योग्य अवस्थेत करा फुलांची तोडणी

योग्य अवस्थेत करा फुलांची तोडणी

काढणीनंतर फुलांचे आयुष्य लवकर संपते. त्यामुळे फुलांचे आयुष्य आणि दर्जा वाढविण्यासाठी योग्य काढणी पश्चात तंत्रज्ञानाची तसेच फुलांची योग्य वेळेस तोडणीची आवश्यक असते.

फुले अगदी कापणी झाल्यानंतर जिवंत असतात आणि त्यांच्यामध्ये चयापचयाच्या प्रक्रिया चालू असतात, त्यामुळे फुलांमध्ये विविध प्रक्रिया होत असतात. या प्रक्रियेमुळे फुलांमधील कर्बोदकांचे प्रमाण कमी होते फुलांचा तापमान आणि श्वसन दर वाढतो 

सूक्ष्मजीवाची निर्मिती होते आणि त्या सूक्ष्मजीवामुळे फुलांचा जलद ऱ्हास होण्यास सुरवात होते. पाण्याचा ताण येतो इथीलिन या वायूचे प्रमाण वाढते. या सर्व कारणामुळे तोडलेल्या फुलांचा ऱ्हास होतो. 

फुलांच्या काढणीपश्चात गुणवत्तेवर परिणाम करणारे काढणी पूर्वीचे घटक
१) आनुवंशिक ठेवणं
फुलांचे आयुष्य, आकार, रंग, गुणवत्ता या सर्व गोष्टी त्याच्या आनुवंशिक गोष्टीवर म्हणजेच फुलाच्या प्रजाती; तसेच जाती वर अवलंबून असतात.

२) लागवड ते काढणीपर्यंतची स्थिती
फुलांच्या संपूर्ण वाढीच्या काळात वातावरणातील विविध घटक जसे तापमान, सूर्यप्रकाशाची तीव्रता, हवेची आर्द्रता इ. चे प्रमाण किती होते, यावरही फुलांची गुणवत्ता आणि आयुष्य अवलंबून असते. 


फुलांना दिवस आणि रात्री वेगवेगळ्या प्रमाणात तापमानाची गरज असते. जसे की गुलाबाला दिवसा २० ते २५ अंश सेल्सिअस आणि रात्री १५ ते १६ अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. कार्नेशनला दिवसा २०अंश सेल्सिअस आणि रात्री १० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. म्हणजेच फुलामध्ये दिवस आणि रात्रीच्या तापमानातील फरक १० अंश सेल्सिअस असावा लागतो. असे तापमान जर दिवस आणि रात्री फुलांना पुरवले तर त्यांचे आयुष्य, गुणवत्ता, वजन, आकार, रंगामध्ये वाढ होते. 
फुलांच्या संपूर्ण वाढीच्या वेळेस कोणत्या प्रकारचे अन्न आणि पाणी फुलांना दिलेले आहे यावरही त्यांचे आयुष्य, गुणवत्ता, वजन, आकार, रंग अवलंबून असतो.फुलांच्या तोडणीची अवस्था  आणि योग्य वेळ 
फुलांच्या तोडणीची अवस्था आणि वेळ फुलांचे आयुष्य, गुणवत्ता, वजन, आकार, रंग वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. 
काढणीचा काळ आणि वेळ जाती आणि प्रजातीनुसार बदलतो.
फुलांची तोडणी जास्त पक्व किंवा जास्त कोवळ्या अवस्थेत करू नये. फुलाच्या कळीची वाढ पूर्ण झालेली असावी त्या वेळेस त्याची काढणी करावी. कारण जास्त कोवळ्या कळ्या लवकर खुलत नाहीत आणि जास्त पक्व कळ्या लवकर खुलतात.त्यामुळे फुलांची तोडणी फुले केव्हा मार्केटला पाठवायची आहेत. त्यानुसार ठरवावे. दूरच्या मार्केटला फूल पाठवायची असतील तर काढणी कळी अवस्थेतच करावी. तर जवळच्या मार्केट पाठवायची असतील तर फुलांची काढणी कळी जरा खुलायला लागली की करावी.
ज्यावेळेस तापमान कमी असते म्हणजे काढणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी. कारण जास्त तापमानामुळे फुलांचा श्वासोच्छ्वासाचा दर वाढतो. त्यामुळे फुले हवेमध्ये पाणी सोडून देतात अाणि लवकर सुकतात. त्यांची गुणवत्ता ही कमी होते.

विविध फुलांच्या तोडणीची योग्य वेळ
गुलछडी/ निशिगंध ः सिंगल प्रकारासाठी कळ्या पूर्णपणे विकसित पण न उघडलेल्या अाणि डबल प्रकारासाठी कळ्या जास्त उघडलेल्या असतील तेव्हा.
गुलाब ः १-२ पाकळ्या उघडायला सुरवात झाल्यावर.
झेंडू ः फुलाची कळी पूर्णपणे फुलल्यावर.
शेवंती ः स्टँडर्ड प्रकारासाठी जेव्हा बाहेरील पाकळी पूर्णपणे उघडी होईल तेव्हा अाणि स्प्रे प्रकारासाठी फूल पूर्णपणे फुलल्यावर परंतु परागकण खाली पडायच्या आधी. 

डॉ. राहुल यादव, ८३७८९५२६८१
(शास्त्रज्ञ, पुष्प संशोधन संचालनालय, शिवाजीनगर, पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com