उच्चशिक्षित तरुण घडवतोय शेतीतच ‘करिअर’

उच्चशिक्षित तरुण घडवतोय शेतीतच ‘करिअर’

अलीकडील काळात शेतीतील जोखीम वाढली आहे. ती कमी करण्याच्या दृष्टीने अनेक शेतकरी बहुविध पीकपद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. उच्चशिक्षित गणेश लंबे (माळखेड जि. बुलडाणा) हे त्यापैकीच एक शेतकरी. आपल्या २१ एकरांत हंगामी, एकवर्षीय पिके आणि बीजोत्पादन अशी सांगड घालून बहुतांश पिकांना त्यांनी जागेवरच मार्केट मिळवले आहे. त्यातून शेतीचे अर्थकारण सुधारले आहे. उत्कृष्ट पाणी नियोजनातून पिकांना संरक्षित आधारही दिला आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील काही भागांत मागील काही वर्षे सरासरी इतकासुद्धा पाऊस होत नाही. पाणीपातळी सातत्याने खोल जात असून प्रकल्पातील पाण्यावरही मर्यादा अाल्या अाहेत. याचा थेट परिणाम सिंचनावर होत अाहे. अनेकांना बारमाही सिंचन बंद करून हंगामी अोलिताची पिके घ्यावी लागत अाहेत. अशा स्थितीत काही शेतकरी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून पिकांची उत्पादकता टिकवून ठेवण्याचे प्रयोग करीत अाहेत. मेहकर तालुक्यातील माळखेड (जि. बुलडाणा) येथील गणेश लक्ष्मण लंबे हा तरुण त्यापैकीच एक म्हटला पाहिजे. बीएबीपीएड तसेच अर्थशास्त्रात एमए प्रथमवर्ष असे त्यांचे शिक्षण झाले आहे. नोकरी करावी म्हटले तरी ‘डोनेेशन’चा अडसरमध्ये यायचा. अखेर शेतीलाच पूर्णवेळ द्यायचे ठरले. 

शेतीत केलेले बदल
माळखेड शिवारात पूर्वी पाण्याची स्थिती चांगली होती, परंतु अाता पाणी दुर्मिळ होत चालले अाहे. असंख्य विहिरी कोरड्या पडल्या. काही विहिरींना तास अर्धा तास वीजपंप चालेल इतकेच पाणी येते. अशीच स्थिती गणेश यांच्याकडेही होती.  

पाण्याचे स्राेत केले तयार
    पाणी नसल्याने बागायती पिके घेणे शक्य होत नसल्याची जाणीव गणेश व कुटुंबीयांना झाली. 
    मग पाण्याचे स्राेत तयार करण्यासाठी दोन शेततळी खोदली. यातील एक ५० लाख लिटरचे तर दुसरे १० लाख लिटर क्षमतेचे अाहे.
    शेतापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मोहखेड लघुप्रकल्पाला लागून शेतात विहीर खोदली. तेथून जलवाहिनी टाकून पाणी शेतापर्यंत अाणले. हे पाणी २५ लाख लिटर क्षमतेच्या सिमेंटच्या टाकीत साठवले जाते. वीजपुरवठा सुरू असेल त्या वेळी टाकी अव्याहत भरण्याचे काम सुरू असते. त्यानंतर दाब प्रणालीचा वापर करून पाणी ठिबकच्या साह्याने पिकांना दिले जाते. 

संमिश्र पीकपद्धती फायदेशीर
       शेती २१ एकर शेती. त्यात दरवर्षी खरिपात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, तूर तर रब्बीत हरभरा -सर्व पिकांची उत्पादकता टिकवून ठेवण्याचे सातत्य. उदा. कपाशी एकरी २० क्विंटल, सोयाबीन ९ ते १० क्विंटल, तूर ८ ते १० क्विंटल

    मागील वर्षी अडीच एकरांत सोयाबीन-तूर पीक पद्धतीत तुरीचे २५ क्विंटल उत्पादन.

बीजोत्पादनावर भर
रब्बीत सुमारे पाच ते सात एकरांत कांदा बीजोत्पादन घेतले जाते. यात दोन कंपन्यांसोबत करार केले आहेत. एकरी ती ते पाच क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. क्विंटलला ३० हजार ते ४० हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. मागील वर्षी खासगी कंपनीसाठी प्रथमच भेंडीचे १० गुंठ्यांत बीजोत्पादन घेतले. त्यातून फार काही हाती पडले असे नाही. मात्र याच अनुभवाच्या जोरावर गणेश आता पुढील बीजोत्पादनातून नफा वाढवण्याची तयारी करतील.   

सिंचन सुविधेने तारले
दिवसेंदिवस पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत अाहे. अशा परिस्थितीत साठवलेल्या पाण्याचा योग्य विनियोग व्हावा, यासाठी टप्प्याटप्प्याने संपूर्ण शेतात ठिबकची व्यवस्था केली. त्यातून मजुरांची गरज कमी झाली. पाण्याची किमत किती मोठी अाहे हे या वर्षी बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना कळाले. या हंगामात अनियमित पाऊस झाल्याने अनेकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले; परंतु दुसरीकडे गणेश यांनी अडचणीच्या काळात शेततळ्यातील पाणी सोयाबीन, तुरीला दिले. यामुळे अाजूबाजूच्या शेतकऱ्यांचे पीक सुकत असताना त्यांची सोयाबीन, तूर अत्यंत चांगली अाहे. सोयाबीनला भरमसाठ शेंगा लगडल्या अाहेत. या वर्षी तर ठिबकवर सोयाबीन व तूर आहे.  

हळदीत सातत्य
हळदीचे पीक ही लंबे यांची अाणखी एक अोळख अाहे. गेली अनेक वर्षे ते हे पीक घेतात. पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने यंदा दोन एकरांत लागवड केली. वाळवलेल्या हळदीचे एकरी २० ते २२ क्विंटल उत्पादन मिळते. पुढील हंगामासाठी घरचेच बेणे वापरले जाते. त्यादृष्टीने बेणे साठवण्यासाठी मोठा हौद तयार केला अाहे. त्यास चारही बाजूंनी सिमेंटच्या भिंती घेतल्या. चिंचेच्या झाडाखाली हाैद असल्याने बियाण्याला सावली व योग्य अार्द्रता मिळते. हळदीसाठी बॉयलर व पॉलिशर यंत्रदेखील अाणले आहे. आपले काम अाटोपल्यानंतर ही यंत्रे इतरांना भाडेतत्त्वावर देतात. यातूनही चांगली मिळकत होते.
 
घरची साथ
शेतातील सर्व कामे गणेश व त्यांची पत्नी असे दोघेच मुख्यत्वे सांभाळतात. एक भाऊ नोकरीला असून ते चिखली येथे राहतात. उच्चशिक्षण घेऊन नोकरी करता अाली असती मात्र घरचीच शेती चांगल्या पद्धतीने करायचे ठरवून गणेश यांनी कामांची आखणी केली. त्यातून संपूर्ण शेती सिंचनाखाली अाणली. शेतात कामासाठी दररोज पाच ते सहा मजूर असतात. वर्षभर मजुरांना रोजगार निर्मिती करता अाल्याचे समाधान गणेश यांना आहे. शेतमाल साठवण्यासाठी गोदाम, चारा कापण्यासाठी कटर, मशागत व पेरणीसाठी अाधुनिक यंत्रे ते वापरतात. उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने निराशा बाळगणाऱ्या अनेकांना गणेश यांची शेती आदर्शवत अाहे.    - गणेश लक्ष्मण लंबे, ९७६५४३९३६३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com