देशी गोसंगोपनाचे सांभाळले व्रत

 अभिजित डाके 
मंगळवार, 18 जुलै 2017

सांगली येथील श्री पांजरपोळ संस्थेने देशी गोपालनाचे व्रत काही वर्षांपूर्वी घेतले. आजच्या महागाईच्या काळातही खर्चाचा विचार न करता सुमारे २१० गायींचा सांभाळ पोटच्या पोरांप्रमाणे करून हे व्रत टिकवले आहे. तीन ठिकाणी संस्थेने जागा घेत आपला विस्तार साधला आहे. गायींच्या दुधाची विक्री केली जातेच, शिवाय बाहेरून तूप आणून त्याचीही मागणीनुसार विक्री केली जाते. 

सांगली येथील श्री पांजरपोळ संस्थेने देशी गोपालनाचे व्रत काही वर्षांपूर्वी घेतले. आजच्या महागाईच्या काळातही खर्चाचा विचार न करता सुमारे २१० गायींचा सांभाळ पोटच्या पोरांप्रमाणे करून हे व्रत टिकवले आहे. तीन ठिकाणी संस्थेने जागा घेत आपला विस्तार साधला आहे. गायींच्या दुधाची विक्री केली जातेच, शिवाय बाहेरून तूप आणून त्याचीही मागणीनुसार विक्री केली जाते. 

अलीकडील काळात वाढलेला खर्च पाहाता जनावरांचे संगोपन आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. प्राप्त परिस्थितीत शेतकरी नफा-तोट्याचा विचार करीत दुग्धव्यवसायाचे अर्थशास्त्र जुळवायचा प्रयत्न करीत आहेत. अशाच महागाईच्या काळात काही संस्था देखील खर्चाचा विचार न करता जनावरांप्रती असलेले प्रेम व्यक्त करताना त्यांचे संगोपन करताना दिसत आहेत. त्यापैकीच एक संस्था म्हणजे सांगली शहरातील श्री पांजरपोळ संस्था. शहरातील प्रसिद्ध गणपती मंदिरानजीकच संस्थेचे कार्यालय आहे. 

संस्थेची गोसंगोपनातील वाटचाल 

सांगली शहरात साधारण १९०५ मध्ये पांजरपोळ संस्था सुरू झाली. या संस्थेच्या विकासासाठी गणपती पेठेतील व्यापारी, जैन समाज आदींनी पुढाकार घेतला असे सांगण्यात येते. सुमारे १० ते १५ गायी सांभाळण्यासाठीही घेतल्या. सन १९७२ पासून प्रा. के. ए. आवटी यांच्याकडे संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आली. त्यानंतर संस्था हळूहळू वाढीस लागली. सुमारे ३५ ते ४० वर्षे आवटी यांनी संस्थेचे कामकाज पाहिले. त्यानंतर अण्णा सखाराम राजमाने यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. संस्थेचे कामकाज वाढत होते. हळूहळू संस्थेने जागा विकत घेतली. आज सांगली शहराबरोबर कवठेपिरान (ता. मिरज), जुना बुधगाव रस्ता या ठिकाणी संस्थेचा विस्तार झाला आहे. आज त्यातूनच २१० गायींच्या संगोपनाची जबाबदारी संस्थेने उचलली आहे.  

निधीचे संकलन 

संस्था तर स्थापन झाली. त्यावेळी शहरातील प्रसिद्ध गणपती पेठ, कापड पेठ, वखारपेठ, मार्केट यार्डमध्ये विविध खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असायची. त्यावेळी व्यापाऱ्यांकडून पांजरपोळ संस्थेच्या मदतीसाठी एक टक्का कर आकारणी केली जायची. बाजार समितीने देखील यासाठी हातभार लावला. अशा रितीने संकलित झालेला निधी पांजरपोळ संस्थेकडे वर्ग केला जायचा. या पद्धतीने संस्थेच्या उत्पन्नात भर पडत गेली.  

पोटच्या पोरांप्रमाणे गोसंगोपन   
गेल्या अनेक वर्षांपासून गायींचे संगोपन करण्यासाठी संस्थेच्या विश्वस्तांची (ट्रस्टी) मोठी मदत होत असते. निधी कोणत्याही परिस्थितीत कमी पडू नये याची काळजी प्रामुख्याने घेतली जाते. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माधव शेटजी आहेत. रमेश राजमाने उपाध्यक्ष, प्रमोद महावीर सचिव तर रवींद्र जाखोटिया खजिनदार आहेत. यासह प्रशांत पाटील, दादासोा तामगावे, श्रीनारायण सारडा, राधेशाम बजाज, शशिंकात आवटी, तुकाराम मोहिते अशा प्रत्येक सदस्याकडे वेगवेगळी जबाबदारी असते. यातील राजमाने व्यवसायाने ‘चार्टर्ड अकाउंटंट’ आहेत. यामुळे कार्यालयीन तसेच कायदेशीर कामे यांसह विविध अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. संस्थेकडील जनावर म्हणजे माझ्या घराच्या दावणीला बांधलेलेच जनावर आहे अशी भावना प्रत्येकाकडे असते. यामुळे पोटच्या पोरांप्रमाणे गायींचा सांभाळ केला जातो. 

असा मिळतो निधी 

सांगली जिल्ह्यासह अन्य भागांतील व्यापाऱ्यांसह अनेक देणगीदार पांजरपोळ संस्थेला निधी देण्यासाठी नेहमीच इच्छुक राहतात. एका दिवसाचा चाऱ्याचा खर्च किंवा स्वइच्छेने रोख रक्कम अशी रक्कम दिली जाते. काही जण चारा पोहोच करतात. 
 

दुधाची विक्री जागेवरूनच 

संस्थेत बहुतांशी गायी या देशी किंवा गीर आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सध्या देशी गायीच्या दुधाला मागणी वाढत आहे. त्यामुळे शहरातील अनेक ग्राहक दूध घेण्यासाठी येथे येतात. त्यामुळे संस्थेला ग्राहक शोधण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागत नाहीत. एकेकाळी रोजचे दूध संकलन केवळ २० लिटर होते. त्यात टप्प्याटप्प्याने वाढ होत ते आज १०० ते १२५ लिटरपर्यंत पोचले आहे. एकवेळ ते २०० लिटरपर्यंतही गेले होते. दुधाची विक्री ४० रुपये प्रति लिटर दराने होते. सध्या दुधाळ गायींची संख्या १० ते १५ अाहे. 

गायीचे तूपही उपलब्ध 
दुधाबरोबर तूपदेखील संस्थेने उपलब्ध केले आहे. राजस्थान सरकारची पथमेडा ही संस्था कार्यरत आहे. याच संस्थेकडून फार मोठ्या प्रमाणात नाही मात्र काही प्रमाणात तूप मागविले जाते. अनेक वर्षांपासून ही परंपरा संस्थेने जपली आहे. 

वळूची आठवण 
अलीकडील काळातच येऊन गेलेल्या प्रसिद्ध वळू या मराठी चित्रपटात धुमाकळ घालताना दिसलेला वळू याच पांजरपोळातील होता. यापूर्वी हरिपूर येथील शिवऱ्या बैलाने टकरीच्या मैदानात नावलौकिक मिळवून सांगली जिल्ह्याची पताका पश्‍चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात फडकवली होती. अशीच परंपरा या वळूने ठेवली. दहशत बसावी असे लालसर डोळे, जाडजूड शिंगे आणि त्यामागे वशिंड, मजबूत देहयष्टी असा हा वळू होता. सांगलीची वेगळी ओळख राज्यभर पोचवणारा हा वळू नुकताच काळाच्या पडद्याआड गेला हे सांगताना संस्थेतील रवींद्र गोखले भावुक झाले. 

संस्थेच्या कामकाजावर दृष्टिक्षेप 
संस्थेची ८६ एकर शेती. या ठिकाणी ३० एकर ओढापड जमीन. उर्वरित क्षेत्रात 
चारा पिकांची लागवड   
तीन ठिकाणी होणारे संगोपन असे
कवेठपिरान- ९० गायी 
सांगली - ६०- दुधाळ गायी 
जुना बुधगाव रस्ता - ८० गायी  
आजारी पडलेल्या तसेच कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायी संस्थेत आणल्या जातात. 
काहीजण आपल्याकडील दुधाळ गायीदेखील संस्थेकडे सांभाळण्यासाठी देतात. 
पाड्यांचे संगोपन होते तर खोंड झाल्यास ते शेतकऱ्याला सांभाळण्यास दिले जाते, अथवा त्याची विक्री केली जाते.  
सकाळी सहाच्या सुमारास गोठ्याची स्वच्छता व गायींना धुतले जाते. 
प्रति गायीस सरासरी १५ ते २० किलो चारा- सकाळी व दुपारी 
दररोज गाईंची आरोग्यविषयक तपासणी, वेळेत लसीकरण आणि औषधोपचार 

उत्पन्न- आकडेवारी (वार्षिक) 
संस्थेला वर्षाकाठी मिळणारी रक्कम- देणगी स्वरूपात- सुमारे एक ते दीड लाख रु.
दूध विक्री- ३० ते ३५ हजार रु. 
शेणखत विक्री- ६५ ते ७० हजार 
तूप- प्रति किलो- ९०० रु.

आम्ही गायींचा सांभाळ करताना संस्थेला होणार आर्थिक फायदा किंवा तोटा यांचा विचार कधीच करीत नाही. संस्थेवर विश्वास असल्यानेच देणगी देण्याऱ्यांची संख्या देखील अधिक आहे ही जमेची बाजू म्हणता येईल. 
- माधवदास शेटजी, अध्यक्ष, श्री पांजरपोळ संस्था सांगली.

Web Title: agro news cow managed