सोयाबीन बियाणे यंदा स्वस्त

विनोद इंगोले
बुधवार, 19 एप्रिल 2017

खरेदी दर कमी असल्याने सोयाबीन बियाण्यांचे दर कमी करण्यात आले आहेत. ३० किलोची बॅग गेल्या वर्षी २०४० रुपयांना होती. या वर्षी प्रति किलो सोयाबीन बियाण्याचा दर ५७ रुपये प्रति किलो राहील. 
- रामचंद्र नाके, उपमहाव्यवस्थापक, विपणन

नागपूर : खरेदी दर कमी झाल्यामुळे यंदा सोयाबीन बियाण्यांच्या दरात घसघसीत सूट ‘महाबीज’ने जाहीर केली आहे. गेल्या वर्षी ६८ रुपये प्रति किलो दर असलेले बियाणे या वर्षी ११ रुपयांनी कमी करत बाजारात आणले जाणार आहे. शेतकऱ्यांना ते ५७ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होईल. 

बाजारातील सोयाबीनचे तीन महिन्यांचे सरासरी दर त्यावर २० टक्‍के बोनस त्यासोबतच प्रक्रिया खर्च या सर्व बाबींचा विचार बियाणे दर ठरविताना केला जातो. २०१५-१६ या वर्षात सोयाबीनचे दर चांगले होते. मे महिन्यात नागपूर बाजारात सोयाबीनने ४२०० रुपये प्रति क्‍विंटलचा पल्ला गाठला होता. त्यानंतर ३२०० ते ३९०० रुपयांपर्यंत सोयाबीनची विक्री झाली. सोयाबीन बाजार तेजीत असल्याने ‘महाबीज’लादेखील बाजारातील सरासरीच्या आधारे बियाणे खरेदी दर ठरवावा लागला होता.

या वर्षी सोयाबीन दरात घसरणीच्या परिणामी महाबीजला बियाणेदेखील कमी दरात मिळाले. त्यामुळे प्रक्रिया व इतर सर्व बाबी विचारात घेत महाबीजने या वर्षी सोयाबीन बियाणे गतवर्षीच्या दराच्या तुलनेत ११ रुपयाने कमी करीत ५७ रुपये प्रति किलोने पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाच लाख क्‍विंटल बियाण्यांचा होणार पुरवठा 
महाबीज राज्यात या वर्षी सुमारे ६ लाख ५३ हजार ५३१ क्‍विंटल बियाण्यांचा पुरवठा करणार आहे. त्यामध्ये मुख्यत्वे सोयाबीनचा समावेश राहील. पाच लाख २ हजार २८० क्‍विंटल सोयाबीन बियाण्यांचा राज्याला पुरवठा केला जाईल. या वर्षी इतरही बियाणे दर गतवर्षीच्या तुलनेत कमी राहणार आहे. 

Web Title: Agro Market situation for Soyabin farming