‘जीआय’च्या माध्यमातून भिवापुरी मिरचीचे पुनरुज्जीवन

‘जीआय’च्या माध्यमातून भिवापुरी मिरचीचे पुनरुज्जीवन

मागील काही भागांपर्यंत आपण ईशान्य भारतातील “जी आय” प्राप्त केलेल्या मिरच्यांच्या यशोगाथा पाहिल्या. तिखटपणा, त्यांचा आकार आदी वैशिष्ट्यांनी त्यांना “जी आय” मिळवून दिला. त्यातून देश-परदेशातील बाजारपेठ खुली करून दिली. पन्नास ते ५५ रुपये प्रति किलो दराने जपानसारख्या देशात या भारतीय मिरच्यांनी आपली जागा मिळवली. भारताचा ईशान्य भाग मुळातच नैसर्गिक साधनसमृद्धीने सुसज्ज आहे. त्यात तेथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके व तीही सेंद्रिय पद्धतीने घेताना “जी आय” प्राप्त करण्यात बहुमोल योगदान दिले. जीआयचा ‘क्वालिटी टॅग’ मिळवला. त्यांच्या यशाची गाथा महाराष्ट्र व कर्नाटकातील शेतकऱ्यांनाही प्रेरणादायी ठरली. त्यातूनच ब्याडगी या कर्नाटक राज्यातील तर भिवापुरी या महाराष्ट्रातील मिरचीची नोंद ‘जीआय’साठी झाली.

भिवापुरी मिरचीची कथा 
नागपूर जिल्ह्याने देशाला दोन “जी आय” दिले आहेत. एक नागपूरच्या संत्र्यांसाठीचे व दुसरे भिवापुरी मिरचीसाठीचे. नागपूरची संत्री सर्वांनाच चांगली परिचित आहेत. त्यातूनच नागपूरला ‘ऑरेज सिटी’चा मान मिळाला. त्याचबरोबर जेवणाला चव आणणाऱ्या वैदर्भीय ठेचातील महत्त्वाचा घटक म्हणजे भिवापूर मिरचीचा आहे. नागपूर शहरापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या या मिरचीची “जी आय” कथा विशेषच आहे. अक्षरशः नामशेष होत चाललेल्या या मिरचीचे “जी आय” मुळे पुनरुज्जीवन झाले आहे. इतर मिरच्यांपेक्षा भिवापूरच्या मातीत येणारी ही आगळीवेगळी लाल मिरची परिपक्व होण्यास ३० ते ४० दिवस अधिक घेते. विदर्भातील शेतकऱ्याला त्यामुळे जास्तीचा काळ तग धरणे अवघड होत चालले अाहे. म्हणूनच कमी कालावधीतील अन्य पिकांकडे त्याने धाव घेतली. एकेकाळी निर्यातीची क्षमता जपणारी भिवापुरी मिरची नामशेष होऊ लागली. 

जीआयसाठी पुढाकार 
भिवापूरचे प्रगतिशील शेतकरी डॉ. नारायण लांबट, अन्य शेतकरी, कृषी विभागाचा आत्मा विभाग, विभागातील श्रीमती भोयर यांनी भिवापूर मिरचीला टिकविण्याच्या दृष्टीने “जी आय” मिळविण्यासाठी मोठे योगदान दिले. या मिरचीच्या जीआय प्राप्तीसाठी अभ्यास करीत असताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी माझ्यासमोर आल्या. या मिरचीला असलेला लाल भडक रंग, मात्र तिचा तिखटपणा न झोंबणारा आहे हे लक्षात आले.

वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म 
“स्पाइस बोर्ड आॅफ इंडिया” यांच्या म्हणण्यानुसार या मिरचीचा तिखटपणा भारतातील इतर महत्त्वाच्या तिखट मिरच्यांपेक्षा कमी आहे. मात्र रंग इतर काही “जी आय” मिळालेल्या मिरच्यांपेक्षा जास्त आहे. या रंगाचे प्रमाण किंवा निकष निश्चित करण्यासाठी अमेरिकन रंगशास्त्र प्रणालीचा वापर केला. याला आस्ता व्हॅल्यू असे म्हणतात. (ASTA American Spice Trade Association). अभ्यासात दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा मिळाला की ही मिरची गर्भवती महिलांसाठी अनुकूल राहू शकते. कारण जास्त खाण्याने ‘ॲसिडिटी’ होणार नाही हे स्पष्ट होते. म्हणजेच दिसायला लाल भडक पण तिखटाला कमी अशा गुणधर्मांमुळे या मिरचीला परदेशातून मागणी येऊ लागली. या संधीचा फायदा चंद्रपूर येथील एका डॉक्टरने घेत तब्बल १० वर्षे ही मिरची श्रीलंकेला निर्यात केली. मात्र पुढे अनेक अडचणी व कमी होत गेलेले क्षेत्र व उत्पादनामुळे त्यांनी निर्यात थांबवली. पण आता “जी आय”ने सुशोभित झालेली ही मिरची भारतातील इतर “जी आय” मिरच्यांच्या रांगेत येऊन बसली आहे. योग्य मार्केटचे धोरण कदाचित या विदर्भातील तिखटाला अधिक उंचावर घेऊन जाऊ शकेल.

भिवापूर मिरचीचे भौगोलिक महत्त्व
जमीन - भिवापूर तालुक्यातील जमिनींची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली असून, तेथील जमीन सूक्ष्म मूलद्रव्यांनी समृद्ध आहे. इथल्या मातीमध्ये लोह, मंगल व तांबे यांची उपलब्धता जास्त असल्याने मिरचीला अधिक लाल रंग प्राप्त होतो.

हवामान - मिरचीसाठी उष्ण, आर्द्र वातावरणाची व स्वच्च सूर्यप्रकाशाची गरज असते. भिवापूर तालुक्यात असेच वातावरण आहे.

पर्जन्यमान - या भागात १२५० ते १३५० मी.मी. पाऊस पडत असल्यामुळे खरीप हंगामात मिरचीला मुबलक पाणी मिळते.

इतर मिरच्यांपेक्षा असलेला वेगळेपणा
मिरचीमध्ये कॅपसेसिनॉइड्स हे रसायन जितक्या अधिक प्रमाणात तितका त्यातील तिखटपणा अधिक असतो. रंगाच्या आणि तिखट पणाच्या बाबतीत गुंटूर, ब्याडगी या मिरच्यांच्या वाणांपेक्षा भिवापूर मिरची सरस ठरते. भिवापूर मिरची पावडरीला किडी- रोगांचा प्रादुर्भाव होत नसल्याने ती एक वर्षापर्यंत साठवता येते.

- गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ 
(लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com