भात पट्ट्यात जिवाणू करप्याचा प्रादुर्भाव

पुणे - फळणे येथील बजाबा मालपोटे त्यांच्या शेतातील भातपिकावर पडलेला करपा दाखविताना.
पुणे - फळणे येथील बजाबा मालपोटे त्यांच्या शेतातील भातपिकावर पडलेला करपा दाखविताना.

पुणे - गेल्या काही दिवसांपासून हवामानात होत असलेले बदल, वाढते तापमान, कमी-अधिक होणारा पाऊस आणि बियाणे बदल न केल्यामुळे भात पट्ट्यात चालू वर्षी पहिल्यांदाच जिवाणू करप्याचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. पश्चिमेकडील तालुक्यांत सुमारे ३५० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर जिवाणू करपा पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची भीती भात संशोधन तंज्ज्ञानी व्यक्त केली आहे. 

यंदा पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांत ५८ हजार ६७० हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. परंतु हवामानात होत असलेले सततचे बदल आणि भात वाणामध्ये न केलेल्या बदलामुळे याचा अधिक प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना कृषी विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. मावळातील फळणे, माऊ, खांडी, कुसूर, तसेच कोथुर्णे, ब्राह्मणोली, शिवणे या परिसरांत या रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. या रोगावर वेळीच औषधाची फवारणी करून रोग नियंत्रण करणे गरजेचे असल्याचे लोणावळा येथील भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डाॅ. चंद्रशेखर क्षीरसागर यांनी सांगितले. 

डॉ. क्षीरसागर म्हणाले, मावळातील प्लॉट पाहणी केल्यानंतर अनेक ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रोग नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली आहे. 
यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराईड पंचवीस ग्रॅम आणि स्ट्रेप्टोसायक्लीन २.५ ग्रॅम आणि स्टिकर १० मिलि दहा लिटर पाण्यातून पहिली फवारणी करावी. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी दुसरी फवारणी करावी. तसेच काही गावांत खाचरामध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ डब्ल्यू.डब्ल्यू २.५ मिलि दहा लिटर पाण्यात एकत्रित मिसळून फवारणी करावी. ज्या खाचरामध्ये रोग दिसून येत नाही, कमी प्रमाणात आहे, अशा शेतकऱ्यांनीदेखील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून वरीलप्रमाणे फवारणी करणे आवश्यक आहे.

दरम्यान पुढील वर्षी कडा करपा रोग येऊ नये म्हणून काळजीबाबत यंदा रोगग्रस्त प्लॉटमधील बियाणे पुढील वर्षासाठी वापरू नयेत. निरोगी शेतातीलच बियाणे ठेवावेत. शक्यतो बियाणे बदल करावा, प्रमाणित बियाणेच रोपवाटिकेत पेरावेत. भात कापणीनंतर खोल नांगरट करावी. शेतातील भाताचे अवशेष, धसकटे वेचून नष्ट करावीत, शेताचे बांध स्वच्छ ठेवावेत, असेही त्यांनी सांगितले.  

५० टक्के अनुदानावर कीडनाशके 
फवारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के व हेक्टरी जास्तीत जास्त पाचशे रुपये अनुदान कृषी विभागाकडे उपलब्ध आहे. शिफारस केलेली औषधे अधिकृत कृषिसेवा केंद्रातूनच घ्यावीत. अर्ज, भात पिकांची नोंद असलेला सातबारा व औषधे खरेदीची बिले कृषी सहायकांमार्फत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात यावेत. त्यानुसार ५० टक्के अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 

आपल्याकडे तीन प्रकारचे करपा रोग आहेत. यंदा पहिल्यांदाच जिवाणू करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.  अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या त्याचे प्रमाण कमी असले, तरी त्याचे प्रमाण आगामी काळात वाढू शकते. 
- डॉ. चंद्रशेखर क्षीरसागर, शास्त्रज्ञ, भात संशोधन केंद्र, लोणावळा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com