देवहिवराची लोकसहभागातून समृद्धीकडे वाटचाल

सुभाष बिडे
गुरुवार, 27 जुलै 2017

देवहिवरा (ता. घनसावंगी, जि. जालना) गावातील लोकांना एकत्र येण्याचे महत्त्व समजले. त्यांना ग्रापंचायत, विविध संस्था, कृषी विभाग यांची साथ मिळाली. त्यातून जलसंधारणाची तसेच विकासाची विविध महत्त्वाची कामे झाली. आज त्यातूनच हे गाव प्रगतिपथावर मानाने व आत्मविश्वासपूर्वक दमदार पावले टाकत वाटचाल करत आहे. 
 

देवहिवरा (ता. घनसावंगी, जि. जालना) गावातील लोकांना एकत्र येण्याचे महत्त्व समजले. त्यांना ग्रापंचायत, विविध संस्था, कृषी विभाग यांची साथ मिळाली. त्यातून जलसंधारणाची तसेच विकासाची विविध महत्त्वाची कामे झाली. आज त्यातूनच हे गाव प्रगतिपथावर मानाने व आत्मविश्वासपूर्वक दमदार पावले टाकत वाटचाल करत आहे. 
 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्‍यात असलेल्या देवहिवरा गावाची लोकसंख्या सुमारे दीड हजार आहे. गावचे एकूण क्षेत्र ५४३ हेक्‍टर असून, वहितीखाली क्षेत्र ४९५ हेक्‍टर आहे. मागील काही वर्षांपासून सततचा दुष्काळ असल्यामुळे गावातील फळबागा जळून गेल्या. शेतकऱ्यांना हंगाम साधणे मुश्कील झाले. यावर उपाय शोधण्याच्या कारणाने ग्रामस्थ एक झाले. पुन्हा एकदा गावात हिरवाई निर्माण करू, असा निर्धार त्यांनी केला.
  
एकीतून विकासाकडे वाटचाल 

गावच्या विकासात सिंचनाला सर्वांत प्राधान्य देण्याचे ठरवले. त्यासाठी सरपंच मंगलबाई शेळके, उपसरपंच सुवर्णा ठुले, भानुदास ठुले, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ मते, आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेचे प्रशिक्षक जयमंगल जाधव आदी अनेकांनी पुढाकार घेतला. शासकीय यंत्रणेच्या मागे न लागता लोकवर्गणी काढून कामे करण्याचे ठरवले. त्यासाठी मुंबई येथील महाजन ट्रस्ट यांनी नाला खोलीकरणासाठी यांत्रिक सुविधा पुरवली. जालना येथील जलकल्याण समितीनेही निधी पुरवला. त्यातून सिंचनाचे मोठे काम उभे राहिले. याच कामातून गावातील समस्येचा बोध झाल्याने सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एक राहण्याचा निर्णय घेतला. 

लोकसहभागातून नाला सरळीकरण 

लोकवर्गणीतून दीड लाख रुपये जमा करण्यात आले. यंत्राच्या डिझेलचा खर्चही लोकसहभागातून करण्यात आला. कृषी विभागानेही सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा निधी दिल्याने कामाला गती प्राप्त झाली. त्यातून अडीच किलोमीटरपर्यंत नाला खोलीकरण करण्यात आले. त्यावर तीन बंधारे बांधण्यात आले. त्याचा फायदा पावसाळ्यात दिसून पाणीपातळीत वाढ झाली. गावातील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरी, बोअर  आदींच्या पाणीपातळीतही वाढ झाली. त्यामुळे या वर्षी शेतीला संरक्षित पाणी देणे शक्य होणार आहे.

महिला सबलीकरण 

जागतिक महिला दिनानिमित्त गावातील महिलांना महाजन ट्रस्टच्या माध्यमातून जेसीबी यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये पन्नास महिलांनी सहभाग नोंदवला. गावात महिलांचे बारा बचत गट असून, प्रत्येक गटात अकरा महिलांचा समावेश आहे. या महिलांनी नाला खोलीकरणाच्या कामांत मदत केली. विशेष म्हणजे विकासकामांचा शुभारंभ महिलांच्या हस्तेच करण्यात येतो. गावातील महिला प्रत्येक एकादशीला एकत्रित येऊन गावातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवितात. वर्षातून एकदा सप्ताहभर कार्यक्रम भरवले जातात. यात रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, आरोग्य शिबिर, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदींचा समावेश असतो. याद्वारे महिलांचा आत्मविश्‍वास वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येतो.  
 

गावात या झाल्या सुधारणा 

जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ मते यांच्या निधीतून ग्रामपंचायतीने गावातील सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरींच्या पाइपलाइनवर आरअो (रिव्हर्स आॅसमाॅसीस) पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविली आहे. त्याद्वारे पाच रुपयांत वीस लिटर पाणी देण्यात येते. 
गल्ल्यांमधून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी निचऱ्याची सोय करण्यात आली आहे. 
शाळेच्या तीन नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. 
गावात अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले.
सोलर लाइटचे संच बसविण्यात आले आहेत. 
घरांसमोर लोकसहभागातून वृक्षलागवड करण्यात आली अाहे. वृक्षांची लागवड व जोपासना योग्यरीतीने व्हावी यासाठी कमी खर्चात तारा आणून झाडांभोवती जाळी बनविण्याचे कामही ग्रामस्थांनी केले आहे.
जवळच गावातील तीन एकर इनाम जमीन असून त्या ठिकाणी पूर्वजांच्या नावाने वृक्ष लागवड करून सांभाळ करण्यासाठी देण्यात येणार आहे. मात्र पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे ही लागवड करायची बाकी असल्याचे गावकरी सांगतात.

यांत्रिकीकरण
गावचे शेतकरी कापसाच्या पिकातून जमा-खर्चाचा ताळमेळ जुळविण्याचा प्रयत्न करतात. अनेक शेतकऱ्यांनी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आदींच्या प्रशिक्षणात सहभाग घेतला आहे. त्यातून पीक पद्धतीत बदल करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी ‘बीबीएफ प्लान्टर’च्या साह्याने सोयाबीनची पेरणी उताराला आडवी केली आहे. यात कृषी विभागाने अनुदान दिले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, शेततळे आदी योजनांत शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. 

ई-लर्निंग शाळा
गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून येथे लोकसहभागातून ई-लर्निंगची सुविधा तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पुणे येथील दोन संस्थांच्या माध्यामातून पंचायत समिती सदस्य पंडित धांडगे यांच्या पुढाकारातून दोन संगणक संच देण्यात आले आहेत. त्यामुळे आधुनिक शैक्षणिक प्रणाली सोपी होण्यास मदत झाली आहे. 

गावातील तरुणांसह महिलांनीदेखील विकासाचा रथ पुढे नेण्याचे काम केले आहे. गावांत मूलभूत सुविधा पोचविण्यासाठी लोकसहभागातून मोठे काम करण्यात आल्याचे समाधान आहे.
- सुवर्णा ठुले, ८३०८८६३१११ उपसरपंच, देवहिवरा  

महिला बचत गटांबरोबर येथे कृषी विभागाच्या आत्माअंतर्गतही बचत गट कार्यरत अाहे. या गटांच्या माध्यमातून भाजीपाला पिके घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर यंदा गटातील शेतकऱ्यांनी पारंपरिक लावण पद्धतीला फाटा देऊन बीबीएफ पद्धतीने पेरणी केली अाहे. 
- सखाराम उगले, ९४२३७४७३३७ 

शेतकऱ्यांची उपक्रमशील व कष्टाळू वृत्ती, व्यावसायिक दृष्टिकोन, आधुनिक शेतीची धरलेली कास, लोकसहभागातून होत असलेले प्रयत्न यामुळे देवहिवरा गावातील शेतकरी जागृत होऊन गावाच्या विकासासाठी झटू लागले आहेत.
- एस. आर. पोटे, ८२७५२३१४१४, तालुका कृषी अधिकारी, घनसावंगी  

लोकसहभाग, प्रशासन यांच्या मदतीने गावातील युवक व तरुणांनी एकत्रित येऊन शेतीतही आधुनिक बदल केला आहे. त्यातून पीक उत्पादनात वाढ केली असून, गाव समृद्धीच्या वाटेवर नेऊन ठेवले आहे.
- संजय लोंढे, ९४२०७०४३८७ कृषी सहायक, घनसावंगी  

Web Title: agro news devhivara people will go from prosperity