यांना विभागीय स्तरावर प्रशिक्षित केले. हळूहळू गाव सेंद्रिय बनविण्यासाठी पावले उचलण्यात आली. पुणे येथील एका संस्थेशी संपर्क साधण्यात आला. ही संस्था सेंद्रिय शेतीतील  सहभागीता हमी पध्दत प्रमाणपत्र देते. ते मिळाल्यानंतर देशभरात आपला माल विकणे सोपे होते. 

प्रमाणीकरण केले 
गावातील सुमारे २९३ शेतकरी सेंद्रिय शेती व प्रमाणीकरणात सहभागी झाले आहेत. बंगळूर येथील संस्थेकडून तृतीय पक्ष प्रमाणीकरणासाठी यंदा तिसऱ्या वर्षी तपासणी केली जाणार आहे. गावातील सुमारे २०२ हेक्टरवरील आंबा, काजू बागायतीसह भात, भाजीपाला शेतीसाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर केला जात आहे. शेतकऱ्यांनी मातीचे परिक्षण करून घेतले आहे. महात्मा गांधी रोजगार हमी ग्रामीण योजनेंतर्गत कंपोस्ट खत निर्मितीचा ग्रामपंचायतीत ठराव संमत झाला. त्यानुसार घरातील ओला व सुका कचरा, परसदारातील पालापाचोळ्यापासून कंपोस्ट खत तयार केले जात आहे. गावात जैवविविधता समिती असून वृक्षतोडीसाठी शंभर टक्के बंदी केली आहे. शेण, गोमूत्र, पीठ, गूळ यांच्या मिश्रणातून जीवामृत तयार केले जाते. दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते. 

खानू गावाविषयी
खानू गावचे क्षेत्र सुमारे एकहजार हेक्टर व लोकसंख्या सुमारे अठराशे आहे. गावात सुमारे ५०० गायी, तर ६५ पर्यंत  म्हशी आहेत. भात शेतीसाठी भाजावळ करण्याची परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यास ६० टक्के यश आले आहे. गावात शासकीय रोपवाटिका असून तेथे सेंद्रिय पद्धतीने  आंबा, काजू तसेच अन्य वन्य मिळून ७० हजारांहून रोपे तयार केली जातात. लाल भात हे पारंपरिक पीक असून काळा भात बंगळूरहून मागविण्यात आला. गेल्या वर्षी त्याची यशस्वी लागवड केली. दोन्ही भात चवीला अप्रतिम आहेत. लोह, जीवनसत्त्व यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. खिरीसाठी तसेच आजारपणात मऊ भात म्हणून त्यांचा सर्वाधिक वापर केला जातो. पचायला चांगला असल्यामुळे त्यास सर्वाधिक मागणी आहे. तो सुमारे १४० दिवसांत तयार होतो. 

गाव सेंद्रिय करण्यासाठी पाच वर्षे प्रयत्न सुरू आहेत. प्रमाणीकरण करण्यात येत आहे. गावकरीदेखील सेंद्रिय घटकांचा वापर करू लागले आहेत. त्यामधून चांगले उत्पादन मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न  आहे. 
- अनिल कांबळे, ग्रामस्थ  ९६६५२४९७७६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com