ठिबक सिंचन पद्धतीसाठी बदलले कपाशीतील अंतर

लागवडीमधील अंतर वाढविल्यामुळे कपाशीला वाढीसाठी जास्त अंतर मिळाले.
लागवडीमधील अंतर वाढविल्यामुळे कपाशीला वाढीसाठी जास्त अंतर मिळाले.

खर्चात बचतीसह उत्पादनात एकरी पाच क्विंटल वाढ

पारंपरिकता सोडून नावीन्यपूर्ण विचार केल्यास कपाशीची पारंपरिक शेतीही फायदेशीर होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरातमधील नरनभाई मोरी. त्यांनी कपाशी पिकाच्या लागवडीसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी लागवडीच्या अंतरात बदल केले. त्यामुळे ठिबकसाठी लॅटरल आणि ड्रिपरची संख्या खूपच कमी लागून, खर्चात बचत झाली. त्याच प्रमाणे कपाशीच्या वाढीसाठी मोकळी जागा उपलब्ध झाल्याने एकरी उत्पादनात पाच क्विंटलपर्यंत वाढ मिळाली. 

गुजरातमधील तलौजा भावनगर या तालुक्यात कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पारंपरिक पद्धतीत ४ x १ फूट अंतरावर कपाशी लागवड केली जाते. शक्यतो ठिबक सिंचन वापरले जाते. येथील पादरघाडा या गावात नरन मोरी यांची एकूण ७० एकर शेती आहे. स्वतःच्या शेतीसह अन्य नातेवाइकांची १२५ एकर शेती ते कसतात. प्राधान्याने कपाशी, भुईमूग व कांदा या पिकांची लागवड असते. बहुतांश सर्व क्षेत्रामध्ये ठिबक सिंचन केले आहे. पूर्वी ते पारंपरिक पद्धतीने कपाशीची ४ x १ फूट अंतरावर लागवड करीत. मात्र मिळणाऱ्या उत्पादनावर समाधानी नव्हते. पिकाची दाटी टाळणे आणि खर्चात बचत साधण्यासाठी नरनभाई यांनी ठिबक सिंचन संचातील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कपाशीची ६ x २.५ फूट अंतरावर लागवड केली. त्याप्रमाणे ठिबक सिंचन संचाची रचना केली. केवळ या एका बदलाचा त्यांना खूप फायदा झाला. पूर्वी एकरी ८ क्विंटल इतके मिळणारे उत्पादन त्यांनी एकरी १३ क्विंटलपर्यंत वाढविले. 

वर्ष २०१३ पर्यंत ते ७० एकर क्षेत्रावर कपाशीचे पीक घेत असत. मात्र, अलीकडे वाढलेल्या गुलाबी बाेंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीचे क्षेत्र कमी केले आहे. त्यातही सर्व क्षेत्रावर बी.टी. कपाशीचे उत्पादन ते घेतात.

ठिबकसिंचन संचातील अंतर वाढविण्याचा प्रयोग बी.टी. कपाशी पिकातही त्यांनी केला असून एकरी १८ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळविले आहे. मात्र बोंड अळीचा प्रादुर्भाव बी.टी. कपाशीवरही वाढत असल्याने यंदा केवळ दहा एकर क्षेत्रावर तिची लागवड केली आहे.  

स्वत:ची जिनिंग प्रक्रिया व विक्री व्यवस्था : 
मोरी त्यांच्या शेतात उत्पादित कपाशी स्वत:च्या शेतावरच जिनिंग करून स्वच्छ करतात. शेतकाम आणि जिनिंगच्या कामासाठी त्यांच्याकडे कायम ३५ मजूर आहेत. कपाशी विक्रीची त्यांची स्वत:ची व्यवस्था आहे. त्यामुळे त्यांना बाजारभावही जास्त मिळतो. 

अनेक पुरस्कारांनी गौरव -
मोरी यांच्या नावीन्यपूर्ण तंत्राचा वापर गावामध्ये वाढत गेला. गावातील सुमारे ७० टक्के कपाशी उत्पादकांनी त्यांची पद्धत अनुसरली आहे. परिणामी संपूर्ण गावातील कपाशीच्या उत्पादनात भरीव वाढ व खर्चात बचत झाली आहे. नरनभाईंच्या कार्याची दखल घेत तालुका कृषी विभागाने त्यांना वर्ष २०१०-११ मध्ये कृषीऋषी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.  
गुजरात राज्य बियाणे महामंडळाने त्यांना वर्ष २०१२-१३ मध्ये ‘उत्कृष्ट बियाणे उत्पादक’ हा पुरस्कार देऊन गौरविले आहे.

लागवडीतील अंतर बदलण्याच्या एका निर्णयामुळे झालेले फायदे 
लॅटरलच्या लांबीमध्ये ३३ टक्क्यांनी, तर ड्रिपरच्या संख्येत ७३ टक्क्यांनी घट  
ठिबक सिंचनाच्या खर्चामध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक बचत  
पाण्याचे प्रमाणही कमी लागले. 
बियाणे खर्चात कपात; खतावरील खर्चात ३५ टक्के बचत 
पिकाच्या वाढीसाठी भरपूर जागा मिळाल्याने कपाशी झाडांची वाढ चांगली झाली. परिणामी फुल-पात्या व बोंडे जास्त लागली. एकरी उत्पादनात ५ क्विंटलची वाढ मिळाली.
हवा खेळती राहिल्याने कीड रोगांचे प्रमाण कमी झाले. 
एक एकर क्षेत्राचे सिंचन करण्याचा काळ चार तासावरून दाेन तासांपर्यंत घटला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com