ताकारी, टेंभू, म्हैसाळ सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील पिके धोक्यात

अभिजित डाके
बुधवार, 19 जुलै 2017

सांगली - जिल्ह्यातील दुष्काळी भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील डाळिंब, ऊस, द्राक्ष शेती धोक्यात आली आहे. अजून पंधरा दिवस अशीच परिस्थिती राहिली, तर पिके सोडून देण्याशिवाय पर्याय नाही. पिके वाचवण्यासाठी ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजना सुरू करून पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत. पाणी सोडले नाही तर आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दर्शविली आहे.

जिल्ह्यात तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज, जत तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भासू लागली आहे. पावसाने दडी मारल्याने द्राक्षाची काडी धोक्यात आली आहे, तर डाळिंब शेती संकटात सापडली आहे. डाळिंब आणि द्राक्ष उत्पादकांना टॅंकरने पाणीपुरवठा केल्याशिवाय पर्याय नाही; मात्र जिल्ह्यातील महत्त्वाच्या असणाऱ्‍या ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजना सध्या थकीत वीज बिलापोटी या सिंचन योजना बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुले थकीत वीज बिल भरल्याशिवाय या योजना सुरू करण्यात येणार नाहीत. परिणामी पाणीपट्टी वसुलीसाठी संबंधित विभागाने लक्ष दिले नसल्याने थकबाकीत वाढ झाली आहे.

परिणामी, पाऊस नसल्याने खरीप हंगाम हाती लागणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यात फळबागा आणि कालवा क्षेत्रावर आधारित ऊस पिकाला मोठा धोका निर्माण झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी पिकांसाठी लाखो रुपयांची कर्जे घेतली असल्याने घेतलेली ती कशी फेडायची, असा प्रश्न शेतकऱ्यांच्यासमोर उपस्थित राहिलेला आहे. सध्या धरण क्षेत्रात पाऊसही आहे. त्यामुळे काहीशा प्रमाणात धरणातून पाणी सोडले जाते आहे. यामुळे जिल्ह्यातील सिंचन योजना सुरू करून द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. जत तालुक्यात पाणी नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी डाळिंबाचा बहारदेखील धरला नाही. खरीप हंगामातील पाणी उपलब्ध नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे, तर काही ठिकाणी पिके दुपार धरू लागली आहेत. सध्या डाळिंब आणि द्राक्ष पिकांना पाण्याची आवश्यकता नाही; परंतु पुढच्या पंधरा ते वीस दिवसांत पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनेचे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पाऊस नसल्याने पिकांची अवस्था गंभीर झाली असून, सध्या पाण्याची गरज आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी कमालाची घटली आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे.
- भाऊसो नागरगोजे, नरवाड, ता. मिरज, जि. सांगली.

गावातील सर्व तलाव कोरडे पडले आहेत. येत्या दोन तीन दिवसांत पाऊस न झाल्यास उडीद पीक वाया जाण्याच्या स्थितीत आहे. एेन पावसाळ्यात पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही.
- संभाजी बोर्डे, शेगाव, ता. जत, जि. सांगली

Web Title: agro news crop danger in takari, tembhu, mhaisal irrigation scheme area