आवळा फळबागेचे खत, पाणी नियोजन

आवळा फळबागेचे खत, पाणी नियोजन

आवळा फळपिकात उन्हाळ्यात फळधारणा होते. मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत ती सुप्तावस्थेत असतात. पावसाचे आगमन झाल्यानंतर फळे वाढण्यास सुरवात होते. त्यानंतर बागेची काळजी घ्यावी. 
 

आवळा या फळपिकात पावसाळ्यात खतव्यवस्थापन, छाटणी, फुले व फळगळ नियंत्रण आदी बाबी महत्त्वाच्या आहेत. 

छाटणी आणि वळण देणे 
आवळ्याचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी झाडाला योग्य आकार देणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. आवळ्याच्या झाडाचे लाकूड अतिशय ठिसूळ असते. फांद्या फळांच्या वजनाने मोडतात, त्यामुळेही झाडाचा योग्य सांगाडा तयार होणे गरजेचे असते. झाडाला योग्य आकार देण्यासाठी लागवडीनंतर तिसऱ्या वर्षांपासून झाडास वळण देणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम जमिनीपासून ७५ ते १०० सें.मी. उंचीपर्यंत सरळ एक मुख्य खोड वाढवून घ्यावे. नंतर त्यावर पुढे ५-६ जोमदार फांद्या चहूबाजूंनी वाढू द्याव्यात. चांगला सांगाडा तयार व्हावा यासाठी झाडावर आलेल्या इतर फांद्यांची छाटणी करावी. खोडावर १ मीटरखाली येणारी फुटसुद्धा काढून टाकावी. पावसाळा संपल्यावर रोगट, कमजोर   आणि वेड्यावाकड्या फांदा काढून टाकाव्यात. मात्र दरवर्षी फळे देणाऱ्या झाडांची छाटणी करणे आवश्‍यक नाही.

फूल आणि फळधारणा
आवळ्यामध्ये डिसेंबर-जानेवारी महिन्यात पानगळ होते. फेब्रुवारी-मार्च महिन्यात नवीन पालवी आणि फुले येतात. आठ-पंधरा दिवसांमध्ये फळधारणा होते. फळधारणेनंतर जवळपास ३० दिवस फळे सुप्तावस्थेत जातात. पावसाच्या आगमनाबरोबर फळांच्या वाढीस सुरवात होते. फळांची चांगली वाढ व्हावी यासाठी त्याला खतमात्रा द्यावी. 

फूल, फळगळ नियंत्रण 
फूल व फळगळ ही गळ ३ अवस्थांमध्ये होते.
पहिली फुलांची गळ ही फुलोऱ्यापासून ३ आठवड्यांत होते. यामध्ये जवळपास ७० टक्के फुले गळतात. परागीकरणाच्या अभावामुळे ही गळ होते. लागवड करतानाच वेगवेगळ्या जातींची लागवड केल्याने ही समस्या टाळता येते. 

दुसरी फळगळ ही जून ते सप्टेंबर या काळात बिजांड धारणेअभावी होते. बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची  १० मिलिग्रॅम प्रतिलिटर पाणी (१० पीपीएम) या प्रमाणात फवारणी केल्याने ही फळगळ रोखता येते. 

तिसरी फळगळ ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात होते. विविध अवस्थेतील फळे या काळात गळतात. फळधारणेच्या काळात जिब्रलिक आम्लाची (३० ते ५० पी.पी.एम.तीव्रता) फवारणी केली असता फळांच्या आकारमानात वाढ होते.

पाणी व्यवस्थापन 
आवळ्याची लागवड कोरडवाहू पीक म्हणून केली जाते. मात्र नवीन झाडांना कलमे जगविण्यासाठी गरजेनूसार २० ते ३० लिटर पाणी प्रतिझाड १० ते १५ दिवसांच्या अंतराने द्यावे. 

आवळ्याची पूर्ण वाढ झालेली झाडे पाणी न देताही चांगली फळे देतात. मात्र फळे देणाऱ्या झाडांना २० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. त्यामुळे फळगळ कमी होते. तसेच फळांची वाढ चांगली होते.

सिंचनासाठी आवळ्याच्या झाडाच्या प्रसाराच्या प्रमाणात ५ टक्के बाहेरून आत झाडाच्या खोडाच्या दिशेने उतार असलेले गोलाकार आळे बांधावे. उपलब्ध आच्छादनाचा त्यात वापर केल्यास पावसाळ्यात पावसाचे पाणी जमिनीत मुरविले जाते. जमिनीत जास्त दिवस ओलावा टिकून राहिल्यास आवळ्याचे भरीव उत्पादन मिळते. 

आंतरपिकांची लागवड 
आवळ्यामध्ये सुरवातीला ५-६ वर्षापर्यंत आंतरपिके घेता येतात. आवळ्याच्या चोहोबाजूला एक मीटर जागा सोडून पिके घ्यावीत. खरीपामध्ये तीळ, उडीद, मूग, रब्बी हंगामात हरभरा, वाटाणा, मोहरी, तीळ भाजीपाला यासारखी पिके घ्यावीत. आवळ्याच्या बागांमध्ये जानेवारी -फेब्रुवारी महिन्यात पानगळ होते. पानगळीच्या कालावधीत अांतर पिके घेऊ नयेत. स्टायलो हॅमाटा या गवताची लागवड केल्याने तणाचा बंदोबस्त होतो. जमिनीची प्रत सुधारण्यासही त्याची मदत होते.
- डाॅ. विजय काळे, ८२७५३११८५४
(उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकाेला)

जुन्या बागेचे नूतनीकरण  
जुनी निष्कृष्ट दर्जाची आणि जंगली आवळ्याची झाडे चांगल्या जातीच्या झाडात बदलता येतात. त्यासाठी मार्च - एप्रिल महिन्यात जुन्या झाडाची एक मीटर उंचीवर छाटणी केलेली असावी. छाटणी केल्यानंतर काही दिवस झाडे सुप्तावस्थेत गेलेली असतात. साधारणपणे एक महिन्यानंतर छाटणी केलेल्या झाडावर अनेक फुटवे आलेले असतात. जुलै-ऑगस्ट महिन्यात त्या फुटव्यांवर डोळे भरावेत. मात्र डाेळे भरताना केवळ सशक्त फुटवे ठेवून त्यावरच चांगल्या जातीचे डोळे भरावेत. अशाप्रकारे संपूर्ण झाड नवीन आणि चांगल्या जातीचे होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com