केळी उत्पादकतेत खोडा वातावरणाचा

जळगाव - उष्णतेत पक्व घड असलेली झाडे मोडून पडतात. त्यात १०० टक्के नुकसान होत आहे.
जळगाव - उष्णतेत पक्व घड असलेली झाडे मोडून पडतात. त्यात १०० टक्के नुकसान होत आहे.

जळगाव - राज्यात सततच्या प्रतिकूल वातावरणाचा केळी पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातील केळी उत्पादकता घटली असून प्रतिहेक्टरी ५७ टनांवर आली आहे. अशी माहिती केळीच्या उत्पादकतेसंबंधी केंद्राच्या अखत्यारितील राष्ट्रीय बागवानी मंडळाने जारी केलेल्या आकडेवारीतून मिळाली. महाराष्ट्र उत्पादकतेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

देशात जळगाव जिल्ह्याची केळीची उत्पादकता चांगली असल्याची नोंद असून, ती हेक्‍टरी ७६ मेट्रिक टनवर आहे. राज्यात मागील दोन वर्षे केळीला प्रतिकूल वातावरणाचा फटका बसला आहे. केळीचे आगार म्हणून जगात प्रसिद्ध असलेला जळगाव जिल्हा उत्पादकतेत आघाडीवर असला तरी राज्यातील इतर भागांत हवे तसे उत्पादन गाठता आलेले नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. राज्यात ८३ हजार हेक्‍टरवर केळी लागवड मागील हंगामात होती. त्यातील ६० टक्‍क्‍यांवर क्षेत्र एकट्या जळगाव जिल्ह्यात होते. जळगाव जिल्ह्यात सुमारे ४८ हजार हेक्‍टरवर केळीची लागवड झाली होती. २०१६ व २०१७ या दोन्ही वर्षांमधील अपेक्षेपेक्षा कमी पाऊस केळीच्या उत्पादकतेवर परिणाम करणारा प्रमुख मुद्दा ठरला आहे. 

उत्पादकतेमध्ये महाराष्ट्राच्या पुढे गुजरात, मध्य प्रदेश ही राज्ये आहेत. उत्पादकतेसंबंधी महाराष्ट्र तामिळनाडूनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. मध्य प्रदेशात क्षेत्र कमी आहे, परंतु बडवानी व बऱ्हाणपूर भागात तापी आणि नर्मदा नदीचा मोठा आधार केळी उत्पादकांना मिळाला. तेथे केळीचे फ्रूट केअर तंत्रज्ञान रूजले असून, उत्पादनात चांगली वाढ झाल्याचे जाणकारांनी म्हटले आहे.  

मागील दोन महिने बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) च्या बाजारात केळीला ११०० रुपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. जळगावात व्यापाऱ्यांनी निर्यातक्षम केळीला क्विंटलमागे २०० रुपये ऑनचे दर दिले. तर मध्यम दर्जाच्या केळीला सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मध्य प्रदेशसह गुजरात व महाराष्ट्रात दर स्थिर असल्याची माहिती मिळाली. 

यामुळे घटली उत्पादकता
यासोबतच कमी पाणी असताना केळीचे पीक घेण्याची जोखीम, अयोग्य लागवड, खते व पाण्याचे व्यवस्थापन, चिलिंग इंज्युरी व सनस्ट्रोक, काढणीपश्‍चात हाताळणीच्या चुका, अयोग्य वाहतूक व्यवस्था आदी कारणे उत्पादकतेमध्ये घट करणाऱ्या ठरल्या आहेत. जळगाव जिल्ह्याने उत्पादकता राखली, परंतु पुणे, सोलापूर, नांदेड, अमरावती, अकोला, नगर व कोकण पट्ट्यातून उत्पादकतेसंबंधी हवे ते यश मिळाले नाही. फ्रूट केअर तंत्रज्ञान राज्यात सर्वत्र रूजलेले नसल्याचे कारणही तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

प्रतिकूल हवामानातही राज्यात केळी घेण्याचे काम झाले, परंतु दुष्काळी स्थिती किंवा पावसाचे कमी प्रमाण हे प्रमुख कारण उत्पादकतेमध्ये घटीसंबंधी पुढे येत आहे. तामिळनाडू सुरवातीपासून उत्पादकतेत आघाडीवर आहे. तेथे समुद्र किनारपट्टीचे दमट वातावरण केळीला लाभदायी ठरते. 
- प्रा. नाझेमोद्दीन शेख, प्रमुख, केळी संशोधन केंद्र, जळगाव

केळीच्या उत्पादकतेसंबंधी जगभरात परिणाम दिसत आहे. फिलिपीन्स, कोस्टारिका आदी देशांमध्ये पनामा रोगाने केळीचे नुकसान झाले आहे. या सगळ्या स्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारतातील दर्जेदार केळीला चांगली मागणी आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्रात केळी आयातीसाठी आल्या आहेत. केळीसाठी पुढचे दिवस चांगले ठरतील. मागील पाच महिने दर स्थिर आहेत. पुढेही केळीला चांगले दर मिळतील. 
- प्रशांत महाजन, महाजन बनाना एक्‍सपोर्ट, जि. जळगाव

भारताची स्थिती
एकूण केळी लागवड आठ लाख ४६ हजार हेक्‍टर
उत्पादकता ३७ टन प्रतिहेक्‍टरी (सरासरी)
एकूण उत्पादन २९ दशलक्ष टन

देशातील प्रमुख राज्यांमधील केळीची स्थिती (लागवड (हेक्‍टरमध्ये), 
उत्पादकता (प्रतिहेक्‍टरी/टन)
राज्य                  लागवड       उत्पादकता

तमिळनाडू         १,२०,०००        ६४
गुजरात               ६७,०००         ६२
मध्य प्रदेश           २०,०००         ६१
महाराष्ट्र              ८३,०००         ५७
केरळ                  ६०,०००         १० 
कर्नाटक               ८१,०००         २८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com