खात्रीशीर परागीभवनासाठी मधमाश्‍या...

फळधारणेसाठी अनेक पिके मधमाश्‍यासारख्या कीटकांवर अवलंबून अाहेत.
फळधारणेसाठी अनेक पिके मधमाश्‍यासारख्या कीटकांवर अवलंबून अाहेत.

वनस्पतींच्या पुनरुत्पत्तीसाठी निसर्गाने फुलांची योजना केली आहे. फुले ही पुनरुत्पत्तीसाठी उपयुक्त अशा अनेक घटकांची बनलेली असतात. उदा. फुलातील परागदांडे व त्यावरील पराग निर्माण करणारे परागकोश, बीजांड आणि बीजांडनलिका व स्त्रीलिंगी भाग एकाच फुलात असतात. अशा फुलांना द्विलिंगी फुले म्हणतात. काही प्रकारामध्ये वनस्पतीत उदा. भोपळा, कलिंगड, पपई इ. मध्ये पुल्लिंगी फुले आणि स्त्रीलिंगी फुले वेगवेगळी असतात. फुलांवरील पुंकेसर बीजांड नलिकेवरील कळीवर नेऊन पोचविणे याला परागीभवन म्हणतात.

परागीभवनाचे प्रकार 
एकाच फुलातील पराग व बीजांड यांचे मिलन झाल्यास त्यास स्वपरागीभवन म्हणतात. एका झाडावरील फुलांचे पराग त्याच प्रकारच्या पण दुसऱ्या झाडावरील फुलांच्या बीजांड नलिकेवर पडल्यास त्याला परपरागीभवन म्हणतात. 

गव्हासारख्या पिकात स्वपरागीभवन होऊन बीजधारणा होते; तर मक्यासारख्या पिकात वाऱ्यामार्फत पराग एका ताटावरून दुसऱ्या ताटावरील स्त्रीबीजांडावर पडतात व हवेमार्फत परपरागीभवन होते. 

वाऱ्यामार्फत होणाऱ्या परागीभवनासाठी परागनिर्मिती लाखोंच्या संख्येत व्हावी लागते. म्हणजे जितकी पराग संख्या तितकी परपरागीभवन होण्याची शक्यता अधिक असते. या पद्धतीत लाखो पराग वाया जातात. 

बऱ्याच वनस्पतींमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात परागनिर्मिती होत नाही. तसेच त्यांचे परागही वाऱ्यामुळे सहजासहजी उडण्याइतके कोरडे व हलके नसतात. अशा वनस्पती फुलात असताना कीटक, पक्षी यांना आकर्षित करतात. ज्यामुळे कीटक अाणि पक्ष्याच्या माध्यमातून परपरागीभवन घडते. 

परागीभवनासाठी मधमाशा उत्तम स्त्रोत 
परपरागीभवन करणारे अनेक कीटक, पक्षी आणि प्राणी यांमध्ये मधमाशा या सर्वांत जास्त कार्यक्षम आणि खात्रीचे पर परागसिंचन करणाऱ्या समजल्या जातात. याचे मुख्य कारण म्हणजे मकरंद व पराग हेच केवळ मधमाश्‍यांचे खाद्य असते. 

आपले अस्तित्व टिकवण्यासाठी अाणि पुनरुत्पत्ती करण्यासाठी त्यांना दररोज मकरंद व पराग गोळा करावा लागतो. या पराग गोळा करण्याच्या क्रियेत वनस्पतींमध्ये परागीभवन होऊन बीजधारणा होते. 

मधमाश्‍या या सामूहिक जीवन जगणाऱ्या आहेत. एका वसाहतीत १० ते १५ हजार मधमाश्‍या असतात. पुढे त्या वाढून ३० ते ४० हजारापर्यंत पोचतात.

मधमाशा त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीनुसार शिस्तबद्ध पद्धतीने काम करतात. एकाच प्रकारच्या वनस्पतीवरील मकरंद गोळा करताना त्यांच्या अंगावरील पायांवरील केसामुळे त्यावर हजारो परागकण चिकटतात त्यामुळे परपरागीभवन होण्याची १०० टक्के खात्री असते. 

भुंगे, कुंभारीण माशा यांसारख्या माश्‍यांतर्फेही पर पराग सिंचन होते; परंतु त्यांची अपुरी संख्या सातत्याचा अभाव वर्षातील काही विशिष्ट ऋतुतच त्यांचे अस्तित्व असणे त्यामुळे त्यांच्याद्वारे खात्रीने परागसिंचन होत नाही. 

कीटकनाशकांचा वापर वाढत चालला अाहे त्यामुळे कीटकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर पेटीतील मधमाशीपालनामुळे परागीभवनासाठी मधमाशा या उत्तम स्रोत अाहेत. कितीही उत्तम जातीचे बियाणे वापरले किंवा उत्तम व्यवस्थापन केले तरी पिके, फुलावर आल्यानंतर परागसिंचन झाले नाही तर करणारे कीटक उपलब्ध नसतील तर फुले वांझ राहून सुधारित बियाणांपासून ते नंतर केलेला सर्व खर्च वाया जाण्याची शक्यता असते. मधमाशांच्या वसाहतीमुळे फुललेल्या बहुतेक सर्व फुलांमध्ये परपरागीभवन होऊन पिकाचे एकरी उत्पादन ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढते असे संशोधनाअंती दिसून आले आहे.

परागीभवनासाठी अनेक वनस्पती कीटकांवर अवलंबून
अनेक सपुष्प वनस्पती, पर परागीभवन होऊन फळधारणेसाठी किंवा बीजधारणेसाठी मधमाश्‍यासारख्या कीटकांवर अवलंबून असतात. तीळ, मोहरी, जवस आणि सूर्यफूल ही गळीत धान्ये उडीद, तूर, मूग इत्यादी डाळी लसूणघास, बरसीम ही चारा पिके, भोपळा, काकडी, दोडका, पडवळ, तोंडली, कारली इत्यादी भाज्या, संत्रा, लिंबू, मोसंबी, कलिंगड, विविध फळपिके, कापूस, कॉफी इत्यादी पिकांमध्ये बीजधारणेसाठी पर परागीभवनाची आवश्यकता असते. मधमाश्‍यांमुळे वरील पिकांचे एकरी उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत वाढते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com