दूध गुणवत्तेसह प्रक्रिया, थेट विक्री

गोपाल हागे
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

‘शेतकरी’ नावाने थेट मार्केटिंग

  • दुबे यांनी ग्राहकांची मानसिकता जाणली. त्यानुसार आपल्या दुधाचे मार्केटिंग आक्रमक पद्धतीने केले. ‘शेतकरी’ असे डेअरीला नाव दिले. पाणी नसलेले तसेच जनावरांना इंजेक्शन दिल्याशिवाय मिळणारे सकस दूध असा प्रचार करण्यास सुरवात केली. गुणवत्तापर्ण दुधाबाबत ग्राहकांमध्ये विश्‍वासाहर्ता तयार केली. दुधाचे फॅट सुमारे साडेसात पर्यंत असते. 
  • अकोला शहरातील शासकीय डेअरीच्या बाजूला एक जागा त्यांना मिळाली आहे. तेथे सकाळी आणि संध्याकाळी थेट ग्राहक विक्री करण्यात येते. 
  • दोन्ही वेळचे मिळून दररोज ६०० लिटर दूध संकलन होते. पैकी ५०० लिटर दुधाची थेट विक्री होते. 
  • गायीचे असो वा म्हशीचे ग्राहकांना हे उच्च दर्जाचे दूध अवघ्या ५५ रुपये प्रति लिटर दराने मिळते. 
  • हेच दूध खासगी डेअरीमध्ये ६० ते ६५ रुपये प्रतिलिटर दराने विक्री केले जाते.  
  • शंभर लिटर दुधापासून दररोज खवा, पनीर, पेढा, दही, तूप, रसमलाई, बंगाली बर्फी असे पदार्थ तयार केले जातात. त्यांची विक्रीही जागेवरच काचबंद पेटीद्वारे होते. 
  • उर्वरित दूध शासकीय डेअरीला देण्यात येते.

म्हैसपूर (ता. जि. अकोला) शहरातील विजय दुबे यांनी सुमारे ६० दुभत्या जनावरांचे संगोपन करून आपल्या दुग्ध व्यवसायाचे विस्तारीकरण केले आहे. सातत्य, चिकाटी, परिश्रम, गुणवत्ता यांच्या जोरावर दररोज पाचशे लिटर दुधाची विक्री, त्यासोबतच प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्मिती आणि थेट ग्राहकांना विक्री या माध्यमातून त्यांनी व्यवसायाची उलाढाल वाढवत तो फायदेशीर केला आहे.

काही वर्षांपूर्वी थ्री इडियट्स नावाचा हिंदी चित्रपट आला होता. म्हैसपूर (ता. जि. अकोला) येथील विजय दुबे यांना हा चित्रपट इतका आवडला की लागोपाठ चार ते पाच वेळा त्यांनी तो पाहिला. या चित्रपटाचा नायक आपल्याला जे काम आवडते ते मनापासून करा, त्यातच करिअर शोधा असा सल्ला देतो. नेमके हेच वाक्य दुबे यांना आपला दुग्ध व्यवसाय यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे ठरले.  

एका गायीपासून सुरवात
सन २०११ मध्ये केवळ एका गायीपासून दुबे यांनी दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. सुरवातीच्या टप्प्यात संकलित होणारे दूध खासगी डेअरीला दिले जायचे. खासगी डेअरीचालक त्यांच्या पद्धतीने दर ठरवायचे. शिवाय खरेदी दुधाचे चुकारे कधी दहा दिवस, कधी पंधरा दिवस तर कधीकधी महिनामहिना हाती पडायचे नाहीत. यातून मार्ग शोधला पाहिजे असे विजय यांना वाटायचे. 

व्यवसायाचे विस्तारीकरण  
दुबे यांनी मग स्वतः दूध विक्री करण्याकडे लक्ष घातले. दुसरीकडे गोठ्यातील जनावरांची संख्याही सातत्याने वाढवत नेली. आज त्यांच्याकडे सुमारे ३५ म्हशी आहेत. राजस्थानमधील नागोरी भागातून त्या आणल्या आहेत. त्याचबरोबर २५ गायी हरिसाल जातीच्या आहेत. अकोला भागात तापमान अधिक असते. त्या वातावरणाला या जाती अनुकूल आहेत. त्यांची दूध देण्याची क्षमता व सातत्य टिकून असल्याचे दुबे सांगतात. 

रोजची समाधानकारक विक्री 
दुबे म्हणाले की दुधाव्यतिरिक्त आमच्या प्रक्रियायुक्त पदार्थांनाही चांगली मागणी आहे. पनीर दररोज सात ते आठ किलो, तूप महिन्याला ५० किलो तर मिठाई दररोज १० ते १५ किलो असा खप होतो. तुपाचा दर सातशे रुपये प्रति किलो आहे. दही मातीच्या हंडीत लावण्यात येते. त्याला ग्राहकांकडून चांगली मागणी असते. त्याचा शंभर रुपये प्रति किलो दर आहे. महिन्याला सुमारे आठ ते नऊ लाख रुपये उलाढाल करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. 

शेतीलाही बनविले सुपीक 
दुबे यांची सुमारे २५ एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतीत ते आपल्याकडील शेणखताचा वापर करतात. जनावरांना दररोज हिरवा चारा मिळावा यासाठी सहा एकरात गवतवर्गीय तर चार एकरात मक्याची लागवड केली आहे. हिरवा चाऱ्यासाठी सिंचनाची सोय व्हावी म्हणून शेतात १९ ठिकाणी बोअर्स घेतले. मात्र कुठेही पाणी मिळाले नाही. आता एक एकर शेतात तळे उभारले आहे. 

सर्व सुविधांनी युक्त गोठा 
अकोल्यापासून जवळच असलेल्या म्हैसपूर शिवारात दुबे यांचा हा गोठा आहे. १०० बाय ५० फूट आकाराचे एक व ५० बाय २० फूट आकारचे गायींसाठी पक्के शेड बांधले आहे. जनावरांना हव्या असलेल्या सर्व सुविधा त्यांनी उभारल्या आहेत. उष्णतेच्या काळात थंडावा देण्यासाठी फॉगर्स सोबतच कुलर्स लावले आहेत. जनावरांच्या पायाखाली रबरनेट आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. गोठ्याची दिवसातून दोन वेळा दररोज पाण्याने स्वच्छता केली जाते. दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो. ‘आत्मा’ यंत्रणेच्या माध्यमातून दुबे यांनी गुजरात राज्यातील आणंद येथे प्रशिक्षण दौऱ्यातही सहभाग घेतला आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या गोठ्यांची पाहणी केल्यानंतर या सुविधा करणे शक्य झाले. दूध व पदार्थ साठविण्यासाठी तीन वेगेवगेळ्या क्षमतेचे बल्क कूलर्स आहेत. वाहतुकीसाठी दोन चारचाकी वाहने आहेत. 

अकरा जणांना रोजगार
बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम दुबे ११ वर्षांपासून करताहेत. जनावरांचे व्यवस्थापन, दूधविक्री, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती अशी सर्व कामे करण्यासाठी अकरा मजूर तैनात आहेत. मजुरांच्या वेतनासाठी  महिन्याला सुमारे एक लाख रुपये खर्च होतो. मजुरांशिवाय स्वतःसह कुटुंबातील सर्व सदस्यही राबतात. विजय यांना पाचवीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. मात्र आपले शिक्षणाचे अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुलांना अकोला शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल केले आहे.

विक्रीची दुसरी शाखा 
सातत्याने दर्जा टिकवल्याने व्यवसायातील उत्पन्न वाढून शहरात स्वतःचे विक्री केंद्र सुरू करणे दुबे यांना शक्य झाले आहे. लवकरच हे केंद्र कार्यान्वित होणार आहे. याला तुम्ही आमची दुसरी शाखा समजा असे दुबे म्हणाले. 

- विजय दुबे, ९९२१४१५३५६


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Agro