नियोजन बांबू लागवडीचे...

डॉ. अजय राणे, डॉ. सतीश नारखेडे
बुधवार, 7 जून 2017

व्यावसायिकदृष्ट्या कळक, मानवेल, माणगा व मेस या बांबूच्या महत्त्वाच्या प्रजाती आहेत. पावसाळ्यात बांबूची लागवड करावी. गादी वाफ्यावर बांबूची रोपवाटिका तयार करावी.

व्यावसायिकदृष्ट्या कळक, मानवेल, माणगा व मेस या बांबूच्या महत्त्वाच्या प्रजाती आहेत. पावसाळ्यात बांबूची लागवड करावी. गादी वाफ्यावर बांबूची रोपवाटिका तयार करावी.

बांबू प्रजातींसाठी सरासरी वार्षिक तापमान ८.८ 
अंश सेल्सिअस ते ३६ अंश सेल्सिअस आणि १२७० ते ४०५० मि.मी. पावसाची आवश्‍यकता असते. जास्त पावसाचा प्रदेश योग्य असतो. बांबू थंडी व थोड्या प्रमाणात दवही सहन करू शकतो. अधिक उताराच्या जमिनीमध्ये बांबूचे उत्पादन घटू शकते. त्यामुळे सपाट व कमी उताराची जमीन लागवडीस योग्य ठरते. लागवडीसाठी साधारणतः नदीकाठ किंवा खडकापासून बनलेल्या वाळूकामय चिकण ते चिकण पोयटा प्रकारची जमीन योग्य असते. बांबूची चांगली वाढ उत्तम निचऱ्याच्या जमिनीत होते.
  चिकणमातीयुक्त भारी जमिनीत बांबूच्या कंदाची वाढ खुंटते, म्हणून अशी जमीन लागवडीस अयोग्य ठरते. याचबरोबर हलक्या पोताची जमीनसुद्धा लागवडीस उपयुक्त नाही. सामू जास्त असलेल्या जमिनीत बांबूची चांगली वाढ होते. हलक्या जमिनीवर वाढू शकत असल्याने आपण पडीक जमिनी लागवडीखाली आणू शकतो.

अभिवृद्धी 
व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या कळक, मानवेल, माणगा व मेस या प्रजाती राज्यात आहेत. यापैकी कळक व मानवेल संपूर्ण महाराष्ट्रात तर माणगा व मेस कोकणात मोठ्या प्रमाणात आढळतात.

अभिवृद्धी बीज, कंद तसेच कांडी (शाकीय) पद्धतीने करता येते.

कळक व माणवेलचे बियाणे अलीकडच्या काळात दरवर्षी मुबलक प्रमाणात मिळते. तसेच त्याची रुजण्याची क्षमताही चांगली असते. बीजधारणा केलेली बेटे आढळ्यास फेब्रुवारी ते जून दरम्यान बेटाभोवती पडलेले पक्व बी गोळा करावे. नवीन गोळा केलेल्या बियांची उगवण क्षमता जास्त असली तरी योग्य रीतीने बिया सुकवून साठवून ठेवाव्यात. साठवणीसाठी बियांमधील ओलावा ८ ते १० टक्के असावा. या बिया वर्षभर वापरू शकतो. 

गादी वाफा, कुंडी किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बिया पेरून रोपे तयार करता येतात. गादीवाफ्यात पाणी आणि खतपुरवठा योग्य होत असल्याने गादीवाफ्यात बांबूच्या बियाणे पेरणी करणे योग्य असते. 

माती, वाळू आणि कंपोस्ट यांचे सम प्रमाणातील मिश्रण करून तयार केलेल्या वाफ्यामध्ये बिया पेराव्यात.

बिया पाण्यात भिजत ठेवल्याने त्यांची उगवण क्षमता वाढते. म्हणून बांबूच्या बिया २४ तास थंड पाण्यात ठेवाव्यात, त्यानंतर बियांची पेरणी करावी. 

बिया पेरताना ओळीत पेराव्यात. वाफ्यात पसरवू नयेत. बी पेरल्यानंतर मातीच्या मिश्रणाचा एक थर द्यावा. 

बिया पेरल्यानंतर आठवडाभरात उगवल्यानंतर रोपे ८ ते १० सें.मी. उंच आणि ४ ते ५ पानांची झाल्यावर ५x७ इंच आकाराच्या प्लॅस्टिक पिशव्यात लावावीत. त्याची काळजी घ्यावी. 

२ ते ३ फूट उंचीची रोपे लागवडीसाठी योग्य होतात. पावसाळ्याच्या सुरवातीस लागवड करून रोपाभोवतालची माती घट्ट दाबून घ्यावी. परंतु अशा प्रकारे रोपांपासून लागवड केल्यास बेट तयार होण्यास ५ ते ६ वर्षे लागतात. बांबूला ५० ते ६० वर्षांनी फुलोरा येत असल्याने काही प्रजातींमध्ये दरवर्षी बियाणे मिळत नाही म्हणून कंद किंवा कांडी पद्धतीने रोपे करावी.

लागवड 
बांबूची लागवड पावसाळ्यात करावी. सिंचनाची व्यवस्था असल्यास नोव्हेंबर - डिसेंबरमध्येही लागवड करता येते. 
कमी व्यासाच्या जातीसाठी ३x३ मी., मध्यम व्यासाकरिता (उदा. माणगा, माणवेल इ.) ५x५ मी. आणि अधिक मोठ्या व्यासाच्या बांबूसाठी ७x७ मी. तर हेमिलटोनीसाठी १०x१० मी अंतराची शिफारस करण्यात आलेली आहे.
लागवड करण्यापूर्वी प्रत्येक खड्ड्यातून पाच किलो कंपोस्ट किंवा गांडूळखत, युरिया १०० ग्रॅम, सिंगल सुपर फॉस्फेट १०० ग्रॅम, म्युरेट ऑफ पोटॅश ५० ग्रॅम मिसळावे. कंद, रोपे, कंदकाठी खड्ड्याच्या मधोमध सरळ उभी ठेवून माती एका पेरापर्यंत घट्ट लावून घ्यावी. त्यानंतर रोपाभोवती पसरवून आच्छादन करून घ्यावे. रोपाच्या भोवती पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

कृषी वनिकी पद्धत 
बांबूची लागवड शेती बांध, फळबागांभोवती कुंपण म्हणून करावी. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने उताराच्या जमिनीवर बांबूच्या १० मी.x१०मी. लागवडीमध्ये नागलीचे अांतर पीक म्हणून शिफारस केलेली आहे. आंतर पिकामुळे बांबूची चांगली वाढ होत असल्याचे दिसून आले आहे.

कंद काठीची लागवड
एक वर्षे वयाची बांबूची काठी जून महिन्यात पावसाच्या सुरवातीस जमिनीपासून ९० ते १२० सेंमी उंचीवर तिरकी छाटून घ्यावी.
काठीचा कंद मुख्य कंदापासून विलग करून घ्यावा. या कंदावर कमीत कमी एक उगवणक्षम डोळा असल्याची खात्री करावी. त्यानंतर लागवडीच्या ठिकाणी ही कंद काठी सुरवातीच्या २ ते ३ गाठीपर्यंत जमिनीत गाडावी, असे करताना डोळ्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. 

ज्या कंद काठ्या फेब्रुवारी-मार्चमध्ये काढून पिशव्यांमध्ये लावलेल्या आहेत, अशा रोपांची जुलैमध्ये लागवड करावी. जेणेकरून मुख्य बेटाचे नुकसान होणार नाही. 

एका बेटापासून साधारणतः २ ते ३ कंदकाठ्या मिळतात. काठी वाया जाऊ नये म्हणून माणगा बांबूत १४ फुटांची लांब काठी कंदासह लावल्यास पुढच्या वर्षी त्या काठीची काढणी करू शकतो. 

कंदकाठीभोवती माती घट्ट दाबून घ्यावी, कारण पाणी साचल्याने किंवा जोराच्या वाऱ्याने नुकसान होऊ शकते. काठीच्या कापलेल्या टोकावर प्लॅस्टिक पिशवी लावावी. त्यामुळे कंद कुजणार नाही.

बांबूच्या सर्व प्रकारच्या प्रजातीची अशा प्रकारे अभिवृद्धी करता येते. मात्र कंदाची उपलब्धता कमी असल्यामुळे या पद्धतीने बांबूची मोठ्या प्रमाणावर लागवड करताना कंद गोळा करणे अवघड होते.

 वैशिष्ट्ये 
शेतीसाठी अयोग्य, दुष्काळी भागात आणि पाणी साचलेल्या भागामध्ये लागवड शक्य. 
कठीण, लवचिक आणि टिकाऊ असल्याने व्यावसायिक उत्पन्नाच्या दृष्टीने फायदेशीर.
बांबूचा सुमारे १५०० प्रकारे कामकाजासाठी उपयोग. बांबूचा उपयोग खाण्यासाठी तसेच कृषी अवजारे, घरबांधणी, हस्तकला, पेपर निर्मिती इ. कामासाठी होतो.  बांबू हा लाकडाला उत्तम पर्याय. फर्निचर, पार्टीशन निर्मितीसाठी उपयुक्त.
राष्ट्रीय बांबू मिशनने देशामध्ये बांबूची व्यावसायिक दृष्टीने लागवड करण्यासाठी १७ प्रजातींची शिफारस.
परसबाग, शेतीच्या बांधावर, मृद संवर्धनासाठी तसेच बांबूची व्यावसायिक लागवड शक्य.

Web Title: agro news Bamboo cultivation