हंगामानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे

विनोद इंगोले
सोमवार, 24 जुलै 2017

पवनार तालुक्यातील शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपणामुळे स्थलांतर, कोरडवाहू पिकांवरच भिस्त

पवनार तालुक्यातील शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपणामुळे स्थलांतर, कोरडवाहू पिकांवरच भिस्त

वर्धा - एका पोरीचं लगन, एकीचं बायतपन अन् पोराचं शिक्षण, दाय दान्याले पैसे अन् हे सारं भागल्यावर शेतीच्या पेरणीची सोय करा लागते. पैसे यायचा रस्ता एकच, तो म्हणजे शेती अन् जायाचे रस्ते तर चार- चार, मग कसं भागील, तुम्हीच सांगा? असा प्रश्‍न पवनार येथील सूर्यकांत ताजने यांनी उपस्थित केला. शेती उत्पन्नातून भागत नसल्याने हंगाम संपल्यावर गावातून स्थलांतर करीत शेतकरी कामधंद्याच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. परिणामी महात्मा गांधी यांच्या रहिवासाने प्रसिद्ध असलेल्या वर्धा जिल्ह्यात खेडी ओस पडत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यातील पवनारची देखील वेगळी ओळख आहे. विनोबा भावे यांनी आपल्या आयुष्यातील काही काळ या भागात घालविला. याच पवनारचे रहिवासी असलेल्या सूर्यकांत यांच्यावर हंगाम संपल्यावर पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे धाव घेण्याची वेळ आली आहे. सूर्यकांत यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती. सूर्यकांत यांचे वडील रामचंद्र यांनी कधीकाळी शेतात विहीर खोदली होती. त्या वेळी देखील पैसे नसल्याने कुटुंबातील सदस्यांकडूनच त्यांनी विहिरीचे बहुतांश खोदकाम करून घेतले. त्या विहिरीला मात्र पाणीच लागले नाही. विहीर खोल करायला पैसे नाहीत म्हणून कोरडवाहू पिकांवरच त्यांची भिस्त राहते. 

पोटाची सोय होन मुश्‍कील तथी जमिनीची सोय कसी घ्याव?
कोरडवाहू क्षेत्रात कपाशी आणि त्यात तुरीचे आंतरपीक ते घेतात. ४ ते ५ क्‍विंटल कपाशीची उत्पादकता होते. पैशांची सोय अशील तर खाद टाकता येते. खाद भेटलं त कापूस जादा येते, नाई त काई येत नाई. मग कापसावर लावलेला पैसा आणि कापूस ईकून भेटलेला पैसा याची वजाबाकी सारकीच होते. म्हणून उन्हाळ्यात मग लोकायच्या कामावर जा लागते, सिमेटाचे टोपले उचलाले, आमी दोघं बी नवरा-बायको या वयात मग कामावर निगतो, पोट त भरा लागील ! चाल पडली तसं पीक येते, सोय असील त कोरडवाहूत काई तरी होते. पण, अथी पोटाची सोय होन मुश्‍कील तथी जमिनीची सोय कसी घ्याव? असा प्रश्‍न ५५ वर्षं वयाच्या ताजने यांनी उपस्थित केला. २०१६ मध्ये सूर्यकांत यांनी मोठ्या मुलीचं लग्न केलं. दुसऱ्या मुलीचं लग्न या वर्षी एप्रिल २०१७ मध्ये झालं. इकून तिकून पैसे दोनी बी लगनासाठी आणले. त्यायची देणी बाकीच होती अन् पोराची बारावी झाली. पोराले चांगल्या कॉलेजात ॲडमिशन द्याले ३० हजार रुपये भरा लागत होते डोनेशन म्हणतात ते ! ते पैसे बी उसनवारी करूनच आणले. मग असे उसनवारी केलेले लोकायचे पैसे पयले द्या लागतात. तवा दुसऱ्या वर्षात पुना मागाची सोय राहते. 

बैलजोडी बी भाड्यानं
बैलजोडी भाड्यासाठी हजार ते बाराशे रुपये खर्चा लागते. दोन एकरांवरील डवरणीचे काम एक दिवसात करते. पाच एकरांसाठी तीन दिवस लावते. दिवस वाढले तसे पैसे बी वाढतात. गावातूनच बिजाईचे (बियाण्याचे) पैसे पुढच्या वर्षी देईल या बोलीवर आणले. बिजाईचेच पैसे उधार असल्यानं खत उधारीवर आणण्याची हिंमत झाली नाही, असे सूर्यकांत यांनी सांगितले. २०० रुपये रोजंदारी आहे मजुराची, खत टाकासाठी २०० रुपये थैली मजुरी द्या लागते. अथीबी संपूर्ण वजाबाकी करून मजूर लुटून जाते, मंग बारा महिने जगायचं कसं हे समजत नाई. ग्रामपंचायतीकडून आवास योजनेचा लाभ का घेतला नाही? असे विचारल्यावर त्यांनी तथी का आमची दाय शिजते? असा प्रतिप्रश्‍न केला.

बॅंक उभी करीत नाई; धनदांडग्यायचंच आईकते
पोरीचं लग्न, बाळंतपण, पोराचं शिक्षण याच्यासाठी पैसा लागला. म्हणून गेल्यावर्षी एक लाख रुपयांचं पीककर्ज भरू शकलो नाई. कर्ज माफ झालं असं माईत झाल्यावर बॅंकेत गेलो. मागच्या वर्षीचं कर्ज भरलं नाई तर या वर्षी कर्ज कसं देणार? असा सवाल सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, पवनार शाखेच्या अधिकाऱ्यानं उपस्थित केला. कर्ज माफ झालं असतं त कास्तकाराच्या रांगा लागल्या असत्या, असं म्हणून त्यानं बोळवण केली. अग्रीम दहा हजार रुपयांच्या रकमेसाठी पण बॅंकेनं टोलवाटोलवी केली. मायासारख्या सामान्य शेतकऱ्याले बॅंक उभी करीत नाई, फक्‍त धनदांडग्यायचंच आईकते, असे खिन्न मनाने सूर्यकांत सांगत होते.

Web Title: agro news In the city to fill the stomach during the harvest