जोखीम आणि नुकसानभरपाई

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

स्थानिक आपत्ती या जोखीमेत कशाचा समावेश होतो? शेतातल्या पिकाच्या गंजीला आग लागल्यास विमा संरक्षण मिळेल काय? वन्य प्राण्यापासून विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची तरतूद आहे का?

स्थानिक आपत्ती या जोखीमेत कशाचा समावेश होतो? शेतातल्या पिकाच्या गंजीला आग लागल्यास विमा संरक्षण मिळेल काय? वन्य प्राण्यापासून विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची तरतूद आहे का?

पुराचे पाणी शेतात शिरुन पिकाचे नुकसान होणे, गारपीट, भूस्खलन या स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपोटी वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येते. परंतु, वन्यप्राण्यांनी केलेलं नुकसान, पिकाला किंवा पिकाच्या गंजीला लागलेली आग, कीड-रोगाचा स्थानिक प्रादुर्भाव वा अन्य कारणामुळे झालेल्या पीक नुकसान झाल्यास स्थानिक आपत्ती या जोखीमेच्या अंतर्गत वैयक्तिक स्तरावर विमा संरक्षण  लागू होत नाही. जोखमीचा धोका घडेपर्यन्त पिकाच्या लागवडीसाठी झालेल्या निविष्ठा खर्चाच्या प्रमाणात नुकसान भरपाई विमा संरक्षित रक्कमेच्या अधिन राहून देण्यात येते. हंगामाच्या अखेरीस पीक कापणी प्रयोगाच्या माहितीच्या आधारे निश्चित होणारी नुकसान भरपाई ही स्थानिक नुकसान भरपाईपेक्षा जास्त असेल तर दोन्हींपैकी जी रक्कम अधिक असेल तेवढी भरपाईची रक्कम शेतकऱ्याला दिली जाते.  

अधिसूचित पिकाचे बाधित क्षेत्र हे विमा संरक्षित क्षेत्राच्या २५ टक्के पेक्षा जास्त असेल तर अधिसूचित क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी हे काढणीपश्चात नुकसान भरपाई मिळण्यास पात्र राहतील. विमा कंपनीमार्फत नमुना सर्वेक्षणाच्या आधारे (संयुक्त समितीने तयार केलेल्या) नुकसानीचे प्रमाण ठरविण्यात येईल. पीक पक्व होऊन १५ दिवसांत कापणीस तयार होणार असेल, तर स्थानिक आपत्ती या जोखीमेनुसार अंतरिम नुकसान न ठरवता पीककापणी प्रयोगाच्या सरासरी उत्पादनावर आधारित अंतिम नुकसान भरपाई निश्चित केली जाते.
 
पिकाच्या काढणीनंतर नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळते का?
कापणी करून केवळ सुकवणीसाठी शेतात पसरून ठेवलेल्या पिकाचे कापणीपासून जास्तीत जास्त २ आठवड्यांपर्यंत ( १४ दिवस) चक्रीवादळ, अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येते. जर अधिसूचित पिकाचे बाधित क्षेत्र हे विमा संरक्षित क्षेत्राच्या २५ टक्के पेक्षा जास्त असेल, तर अधिसूचित क्षेत्रातील सर्व पात्र शेतकरी हे काढणीपश्चात नुकसान भरपाई मिळण्यास पात्र राहतील. विमा कंपनीमार्फत नमूना सर्वेक्षणाच्या आधारे (संयुक्त समितीने तयार केलेल्या) नुकसानीचे प्रमाण ठरविले जाते. काढणीपश्चात नुकसान भरपाई शिवाय हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगावर आधारित प्राप्त होणाऱ्या सरासरी उत्पन्नाच्या आधारे निश्चित होणारी नुकसान भरपाई हीसुद्धा निकषानुसार निश्चित मर्यादेत देय होते.

जोखीम, नुकसान याबद्दल विमा कंपनीला कसे कळवावे लागते? बऱ्याच वेळेला त्यांचा टोल फ्री नंबर लागत नाही. 
स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची माहिती ४८ तासांच्या आत विमा कंपनी, संबंधीत बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री नंबरच्या माध्यमातून द्यावी. सगळ्यात पहिल्यांदा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा. टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास सदर आपत्तीची माहिती बँक, कृषी व महसूल विभाग यांना द्यावी. पुढील ४८ तासांमध्ये विमा हप्ता भरल्याचा पुरावा विमा कंपनीला सादर करावा. 
स्थानिक आपत्तीचा पीक नुकसान सूचना अर्ज व पीक पंचनामा सादर करण्यासाठीचा नमुना विमा कंपनी तसेच कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकऱ्याने नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज पूरक कागदपत्रासह (पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा, विमा हप्ता भरल्याचा पुरावा इ.) विमा कंपनीस सादर करणे आवश्यक आहे. शेतकरी परिपूर्ण माहितीसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करू शकतो, परंतु अर्जातील उर्वरीत माहिती ७ दिवसांच्या आत विमा कंपनीस सादर करावी लागतो. पीक नुकसानीचा पुरावा म्हणून मोबाईलवर घेतलेली छायाचित्रे देता येतील. त्यातही वेळ व जागेचे स्थान दाखवणाऱ्या मोबाइल मधील कॅमेरा वापरता येणे शक्य असेल तर अधिक चांगले.
विमा कंपनीने नेमलेले लॉस असेसर (Loss assessor) स्थानिक कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने सर्वेक्षण पूर्ण करतील. विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित नसतील तर शासकीय यंत्रणेने केलेले नुकसान सर्वेक्षण स्वीकारणे कंपनीवर बंधनकारक असते. नुकसान सर्वेक्षण करण्याच्या नमुन्यात संयुक्त पथकाने नोंदी घेतल्यास नुकसान भरपाई निश्चित करताना येणाऱ्या अडचणी, त्रुटी दूर होऊ शकतात. याकरिता सर्वेक्षण परिपूर्ण असेल याची सर्व संबंधितांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.

पीकविमा योजना राबविताना ड्रोन, उपग्रह चित्रे, रिमोट सेन्सिंग यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो का? 
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत पीककापणी प्रयोगांद्वारे मिळणारे उत्पन्नाचे अंदाज हे अचूक व दिलेल्या कालमर्यादेमध्ये प्राप्त होण्यासाठी उपग्रहाद्वारे प्राप्त प्रतिमांच्या सहाय्याने पीक कापणी प्रयोग आयोजित करणे, पिकांच्या उत्पन्नाच्या अंदाजासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उदा. रिमोट सेंसिंग टेक्नॉलॉजी, उपग्रह चित्रे, ड्रोन (Dynamic Remotely Operated Navigation Equipment), स्मार्टफोन इ. चा वापर करण्याविषयी केंद्र शासनाने सूचना दिलेल्या आहेत.   

त्यानुसार राज्यात गेल्या काही वर्षांत काही प्रयोग करण्यात आले आहेत. मात्र, या अनुषंगाने अधिक अभ्यास होण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या महालनोबिस नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटरकडे या अनुषंगाने धोरण, प्रक्रिया व संशोधनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पीक पेरणी क्षेत्र, स्थानिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई सर्वेक्षण, पीक कापणी प्रयोगांची संख्या निर्धारित करणे याचा भविष्यात वापर करणे शक्य होईल.

सद्यस्थितीत, पीक कापणी प्रयोग सुरू असतानाच उत्पादनाच्या सर्व नोंदी केंद्र-राज्य व विमा कंपनीस त्याच क्षणी उपलब्ध होण्याकरिता सी.सी.ई.अॅग्री (CCE AGRI ) हे मोबाइल ॲप केंद्र शासनाने विकसित केले आहे. ग्रामसमितीने पीक कापणी प्रयोगांसाठी या ॲपचा वापर करणे बंधनकारक आहे. या ॲपच्या वापरासाठी आवश्यक इंटरनेट खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी राज्य शासनाने तरतूद केली आहे. या ॲपच्या वापरासाठी केंद्र सरकार आग्रही आहे. 

(लेखक राज्याच्या कृषी खात्यात मुख्य सांख्यिक आहेत.)

Web Title: agro news