काळजीपूर्वक हाताळा मधमाश्यांच्या वसाहती

काळजीपूर्वक हाताळा मधमाश्यांच्या वसाहती

मधमाश्यांचा हल्ला का होतो? याचे कारण आपण समजून घेतले पाहिजे. मधमाश्‍या जर हल्ला करतात, तर मधमाशीपालक त्यांना कसे हाताळतात? असा प्रश्न पडतो. मधमाश्‍या आपणहून सहसा हल्ला किंवा डंख करत नाहीत. एखाद्या प्राण्यापासून, शत्रूपासून आपल्या वसाहतीला धोका आहे, असा संशय आल्यास त्या सामूहिकरीत्या शत्रूवर हल्ला करण्यास सज्ज होतात. मधमाश्‍यांमध्ये स्वसंरक्षणासाठी अाणि वसाहतींचे संरक्षण करण्यासाठी विषाची नांगी असते. मधमाश्यांच्या वसाहतीतील संरक्षक मधमाशीला शत्रूची चाहूल लागली, तर त्या आपल्या स्पर्शतंतूमधून एक प्रकारचे संप्रेरक रसायन सोडते. या रसायनामुळे इतर कामकरी माश्‍यांना जागृत करून संभाव्य धोक्याची कल्पना दिली जाते. शत्रू निघून गेल्यास हे रसायन स्रवण्याचे काम थंडावते व इतर मधमाश्‍या आपल्या ठरलेल्या नियमित कामाला लागतात. शत्रू निघून गेला नाही आणि मधमाश्यांच्या वसाहतीला धोका वाढू लागलाय, असे लक्षात येताच संरक्षक मधमाश्‍या शत्रूवर हल्ला चढवितात. 

मधमाश्‍या एकत्रितपणे हल्ला का करतात?
मधमाश्‍यांच्या पोटाच्या शेवटी बारीक अणकुचीदार नांगी असते. मधमाश्‍यांची नांगी मांसल शरीरात सहज शिरते; परंतु नांगीला उलटे काटे असल्यामुळे ही नांगी मांसल भागात रुतून बसते व मधमाश्‍यांना ती बाहेर खेचून घेता येत नाही. नांगी काढून घेण्याच्या प्रयत्नात मधमाश्‍या गोलगोल फिरतात. अखेरीस मधमाशीचे पोट फुटून नांगी व विषाची पिशवी शत्रूच्या शरीरात राहते व मधमाशी उडून जाते; परंतु संपूर्ण पोट फुटून गेल्यामुळे काही मिनिटांत मधमाशी मरते. 

मधमाश्‍यांचा डंख झाल्यावर मधमाश्यांच्या विषाची पिशवी ही डंखासोबत मधमाशीच्या शरीरापासून वेगळी होऊन शत्रूच्या शरीरात रुतून बसलेली असते; मात्र तिच्यात एक प्रकारे जीव असतो, असे म्हणता येईल. ती सतत आकुंचन प्रसरण पावत असते. या वेळी विषाच्या पिशवीतील विष हे डंखामार्फत शत्रूच्या शरीरात जात असते. शरीरापासून वेगळे झाल्यावरसुद्धा सुमारे २० मिनिटे ही प्रक्रिया चालू शकते. त्या विषाच्या पिशवीतून निघणाऱ्या वासामुळे इतर आधीच जागृत केलेल्या माश्‍यांना शत्रूवर हल्ला करण्याचे समजते. 

ज्या ठिकाणाहून हा विशिष्ट वास येत असतो ते त्यांचे लक्ष्य ठरते व सर्व माशा एकत्रितपणे शत्रूवर हल्ला करून त्यास पळवून लावण्याचा प्रयत्न करतात. मधमाश्‍यांना हा विषाचा वास सुमारे १ किलोमीटरपर्यंत येतो. म्हणून बऱ्याच वेळेस मधमाश्‍या घोळक्यात एकाच व्यक्तीचा पाठलाग करतात.

मधमाशीने डंख केल्यावर होणारे परिणाम  
मधमाशीचा डंख झाल्यास त्या ठिकाणी मधमाशीची नांगी राहते व विष शरीरात मिसळते. आग होते आणि वेदना सुरू होतात. सूज येऊ लागते, त्वचा लाल होते. त्वचेला कंड वा गाठ आल्याचे दिसते. 
खूप मधमाश्‍यांनी डंख केला तर घाम येतो, थंडी वाजते, जीभ ओढल्यासारखी वाटते. उलटी होणे व शेवटी बेशुद्ध पडणे ही लक्षणे दिसतात. ज्यांना मधमाश्‍यांच्या विषाची ॲलर्जी नाही अशांना २-५ मधमाश्‍यांचा डंख झाला तरी फार त्रास होत नाही; परंतु ज्यांना ॲलर्जी असते त्यांना १-२ माशांचा डंख झाला तरी खूप सूज येते, ताप येतो ही लक्षणे दिसतात. 

मधमाश्‍या डंख का करतात?
मधमाश्‍यांची वसाहत जेव्हा बिकट परिस्थितीतून जात असते, म्हणजे दुष्काळ, ढगाळ वातावरण, वादळी वारे, अतिउष्ण हवामान, वसाहत उठण्याच्या तयारीत असल्यास, वसाहतीत राणी मधमाशी नसल्यास, कामकरी माश्‍यांनी अफलीत अंडी देण्यास सुरवात केल्यावर, कामकरी माशा चेंगरून मेल्यावर, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वसाहतीचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचा उग्र वास किंवा घामाची दुर्गंधी येत असल्यास किंवा अत्तर किंवा सुवासिक तेलाचा वास येत असेल, तरी मधमाश्‍यांचा डंख होण्याची शक्यता बळावते. मधमाश्यांच्या वसाहती जवळ जोरजोराच्या हालचाली झाल्यास मधमाश्‍या डंख करतात.

मधमाशीपालकांनी घ्यायची काळजी
मधमाश्यांनी डंख केला तरी आपल्याला काही होत नाही अशा उत्साहात वसाहती तपासू नयेत.
वसाहत हाताळणी आत्मविश्वासाने, सावकाश व हळुवारपणे करावी.
वसाहत तपासताना बुरखा, हातमोजे अाणि धूम्रकाचा वापर करावा.

उपाययोजना
डंख झालेल्या माणसाला तातडीने मधमाश्यांच्या वसाहतीपासून दूर न्यावे.
काटा रुतला आहे का ते पाहून प्रथम काटा योग्य पद्धतीने काढावा.
लक्षणे तीव्र होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने अाैषधोपचार सुरू करावेत. 
मधमाश्यांच्या विषाची ॲलर्जी असल्यास वसाहत तपासणी करू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com