भारतातून ५५ लाख कापूस गाठी निर्यात

भारतातून ५५ लाख कापूस गाठी निर्यात

आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार परिषदेचा अंदाज; पेरणी क्षेत्रात वाढ

नागपूर - देशात यंदा कापूस लागवड क्षेत्रात ३५ ते ४० टक्‍के; तर महाराष्ट्रात १० ते ११ टक्‍के वाढीचा अंदाज आहे. वॉशिंग्टन येथील आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार परिषदेने (आयसीएसी) २५ जुलैला प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०१७-१८ च्या हंगामात भारतातून ५५ लाख गाठी कापसाची निर्यात होण्याची शक्‍यता आहे. 

२०१६-१७ या वर्षात देशात १०६ लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली होती. या वर्षी हे क्षेत्र १२० लाख हेक्‍टरपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. लागवड क्षेत्रानुसार गतवर्षी देशात ३३७.२५ लाख कापूस गाठीचे उत्पादन झाले होते. महाराष्ट्रात गतवर्षी ३९ लाख  हेक्‍टर कापूस लागवड होती. या वर्षी ४० लाख हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड होईल, असे कापूस क्षेत्रातील जाणकार सांगतात. महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत १५ ऑगस्टपर्यंत कपाशीची लागवड होते. त्यामुळे महाराष्ट्रात कपाशीचा पेरा गतवर्षीच्या तुलनेत १० ते ११ टक्‍के वाढेल; तर देशात लागवड क्षेत्र ३५ ते ४० टक्‍के वाढण्याचा अंदाज आहे.

पीकपरिस्थिती सर्वदूर चांगली
‘आयसीएसी’च्या माहितीनुसार २०१२-१३ या वर्षात भारतात ३७.७४ लाख गाठी, २०१३-१४ मध्ये ४०.५९६ लाख गाठी, २०१४-१५ मध्ये ३९.३७२ लाख, २०१५-१६ मध्ये ३४.४७६ लाख, २०१६-१७ मध्ये ३४.६८ लाख गाठींचे उत्पादन झाले. २०१७-१८ या वर्षात ३६.७८ लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. चीनमध्येदेखील गतवर्षीच्या २९.२२ लाख गाठींवरून या वर्षी ३०.१२ लाख गाठी उत्पादनाचा अंदाज आहे. पाकिस्तानमध्येही ९.९६ लाख गाठींवरून या वर्षी ११.७ लाख गाठींचे उत्पादन होईल, असा अंदाज आहे. पिकावरील कीडरोग तसेच इतर नैसर्गिक कारणामुळे उत्पादन प्रभावीत होऊ शकते. सध्या पीक वाढीच्या अवस्थेत असून पीकपरिस्थिती सर्वदूर चांगली आहे. तरीही आताच उत्पादन अंदाज बांधणे कठीण आहे, अशी माहिती कापूस विषयाचे तज्ज्ञ गोविंद वैराळे यांनी दिली. 

महाराष्ट्राची उत्पादकता कमी
देशाच्या एकूण लागवडक्षेत्रापैकी महाराष्ट्रात ३० टक्‍के क्षेत्र राहते; परंतु उत्पादकता गुजरात राज्याच्या तुलनेत कमी आहे. गुजरात राज्याची उत्पादकता २२ क्‍विंटल प्रतिहेक्‍टर कापूस; तर महाराष्ट्राची अवघी ११ क्‍विंटल प्रतिहेक्‍टर कापूस अशी आहे. 

गतवर्षीच्या तुलनेत देशाअंतर्गत कापसाखालील क्षेत्रात ३५ ते ४० टक्‍क्‍यांनी वाढ आहे. पिकाची अवस्था समाधानकारक असल्याने उत्पादन चांगले राहील. पाकिस्तानमध्ये पिकावर कीडरोगांचा प्रादुर्भाव असल्याने तेथील उत्पादकतेत घट होईल, अशी शक्‍यता वाटते.  
- विनीत मोहता, संचालक, जिमाटेक्‍स इंडस्ट्रीज, हिंगणघाट (वर्धा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com