सुदृढ, निरोगी जनावरांसाठी व्यवस्थापनात बदल गरजेचा

जनावरांच्या चांगल्या अारोग्यासाठी गोठा स्वच्छ ठेवणे अावश्यक अाहे.
जनावरांच्या चांगल्या अारोग्यासाठी गोठा स्वच्छ ठेवणे अावश्यक अाहे.

दुग्धव्यवसाय फायदेशीर करायचा असेल तर जनावरांच्या योग्य व्यवस्थापनाचा अभ्यास महत्त्वाचा अाहे. त्यामुळे जनावरांची अधिकाधिक क्षमता वाढून चांगल्या उत्पादनासाठी मदत होईल.

जनावराच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते. जनावरे अाजारी होण्याचे प्रमाण कमी असल्यास अाैषधोपचाराचा खर्च कमी होतो अाणि उत्पादनात वाढ होते. त्यासाठी जनावरांमधील रोगप्रतिबंधासाठी पुढील काही महत्त्वाच्या उपाययोजना अाणि व्यवस्थापनात बदल करणे अावश्यक अाहे. 

प्रयोगशाळेतील तपासण्या 
 बऱ्याच रोगामध्ये रक्तातील, मूत्रातील, रक्तजलातील घटकांचे प्रमाण कमी किंवा जास्त होत असते. त्यामुळे सहा महिने ते एक वर्षातून एकदातरी संसर्गजन्य आजाराची तपासणी, लघवी, रक्त व दूध तपासणी करावी.
 दूध, लघवी व शेणाला येणारा नेहमीपेक्षा वेगळा वास, दिसणारा रंग इ. बाबी पाहून जनावर रोगी आहे अथवा निरोगी हे ठरवता येते.
 नियमित रक्त, मूत्र, शेण, दूध तपासणीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील किंवा महाविद्यालयातील चाचणी सुविधांचा लाभ घ्यावा. 
 नवीन जनावर खरेदी करताना योग्य तपासण्या करूनच खरेदी करावी.
आंतर व बाह्यपरोपजीवींचे नियंत्रण 
 आंतर व बाह्यपरोपजीवीमुळे जनावरे अशक्त होतात. वासरांची वाढ खुंटते, रक्तक्षय होतो, जनावर वेळेवर माजावर येत नाही. उत्पादनात घट होते, त्यामुळे आंतर व बाह्यपरोपजीवींचा प्रतिबंध करणे गरजेचे असते. 
 आंतर परोपजीवींच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी शेणाची तपासणी करून जंतनिर्मूलन करावे. तसेच बाह्यपरोपजीवींच्या नियंत्रणासाठी औषधांची शरीरावर व गोठ्यात नियमित ठराविक कालावधीने फवारणी करावी. याचा फायदा आंतर व बाह्य परोपजीवी नियंत्रणासाठी आणि  लसीकरणानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी होईल.

जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे 
 जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवल्यास येणाऱ्या विविध ताणाचा त्यांच्या शरीरावर परिणाम होणार नाही. वासरे, मोठी जनावरे, प्राणघातक व आर्थिक नुकसान करणाऱ्या आजारांना बळी पडणार नाहीत.  
 जनावरांची रोगप्रतिकारक वाढवण्यासाठी परोपजीवींचे नियंत्रण, लसीकरण करणे याबरोबरच वासरांना जन्मल्यानंतर लगेच गरजेप्रमाणे चीक पाजवणे, गरजेप्रमाणे दूध पाजवणे गरजेचे आहे.
 मोठ्या जनावरांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार द्यावा. या आहारामध्ये मुबलक दिव्दल व एकदल चाऱ्यासोबत क्षार व जीवनसत्त्व मिश्रणाचा समावेश करावा.

व्यवस्थापनातील बदल 
 वातावरणात होणाऱ्या अचानक बदलाचा जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो. यांपासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी व्यवस्थापनामध्ये बदल करावा. वेळोवेळी काळजी घेतल्यास जनावरांची प्रजनन क्षमताही चांगली राहते. 
 खाद्य, पाणी, हवा, गोठ्यातील स्वच्छता, कासेची स्वच्छता, जनावर माजावर आल्यास लगेच नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतन करून घ्यावे. जनावरांतील विविध प्रकारचा ताण घालविण्यासाठी त्यांना वेळोवेळी पाण्यामधून क्षार व जीवनसत्व देता येतील. 
 जनावरांतील ताण घालविण्यासाठी सहज करता येणारा उपाय म्हणजे एक बादली स्वच्छ पाण्यामध्ये एक-दोन चिमूट मीठ, एक मूठ गूळ, एक मूठ पीठ मिसळून जनावरांना द्यावे. 
 बाहेर चरण्यास पुरेसा चारा उपलब्ध नसताना जनावरांना फार दूरवर चरण्यास घेऊन जाऊ नये. आपल्याकडील उपलब्ध गोठ्यातील जागा, चारा उत्पादन, व्यवस्थापनासाठी लागणारे आवश्‍यक मनुष्यबळ इ. बाबींचा विचार करूनच जनावरांची संख्या ठरवावी. जनावरांच्या गोठ्यातील अनियंत्रित संख्येमुळे जनावरांची खाद्य व पाणी मिळविण्यासाठी धडपड-स्पर्धा सुरु होते, बसण्यासाठी आरामासाठी जागा नसल्यामुळे सातत्याने उभे राहून येणारा ताण, स्पर्धेमुळे वाढणारी चिडचिड इ. समस्या निर्माण होतात.

जनुकीय क्षमता 
 जातिवंत व जास्त जनुकीय क्षमता असणाऱ्या जनावरांपासून मुबलक प्रमाणात उत्पादन मिळते.  
 प्रजोत्पादनातून गोठ्यातच उत्तम जनावरे तयार होतात. जनावरांची खरेदी करताना त्यांच्या अाई वडिलांची उत्पादन क्षमता पाहावी. 
 आपल्या भागातील वातावरणाशी जुळवून घेणाऱ्या उत्पादक जनावरांची निवड करावी. पशुपालनातील ७० टक्के यश हे वंशावळीवर अवलंबून असते. 

रोगांवर उपचार 
जनावर आजारी पडल्यानंतर जनावराचे उत्पादन तर कमी होतेच शिवाय एका रोगामुळे दुसऱ्या रोगाला जनावरं बळी पडतात. यासाठी आजारी जनावरांवर वेळीच आवश्‍यक औषधोपचार होणे गरजेचे आहे. त्याकरिता पहिल्यांदा आजारी जनावर व निरोगी जनावर यातील फरक ओळखता आला पाहिजे. 

वेळीच औषधोपचार न झाल्यास उत्पादनावर परिणाम होतो शिवाय औषधोपचारावर जास्तीचा अतिरिक्त खर्च होतो तसेच जनावर कायमस्वरुपी निकामी होते किंवा दगावते. 

एका जनावराला आजार झाल्यास काहीवेळा हा आजार गोठ्यातील दुसऱ्या जनावरालाही होण्याची शक्‍यता असते. हे सर्व टाळण्यासाठी आजारी जनावराला वेगळे करून त्यावर वेळेत औषधोपचार करावेत.
- डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर.)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com