दुबार, तिबार पेरणी केलेली पिके होरपळली

पाथरगव्हाण बु. ता. पाथरी - येथील अशोक घाडगे यांनी वाढ खुंटलेले कपाशीचे पीक शुक्रवारी (ता.१८) मोडून टाकले.
पाथरगव्हाण बु. ता. पाथरी - येथील अशोक घाडगे यांनी वाढ खुंटलेले कपाशीचे पीक शुक्रवारी (ता.१८) मोडून टाकले.

यंदा लईवेळा काळझरं ढगफुटीसारखं आभाळ आलं तव्हा लई पाऊस येईल या भीतीनं घर गाठायचं, पण ते खाली पडलंच नाही. अंगावरचे कपडे ओले होण्याएवढादेखील पाऊस पडला नाही. रानात अजून मसार (मोकळी माती) आहे. चिखल झालाच नाही, अशा शब्दांत पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या पट्ट्यातील हादगाव आणि बाभळगाव मंडळातील शेतकऱ्यांनी पडलेल्या पावसाचं वर्णन त्यांच्या शब्दांत सांगितलं. शेतातील उभ्या निस्तेज पिकाप्रमाणेच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरची रया गेली आहे. दुबार, तिबार पेरणी केलेली पिके जागीच होरपळून गेली आहेत. त्यांना आता पाणी देऊन उपयोग नाही. म्हणून पिकांवर कुणी वखर फिरवत आहे. कुणी त्यामध्ये जनावर चरायला सोडत आहे. रब्बी पिकांच्या पेरणीसाठी रानं मोकळी केली जात आहेत.

हादगाव मंडळातील वरखेड, पाथरगव्हाण बु., पाथरगव्हाण खुर्द, गोपेगाव, मरडसगाव, कासापुरी, जवळा झुटा, नाथरा, निवळी, सारोळा आदी गावशिवारातील खरीप पिकांवर यंदा सक्रांत आली आहे. २०१५ च्या दुष्काळात उत्पादन घटलं होतं. परंतु यंदा जून महिन्यामध्ये बरसल्यावर पेरणी केली, पण त्यानंतर पाऊस गायब झाला. अनेक गावांत ४५ ते ६० दिवस एवढा दीर्घ खंड पडला. मूग, उडीद, सोयाबीन अडीच-तीन महिन्यांच्या कालावधीत येणारी पिकं जागेवरच होरपळून गेली आहेत. बोंड लागण्याआधीच कपाशीची पऱ्हाटी झाली. वितभर उंचीच्या कपाशीच्या झाडाला पाते, फुले, दोन-चार बोंडं लागली आहेत. पुन्हा बोंडे लागणार नाहीत. एवढ्या बोंडांची वेचणी करायला कुणी येणार नाही. पीक पंचनाम्याची वाट पाहिली, पण कुणी आले नाही. कुठवर वाट पाहायची. खरिपात काहीच हाती लागले नाही. 

बाभळगाव मंडळातील तुरा, मसला खुर्द, गुंज, गौंडगाव, अंधापुरी, उमरा, लोणी बु., कानसूर, तारुगव्हाण, बाभळगाव आदी गावशिवारातील पेरणी केलेली पिके मोडून टाकली आहेत. कोसोदूर भेगाळलेली रानं अजून काळी आहेत. धुरे, बांधावरील सुकलेले खुरटे गवत, कुठेच हिरवाई दिसत नाही. एकीकडे पावसाने पाठ फिरवली तर दुसरीकडे लागवड केलेले कपाशीचे बियाणे उंदिरांनी तर उगवलेली पिके हरणांनी खाऊन फस्त केली. संकट एकटे येत नाही, ती झुंडीने येतात, अशीच प्रचिती या मंडळातील शेतकऱ्यांना यंदा आली आहे

कालव्याचे पाणी आले, पण...
जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाथरी तालुक्यातील हादगाव, बाभळगाव मडंळातील पावसाचा ताण बसलेल्या पिकांसाठी संरक्षित पाणी आवर्तन सोडण्यात आले. परंतु उभी पिके होरपळून गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या पाणी आवर्तनाचा उपयोग होणार नाही. चाऱ्या वितकांच्या दुरवस्थेमुळे कालव्याच्या शेवटच्या टोकाकडील गुंज, गौंडगाव, उमरा, अंधापुरी, कानसूर या गावशिवारातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोचत नसल्यामुळे या शेतकऱ्यांनाही या पाण्याचा उपयोग नाही. 

पीक कर्जवाटप संथगतीने
यंदाच्या खरीप हंगामात १४०० कोटी ९० लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. १५ आॅगस्टपर्यंत सर्व बॅंकांनी ४६,४९५ शेतकऱ्यांना २६९ कोटी २१ लाख रुपये (१९.२२टक्के) पीक कर्ज वाटप केले आहे. २०१६ मध्ये २,०६,५९० शेतकऱ्यांना १,११४ कोटी २८ लाख रुपये (८५ टक्के) कर्ज वाटप करण्यात आले होते. ३० जून २०१६ थकबाकीदार असलेल्या १,५२,७७३ शेतकऱ्यांपैकी १९ आॅगस्टपर्यंत ९,१५८ शेतकऱ्यांना १० हजार रुपये तातडीने पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष
बाभळगाव, हादगाव मंडळांतील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदन देऊन पंचनाम्याची मागणी केली केली. परंतु त्यानंतर तालुका प्रशासनाकडून थंडा प्रतिसाद मिळाल्यानंतर औरंगाबाद गाठून या शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली. तेथूनही रिकाम्या हाताने परतावे लागले. गौंडगाव शिवारातील हरणाने केलेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वनविभागातर्फे करण्यात आले. काही गावातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पीक परिस्थितीबाबत विचारणा केली. परंतु कृषी सहायक शेताकडे फिरकत नाहीत. तलाठी गावातूनच पीक पेरे मांडून नेतात. नजरी पैसेवारी, पीक कापणी प्रयोगासाठी शेतात पिकंच नाहीत तर पैसेवारी कशी काढणार, असा सवाल या शेतकऱ्यांनी केला आहे.

पाऊस स्थिती...
१८ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ४४९ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात २२०.३ मिलिमीटर म्हणजेच ४९.१टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७७४.५९ मिलिमीटर आहे. वार्षिक सरासरीच्या २८.४४ टक्के पाऊस झाला आहे. बाभळगाव मंडळामध्ये ९२ मिलिमीटर (२०.७ टक्के) तर हादगाव मंडळामध्ये १०१ मिलिमीटर (२२.८ टक्के), आडगाव ३९ मिलिमीटर (७.९ टक्के) पाऊस पडला आहे. दरम्यान, २० आॅगस्टला हदगाव मंडळात केवळ ११ मिलिमीटर तर बाभळगाव मंडळात २५ मिलिमीटर पाऊस पडला.

तालुकानिहाय १८ आॅगस्टपर्यंत पडलेला पाऊस (मिलिमीटर)
तालुका    पाऊस    टक्केवारी

परभणी    २४७.१    ४८.९
जिंतूर    १९८.२    ४०.०
सेलू    २३६.१    ५८.२
मानवत    २३६.१    ५०.७
पाथरी    १४५    ३२.७
सोनपेठ    २०४.१    ५०.७
गंगाखेड    १६७.४    ४१.६
पालम    १४५.८    ३६.३
पूर्णा    २८१.६    ६१.३
 

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
पीक            क्षेत्र 

सोयाबीन    २,१२,४१४
कापूस    १,८७,५५७
तूर    ४७,२५०
मूग    ३५,६३३
उडीद    ९,७०८
ज्वारी    १०,४५३
बाजरी    १,७६९
मका    १,३२१
तीळ    ५७९
कारळ    २७५
भात    ९

पीकनिहाय उत्पादनातील अंदाजित घट (टक्के)
मूग    ७० ते ८० 
उडीद    ४० ते ५०
तूर    ४० ते ५०  
सोयाबीन     ५० ते ६०
कापूस     ५० टक्के

दृष्टिक्षेपात परभणी जिल्हा

जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र - ६,३१,११५ हेक्टर

खरिपाचे सर्वसाधारण - ५,२१,८७० हेक्टर

१४ आॅगस्टपर्यंत पेरणी - ५,०७,२१० हेक्टर (९७.२० टक्के)

भारी जमीन असून उपयोग नाही. शेंगा न लागलेला सहा एकर मूग आणि तीन वेळा तूट लावलेला सहा एकर कापूस वखर फिरवून मोडून टाकला. उत्पादन मिळाले नाही. खर्चही वाया गेला.
- अशोक घांडगे, शेतकरी, पाथरगव्हाण बु. ता. पाथरी.

घरचे साडेसहा एकर आणि बटईचे १२ एकर मूग, सोयाबीन, कापूस पिके पावसाअभावी मोडून टाकावी लागली. ८० हजार रुपये खर्च वायफट गेला. पाटाचं पाणी लवकर सोडलं असतं काही तरी हाती लागलं असतं.
- रामचंद्र चवरे, शेतकरी, वरखेड (केदावस्ती), ता. पाथरी.

हरणांचा उपद्रव वाढला आहे. शेतामध्ये कोणते पीक घ्यावे, शेती कशी करावी हेच समजत नाही.

- बालासाहेब हरकळ, शेतकरी, गौंडगाव, ता. पाथरी.

२०१५ सालच्या दुष्काळात काही तरी हाती लागलं होतं. यंदा त्याच्यापेक्षाही भंयकर परिस्थिती आहे. खरीप पूर्ण वाया गेला. खरिपात झालेला खर्च देऊन रब्बीसाठी सरकारनं मदत करावी.

- पांडुरंग शिंदे, शेतकरी, कानसूर, ता. पाथरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com