ढेपेवरील ‘जीएसटी’ला भावनिक मुद्द्यावर विरोध

विनोद इंगोले
गुरुवार, 20 जुलै 2017

नागपूर - ढेपेवर जीएसटी नसावा, अशी मागणी ढेप उत्पादकांऐवजी ढेपेचा व्यापार करणाऱ्यांकडून होत आहे. व्यापारी त्याकरिता गोरक्षण व इतर भावनिक मुद्द्यांचा आधार घेत असल्याने वातावरण तापले आहे. दूधाळ जनावरांकरिता पोषक पशुआहार असलेल्या सरकी ढेपेवर पाच टक्‍के जीएसटी आहे.

नागपूर - ढेपेवर जीएसटी नसावा, अशी मागणी ढेप उत्पादकांऐवजी ढेपेचा व्यापार करणाऱ्यांकडून होत आहे. व्यापारी त्याकरिता गोरक्षण व इतर भावनिक मुद्द्यांचा आधार घेत असल्याने वातावरण तापले आहे. दूधाळ जनावरांकरिता पोषक पशुआहार असलेल्या सरकी ढेपेवर पाच टक्‍के जीएसटी आहे.

सरकी ढेपेवर आधारित विदर्भातील कापूस उत्पादक अकोला, खामगाव (बुलडाणा), हिंगणघाट (वर्धा) या भागात सर्वाधिक उद्योग आहेत. महाराष्ट्रासोबत गुजरात (करी) येथेदेखील ऑइलमिल जास्त आहेत. एक क्‍विंटल सरकीवर प्रक्रिया केल्यानंतर ८५ टक्‍के सरकी पेंड (ढेप) तर १२ टक्‍के तेल मिळते, उर्वरित तीन टक्‍के वेस्ट राहते, अशी माहिती एका ऑइलमिल संचालकाने दिली. सध्या सरकी खरेदीवर पाच टक्‍के जीएसटी आहे.

त्यासोबतच सरकी ढेपेवरदेखील पाच टक्‍के जीएसटी आकारला जातो. पाच टक्‍के जीएसटी भरल्यानंतर आर्थिक वर्षाअखेर सर्व दस्तऐवजांची पूर्तता करून त्याचा परतावा मिळतो. त्याकरिता सर्व खरेदीचे बिलिंग आणि विक्री व्यवहारही पारदर्शी असावा लागतो. त्यामुळे केवळ ऑइलमिल असणाऱ्या उद्योजकांचा याला विरोध नाही; परंतु देशातील व्यापाऱ्यांनी मात्र सरकी ढेपेवर शून्य जीएसटी असावा, अशी मागणी केली आहे. 

खामगावला कच्चा ढेपेची बाजारपेठ
खामगाव (बुलडाणा) येथे उत्पादित कच्ची ढेप आणि एनसीडी एक्‍स दर्जाची ढेप असे देशाअंतर्गत ढेपेचे वर्गीकरण होते. खामगावच्या कच्चा ढेपेला क्‍वॉलिटीच्या बाजारात मागणी आहे. यामध्ये तेलाचे प्रमाण अधिक राहते. त्यामुळे दूध वाढण्यास मदत होते. मध्य प्रदेश, नाशिक, नगर, गुजरात, राजस्थान या भागातून खामगाव ढेपेला मागणी आहे. २२०० ते २३०० रुपये प्रतिक्‍विंटलचे या ढेपेचे सध्याचे दर आहेत. एनसीडी एक्‍स ढेप २२०० रुपये क्‍विंटलवरून १७०० रुपयांवर आली आहे. 

साठेबाजी आणि मनमानी दर

व्यापारी ढेपेचा जानेवारीत स्टॉक करतात, त्यानंतर मार्च एप्रिलमध्ये विक्री करतात. त्या वेळी वाढीव दराचा फायदा त्यांना होतो. शून्य जीएसटी असल्याने खरेदी विक्रीचा हिशेब ठेवावा लागत नाही. मनमानी दराने ढेप विकणेही यामुळे शक्‍य होते, असा दावा केला जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून सरकी ढेपेवर शून्य जीएसटीची मागणी होत असल्याची चर्चा आहे. गाईच्या चाऱ्यावर कर आकारला जात असल्याचा भावनिक मुद्दा उपस्थित केला जात आहे.

सध्या ढेपेवर जीएसटी आहे किंवा नाही याचाच खुलासा झालेला नाही. या संदर्भात आम्ही मेल, ट्विटर व अन्य माध्यमांतून सातत्याने  विचारणा केली; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. जिनिंग आणि त्यासोबत ऑइलमिल असणाऱ्यांना यात फायदा होईल, हे खरे आहे. नुसती ऑइलमिल असणाऱ्यांचे शून्य जीएसटी संरचनेत नुकसान होईल. 
- प्रमोद अग्रवाल, अध्यक्ष, ऑइलमिल असोसिएशन, बुलडाणा जिल्हा

Web Title: agro news dhep gst oppose