मधमाश्‍यांच्या वसाहतीतील नरांचे स्थान

मधमाश्‍यांच्या वसाहतीतील नरांचे स्थान

मधमाश्‍यांच्या पोळ्यामध्ये थोड्या मोठ्या आकाराच्या काही मधमाश्‍या असतात. निरीक्षण केल्यास या मोठ्या अाकाराच्या मधमाश्‍या इतर मधमाश्‍यांपेक्षा आळशी, सुस्त दिसून येतात. सतत कार्यरत असणाऱ्या कामकरी मधमाश्‍या या मोठा मधमाशांपेक्षा किती तरी जास्त पटीने कामात व्यग्र असतात. आकाराने जाड, खूप केसाळ असणाऱ्या या माश्‍या म्हणजेच मधमाश्यांच्या कुटुंबातील नर होय. मधनिर्मितीमध्ये तसा नराचा काहीच वाटा नसतो; परंतु वंशसातत्य टिकवण्यासाठी नर महत्त्वाची भूमिका पार पाडतात. राणीमाशीसोबत संयोग झाल्यानंतर नराच आयुष्य संपतं. एक ते दोन महिन्यांचे आयुष्य असलेले नर फुलोऱ्याच्या हंगामात जन्माला येतात. या वेळी निसर्गात अन्नाचा स्रोत भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. नराच्या जन्माचे निसर्गाने उत्तम नियोजन केले आहे. नर स्वतःच्या अन्नासाठी कामकरी मधमाश्‍यांवरच पूर्णतः अवलंबून असतात.

पैदाशीसाठी नराचा उपयोग 

कामकरी मधमाश्‍या आणि राणी मधमाशी यांच्या तुलनेत काही बाबतीत नर मात्र वरचढ ठरतात. नरांना मोठ्या संयुक्त डोळ्यांमुळे तुलनेने अधिक चांगली नजर आणि अधिक कार्यक्षम घाणेंद्रिय असतात.  

वासाची इंद्रिये चांगली विकसित झालेली असतात.  

छातीला जोडलेले पंख अधिक मजबूत आणि कार्यक्षम असतात. पंखांचे स्नायू अधिक बळकट असतात. त्यामुळे उडण्याचा वेगही खूप असतो. उंच आकाशात वेगाने उडणाऱ्या मीलनोत्सुक राणीचा पाठलाग यशस्वीपणे करण्यासाठी त्यांना त्यामुळे मदत होते.

संयुक्त डोळ्यांची तुलना राणी मधमाशी, कामकरी मधमाशी आणि नर मधमाशीबरोबर केली तर कामकरी मधमाश्यांच्या प्रत्येक डोळ्यात सुमारे ६३०० उपभाग, राणीच्या डोळ्यात ३९०० आणि नराच्या डोळ्यात १३००० उपभाग असतात. नराला याचा उपयोग उडणाऱ्या राणीचा यशस्वीपणे पाठलाग करण्यासाठी होतो.  

घाणेंद्रिय अधिक सक्षम असल्यामुळे खूप लांबून, म्हणजे अगदी एक किलोमीटर अंतरावरून सुद्धा राणीचा अचूक शोध नर घेऊ शकतात. 

नरांची जननेंद्रिये चांगली विकसित झालेली असतात त्यामुळे  वीर्यनिर्मिती जास्त होऊ शकते. विशिष्ट रचनेची जननेंद्रिये असतात. समागमाच्या वेळी नराच्या बाह्य जननेंद्रियातून वीर्याचा प्रवाह आत गेल्यानंतर नर आपले मादीच्या योनीमार्गात गेलेले लिंग बाहेर काढू शकत नाही. नराचे लिंग मादीच्या योनीमार्गात अडकले जाते, त्यामुळे राणीपासून नर वेगळा होऊ शकत नाही. नराचे लिंग तुटते आणि नराचा मृत्यू होतो.

नराची शरीररचना 
नर हे शरीरमानाने कामकरी आणि राणी मधमाश्‍यांपेक्षा स्पष्टपणे उठून 
दिसतात. 

जाड, रंगाने गडद काळे आणि खूप आवाज करणारे करतात. नरांना नांगी नसते. नर आकाराने धष्टपुष्ट असले तरी राणीपेक्षा त्यांच्या शरीराची लांबी कमी असते. शरीर अधिक रुंद आणि जास्त केसाळ असते. 

मोठ्या गोल आकाराचे डोके बाजूचे कोपरे मोठ्या दोन संयुक्त डोळ्यांनी व्यापलेले असतात. पंखही तुलनेनं मोठे असतात. 

पायाची रचना जाडजूड असते; परंतु कामकरी माश्‍यांप्रमाणे यावर पराग वाहून आणण्यासाठी परडी नसते. 

सोंडेसारखी जीभ आखूड असते. फुलातील मकरंद गोळा करायला सोंडेचा उपयोग होत नाही. स्वतःला खाण्यापुरताच नर सोंडेचा उपयोग करू शकतो. यामुळेच नरांना कामकरी माशांवर अवलंबून राहावे लागते. 

नर एकटे राहिले तर फार काळ स्वतंत्रपणे जगू शकत नाही.

कामकरी माश्‍यांद्वारे नराच्या पैदाशीवर नियंत्रण
तरुण अाणि विशिष्ट वयाच्या कामकरी मधमाश्‍यांमध्ये विशिष्ट ग्रंथीचा स्राव होतो. ज्याला राजान्न म्हणतात अाणि इंग्रजीमध्ये त्याला ‘रॉयल जेली’ म्हणतात. हे राजान्न खास करून राणी मधमाश्‍यांमध्ये असते. नरांमध्येदेखील अळी अवस्थेत राजान्नाचा स्त्राव होतो. याचा परिणाम म्हणून नराच्या प्रजनन संस्थेची निकोप वाढ होते.

नरांसाठी खास मोठ्या आकाराची घरे बांधली जातात. इतर अळ्यांप्रमाणे पूर्ण वाढीच्या नर अळ्या खाणं बंद करून कोषावस्थेत जातात. नर अळ्यांची या अवस्थेतील घरे सहज ओळखता येतात. वसाहतीत त्यांची घरे मेणाच्या टोपीनं सीलबंद केली जातात. मात्र या टोप्या सपाट नसून थोड्या घुमटाकार असतात आणि टोकावर एक छिद्र असतं. 

राणीच्या अफल अंड्यांतून नरांची पैदास होते त्याचप्रमाणे आपत्कालीन स्थितीत कामकरी माशा प्रजननक्षम होऊन अफल अंडी घालतात व कमजोर नरांची पैदास होते. राणी अंडी घालण्यास अकार्यक्षम झाल्यावरही असे घडते. अशा वेळेस तयार झालेल्या नरांची नीट देखभाल होत नाही. नरांना उपाशी ठेवून त्यांना वसाहतीतून काढून टाकले जाते त्यामुळे वसाहतीवर असलेले एका प्रकारचे ओझे कमी केले जाते.  

वसाहतीतील राणी जुनी झाली असल्यास आणि तिची अंडी घालण्याची क्षमता कमी वा बंद होण्याची शक्‍यता असल्यास नवीन राणीच्या स्थापना करावयाची असल्यास नरांची काळजी घेतली जाते. 

नरांची अंड्यांपासून प्रौढावस्थेपर्यंत वाढ होण्यासाठी २३ ते २४ दिवसांचा कालावधी लागतो. जन्माला आलेल्या कोवळ्या नर माश्‍यांना सुरवातीला कामकरी मधमाशा अन्न भरवतात. मोठे झाल्यावर नर स्वतःची काळजी घेण्यासाठी सक्षम होतात. 

नराचा आहार कामकरी मधमाश्‍यांपेक्षा जास्त असतो. नर मधमाश्‍या मोठ्या प्रमाणात मध खातात, मधासाठी लागणारा कच्चा माल गोळा करणे वा कच्च्या मालापासून मध तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांचा काहीच उपयोग होत नाही. त्यासाठी ते सक्षम नसतात. - पोळ्यावर नरांना फुकट पोसण्याचा भार असतो. यासाठी नराच्या पैदाशीचे नियंत्रण कामकरी माशा करतात. यात राणीची भूमिका नगण्य असते. 

नरांची आवश्यकता भासली तर मोठ्या आकाराच्या घरांची पोळी नव्याने बांधली जातात. अशा वेळी मधमाश्‍यांचा वेळ आणि शक्ती या कामात खर्च होऊन मधोत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता असते. अर्थात योग्य हंगामात नर पैदाशीचं स्वागतच होते. 

नरांचा जन्म झाल्यानंतर ९ ते १२ दिवसांच्या अवधीत ते मिलनयोग्य होतात. मिलन झाल्यानंतर अनावश्‍यक असलेल्या नरांना उपाशी ठेवून मारले जाते किंवा त्यांची मोहोळा बाहेर हकालपट्टी होते आणि पेटीच्या बाहेर ते मरून पडतात. अगदीच क्वचित प्रसंगी नरांचा फलित अंड्यातून जन्म होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com