शेती, पूरक उद्योगातून साधली प्रगती 

विनोद इंगोले 
सोमवार, 13 मार्च 2017

उत्पन्नाचा शाश्‍वत पर्याय नसल्याने कधीकाळी रोजगाराच्या शोधार्थ सातत्याने भटकंती करावी लागणाऱ्या चक्रवर्ती कुटुंबाने साठविलेल्या पैशातून बच्छेरा (ता. पारशिवणी, जि. नागपूर) येथे शेती खरेदी केली. संत्रा, मोसंबी, तूर, भाताचे पीक घेत शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्याचा प्रयत्न चंद्रकला चक्रवर्ती यांनी केला आहे. 

पारशिवणी तालुक्‍यातील बच्छेरा हे आदिवासीबहूल गाव. गट ग्रामपंचायत चारगाव अंतर्गत या गावाचा समावेश होतो. या गावापासून ४० किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेशची सीमा आहे. याच गावातील चंद्रकला चक्रवर्ती यांनी किफायतशीर शेतीचा पॅटर्न रुजविला. मध्य प्रदेशातील बरेला हे चंद्रकलाताईंचे सासर, तर नागपूर माहेर. सासरी बरेला येथे शेती नसल्याने रोजगाराच्या शोधार्थ पती रेवाराम आणि मुलांसह चंद्रकलाताईंची भटकंती सुरू होती. रोजगाराच्या शोधार्थ १९६५ च्या दरम्यान चक्रवर्ती कुटुंब पारशिवणी परिसरात आले. पेंच धरणाच्या कामास त्या वेळी सुरवात झाली होती. त्या ठिकाणी काम मिळेल, या उद्देशाने ते पोचले. त्यानंतर याच परिसरात या कुटुंबाने कायमचे वास्तव्य केले. 

मजुरीच्या कामातून घेतली शेती 
रेवाराम तसेच चंद्रकलाबाई हे दोघेही मजुरीकामावर राबत. त्यासोबतच इतर वेळी मातीच्या पणत्या, दिवाळीसाठी लक्ष्मीच्या मूर्ती, गणपती मूर्ती तयार करण्याचे काम चक्रवर्ती कुटुंब करते. यातून शिल्लक राहिलेल्या पैशांतून या कुटुंबाने बच्छेरा गावात सुरवातीला तीन एकर शेती विकत घेतली. या जमिनीमध्ये त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांचा सल्ला घेत संत्रा लागवड केली. शेतात असलेल्या विहिरीची पडझड झालेली असल्याने पुरेसे पाणी मिळत नव्हते. त्यामुळे चक्रवर्ती कुटुंबाने गावातील विहिरीवरून कळशीने पाणी आणत संत्रा कलमे जगविली. हळूहळू संत्रा बागेतून फळांचे उत्पादन सुरू झाले. फळांची विक्री स्वतः करणे शक्य नसल्याने त्यांनी ही फळबाग व्यापाऱ्यांना विकली. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी नागपूर बाजारपेठेत संत्रा विक्रीला सुरवात केली, त्यामुळे नफ्यात चांगली वाढ झाली. 

टप्प्याटप्प्याने शेतीत वाढ 
गेल्या काही वर्षांतील आर्थिक बचत आणि कुटुंबाच्या कष्टातून चक्रवर्ती कुटुंबाने टप्प्याटप्प्याने जमीन विकत घेतली. आज नऊ एकर जमीन कुटुंबाकडे आहे. सध्या फळबागेचा विचार करता ४०० संत्रा झाडे आणि मोसंबीची ५० झाडे आहेत. सन २००८-०९ मध्ये दीड हेक्‍टरवर त्यांनी कृषी विभागाच्या रोहयो योजनेतून नवीन संत्रा फळबाग केली. मृग बहरातील संत्र्याच्या उत्पादनावर त्यांचा भर आहे. गेल्यावर्षी मात्र त्यांनी मृग आणि आंबिया बहरातील संत्र्याचे उत्पादन घेतले. दोन्ही बहरांतील संत्र्याच्या विक्रीतून अडीच लाख रुपये मिळाले. त्यासोबतच मोसंबी विक्रीतून ५० हजार मिळाले. शेतीच्या व्यवस्थापनात चंद्रकलाताईंना मुलगा राजेंद्र यांची मदत होते. फळ विक्री व्यवस्थापन मुलगा राजेंद्र सांभाळतो. चंद्रकलाताई शेतीसोबतच कुटुंबाचा परंपरागत मूर्ती, पणत्यानिर्मितीचा व्यवसायही सांभाळतात. शेती आणि कुंभार व्यवसायातील उत्पन्नाच्या जोरावर त्यांनी दोन मुलांना उच्चशिक्षण दिले आहे. 

संत्रा कलमे वाढीच्या टप्प्यात चंद्रकलाताईंनी तुरीचे आंतरपीक घेण्यास सुरवात केली. त्यांना तुरीचे एकरी सहा क्‍विंटल उत्पादन मिळते. यंदा दर कमी असल्याने तूर विकलेली नाही. चंद्रकलाताईंचा मुलगा राजेंद्र याने लगतच्या आदिवासीबहूल गावांतून यंदाच्या हंगामातून तुरीची नवीन जात आणली. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे दाणे टपोरे, चवीने गोड आहेत. या जातीची त्यांनी पहिल्यांदाच लागवड केली आहे. या जातीस प्रक्रिया उद्योगाकडून चांगली मागणी आहे. त्यामुळे दर चांगला मिळेल अशी त्यांना आशा वाटते. सुधारित पद्धतीने तूर लागवड आणि पीक व्यवस्थापनावर त्यांचा भर आहे. चंद्रकलाताईंकडे २० जनावरे आहेत. त्यापासून मिळणाऱ्या शेण व मूत्राचा वापर सेंद्रिय खतनिर्मितीसाठी केला जातो. 

कृषी विभागाच्या सहकार्याने चक्रवर्ती यांनी २००९- १० मध्ये ३० बाय ३० बाय ३ मीटर आकाराचे शेततळे घेतले. कूपनलिकेतील पाणी शेततळ्यात साठविले जाते. हे पाणी पाइपलाइनने एक किलोमीटरवरील दुसऱ्या शेतीत नेले आहे. 

तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेतीचे नियोजन - 
संत्रा आणि मोसंबी बागेच्या व्यवस्थापनासाठी चंद्रकला चक्रवर्ती यांना कृषी सहायक आर. जी. नाईक यांचे मार्गदर्शन मिळते. पावसाळा सुुरू होण्यापूर्वी व संपल्यावर अशी दोनदा झाडांच्या खोडांना बोर्डोपेस्ट लावली जाते. यामुळे डिंक्‍याचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले. फळबागेला शिफारशीनुसार खत व्यवस्थापन केले जाते. तूर लागवड करताना तज्ज्ञांच्या सल्ल्याने पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केली जाते. माती परीक्षणानुसार खतांची मात्रा दिली जाते. यानंतर रोप विरळणी, शेंडा खुडणे ही कामे टप्प्याटप्प्याने केली जातात. तज्ज्ञांच्या सल्ल्याने कीड-रोग नियंत्रणासाठी कीडनाशकाची फवारणी केली जाते. शक्यतो सेंद्रिय कीडनाशकांवर त्यांचा भर आहे. 
गावालगत असलेल्या तीन एकर शिवारात चंद्रकला चक्रवर्ती भात लागवड करतात. यंदा त्यांनी पाऊण एकरात हरियानावरून आणलेल्या सुगंधी भात जातीची लागवड केली. भात पिकाचे तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य व्यवस्थापन ठेवले. यातून त्यांना आठ क्विंटल भात उत्पादन मिळाले. घरूनच या सुगंधी तांदळाची विक्री केली जाते. सध्या त्यांना ६० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. थेट तांदूळ विक्रीचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे. 

शेतामध्ये प्रशिक्षणाचे आयोजन - 
चक्रवर्ती यांच्या शेतात हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी कृषी विभागाच्या वतीने परिसरातील शेतकऱ्यांसाठी विविध प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते. या प्रशिक्षणाला चंद्रकलाताई, त्यांचा मुलगा राजेंद्र यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतात. त्यातील माहितीचा अवलंब शेती व्यवस्थापनात करण्यावर त्यांचा भर असतो. 

संपर्क - राजेंद्र चक्रवर्ती - ८९७५७९७४५२ 
(छायाचित्रे - विनोद इंगोले) 
 

Web Title: agro farmers