डोंगरावर फुलविले आमराईचे नंदनवन 

प्रशांत बर्दापूरकर
मंगळवार, 13 जून 2017

बीड जिल्ह्यातील डोंगरपिंपळा (ता. अंबाजोगाई) येथील निवृत्त कार्यकारी अभियंत्याने डोंगरावर दीड हजार केशर आंबा झाडांचे संगोपन करून नंदनवन उभे केले आहे. गारपीट, वादळ, अवर्षण यांच्याशी सामना करीत आंब्याची उत्कृष्ट गुणवत्ता राखताना त्याला जागेवरच मार्केटही मिळवले आहे. रमजान सणाचे उद्दिष्ट ठेवत त्यात पपई लागवडीचाही प्रयोग केला आहे. 

लातूर येथील मूळ रहिवासी असलेले शशिकांत पाठक नोकरीनिमित्त अंबाजोगाई शहरात स्थायिक झाले. ‘इरिगेशन’ कार्यालयात सर्वेक्षण व अन्वेषण विभागातून २००८ मध्ये कार्यकारी अभियंता या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. पाठक यांची शेती नव्हती. मात्र त्यांना शेतीची फार आवड होती. निवृत्तीनंतरचा वेळ शेतीतच व्यतीत करायचा असे त्यांनी अगोदरच ठरवले होते. केलेल्या निश्‍चयाप्रमाणे अंबाजोगाईपासून सुमारे १७ किलोमीटरवरील डोंगरपिंपळा भागात २००० च्या काळात अकरा एकर तीन गुंठे पडीक जमीन विकत घेतली. हा भाग पूर्ण डोंगराळ असून बाजूलाच खोल दरी आहे. या जमिनीत सर्वत्र माळाचे दगडगोटे पडलेले होते. अशी जमीन घेऊन पाठक इथे काय करणार असा प्रश्‍न अनेकांना पडला होता. पाण्याची सोयही येथे नव्हती. पण जिद्द असली की हिंमत होते व ठरलेला निश्‍चय पार पाडण्याचे बळ देखील मिळते. 

जमिनीची सुधारणा, आंब्याची लागवड
प्रथम जमिनीतील दगड गोटे बाजूला करून घेतले. बाजूलाच वीज पडून तयार झालेले डबके होते. त्याला या भागात "इचगेरा"चा झरा नावाने संबोधले जाते. या झऱ्याला दुष्काळातही पाणी असायचे याचा फायदा झाला. परंतु हे पाणी तांब्याने घ्यावे लागायचे. त्यात पाण्याचा प्रवाह कमी असल्याने वीज पंपही चालत नसे. अशा स्थितीत सन २००१ च्या दरम्यान केशर आंब्याची लागवड सुरू केली. 

त्यानुसार आखणी करून दहा एकरांत ३० बाय १५ फूट अंतरावर झाडे लावली. आंब्याचे कलम शिरूर घोडनदी (जि. पुणे) येथील शासकीय रोपवाटिकेतून प्राप्त केले. झाडे तर लावली. परंतु ती जोपासायची कशी असा प्रश्‍न समोर होता. जिद्द कायम ठेवून मजुरांच्या साहाय्याने इचगेरा झऱ्याचे कॅनद्वारे पाणी घालून झाडे जगविली. असे करीत दरवर्षी दोनशे झाडे लावली. त्याला तारेचे कुंपण करण्याच्या अवास्तव खर्चात न पडता बोरीच्या काट्यांचे कुंपण दरवर्षी केले. त्यामुळे झाडांना सुरक्षितता मिळाली. दोन झाडातील अंतर कमी करून दोन झाडात पुन्हा एक झाड लावले. अशा रितीने आज पंधराशे झाडे बागेत उभी आहेत. अर्थात सुरवातीच्या झाडांची संख्या चारशेपर्यंत होती. 

पाण्याचे नियोजन
मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड झाल्याने पाण्याचा स्रोत निर्माण करणे गरजेचे होते. शासनाकडे पाठपुरावा करून जमिनीच्या बाजूलाच असलेल्या दरीत २००५ मध्ये पाझर तलाव घेतला. या तलावाच्या बाजूला विहीर घेतली. त्यामुळे तलावाचा पाझर विहिरीत आल्याने पाणी उपलब्धता झाली. पाण्याची चांगली सोय झाल्याने सर्व झाडांना ठिबक करून झाडे जगविली. पाझर तलावामुळे दुष्काळातही पाण्याची अडचण कमी भासली. प्रत्येक झाडाला प्रति आठवड्यात दोनशे लिटर पाणी दिले. ठिबकसह दंडानेही पाणी दिल्यामुळे फळझाडाची वाढ चांगली झाली. 

दरवर्षी शेणखताचा वापर 
पाठक दरवर्षी १५ ट्रॅक्‍टर शेणखत घेतात. जूनमध्ये प्रत्येक झाडाला पाच टोपली खत प्रत्येक झाडाच्या आळ्यात दिले जाते. झाडांची चांगली वाढ व्हावी व फळ चांगले पोसावे यासाठी विद्राव्य खतांचा वापरही केला आहे. त्यामुळे आंब्याला चांगला मोहरही आला. निंबोळी पेंड देखील एक किलो प्रति झाड दिली जाते. 

पपईचे आंतरपीक 
माळरान जमीन असल्यामुळे सोयाबीन, कापूस अादी अांतरपिके घेतली नाहीत. परंतु मागील वर्षी (२०१६) पाऊण एकरात आंब्याच्या मधल्या अंतरात तैवान ७८६ जातीच्या पपईची लागवड केली. रमजान सणाच्या वेळी पपई बाजारात आणून त्याला चांगला दर मिळावा हा उद्देश ठेवला. आत्तापर्यंत सुमारे ३० क्विंटल पपई विकली आहे. अंबाजोगाईच्या बाजारात त्याला सध्या किलोला १५ ते २२ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. 
        
उत्पादन व विक्री व्यवस्था 
आंब्याचे व्यावसायिक उत्पादन २००७ नंतरच मिळण्यास सुरवात झाली. आज चार हेक्टरमधून १२ टन म्हणजे हेक्टरी ३ टनांपर्यंत उत्पादन मिळते. गारपीट, दुष्काळ, प्रतिकूल हवामान या कारणांमुळे उत्पादनात घट येते. कच्चा आंबा विक्री करण्यावर भर असतो. सुरवातीला आंबे अंबाजोगाई मार्केटमध्ये विकले जात. आता ग्राहक घरीच येऊन आंबा घेऊन जातात. त्यामुळे विक्रीसाठी बाहेर जाण्याची गरज उरलेली नाही. गुणवत्ता, उत्कृष्ट स्वाद यामुळे आंब्याला चांगले मार्केट मिळवता आल्याचे पाठक म्हणाले. शेतात पॅकहाऊसही उभारले आहे. एके वर्षी मार्केटमध्ये अठरा ते वीस रुपये प्रती किलो भादर मिळत होता. आता थेट विक्रीतून पन्नास ते ७० रुपयांपर्यंत दर मिळतो. 
 
कलिंगड आंतरपिकातून उत्पन्नाची जोड 
पपईव्यतिरिक्त उन्हाळ्यात आंब्यात कलिंगडाचे आंतरपीक घेण्याचा प्रयोग केला. त्यातून किलोला सहा रुपये दर मिळाला. सुमारे ४० हजार रुपयांचे उत्पन्न हाती पडले. ज्यामुळे खर्च कमी होण्यास मदत झाली.  

 : शशिकांत पाठक, ९४२३१७१५६६, ९७६४६०३०००.

Web Title: agro news agrowon sahshikant pathak