बजगुडेंच्या शिवारात समृद्धी विविध बारमाही फळपिकांची

दत्ता देशमुख
मंगळवार, 27 जून 2017

आंब्याच्या तीस वाणांची विविधता 
समाधान मानून व विचारपूर्वक केल्यास शेती समृद्धीचे साधन होऊ शकते हे बीड जिल्ह्यातील वांगी येथील दिलीप बजगुडे यांनी दाखवून दिले आहे. एक हेक्टरात आंब्याच्या तब्बल ३० वाणांची विविधता जपत त्यापासून चांगले उत्पन्न ते घेतातच. शिवाय विविध फळपिकांच्या लागवडीतून शेती समृद्ध करीत मानसिक समाधान मिळवले. रोपवाटिका व्यवसायातूनही शेतीचे अर्थकारण सक्षम केले. 

आंब्याच्या तीस वाणांची विविधता 
समाधान मानून व विचारपूर्वक केल्यास शेती समृद्धीचे साधन होऊ शकते हे बीड जिल्ह्यातील वांगी येथील दिलीप बजगुडे यांनी दाखवून दिले आहे. एक हेक्टरात आंब्याच्या तब्बल ३० वाणांची विविधता जपत त्यापासून चांगले उत्पन्न ते घेतातच. शिवाय विविध फळपिकांच्या लागवडीतून शेती समृद्ध करीत मानसिक समाधान मिळवले. रोपवाटिका व्यवसायातूनही शेतीचे अर्थकारण सक्षम केले. 

बीड जिल्हा कोरडवाहू म्हणून अोळखला जातो. मात्र प्रतिकूल स्थितीला शरण न जाता जिल्ह्यातील शेतकरी शेतीत विविध प्रयोग करीत असतात. बीड तालुक्यातील वांगी येथील ३० एकर शेती असलेले  दिलीप बजगुडे हे यापैकीच एक आहेत. आपल्या जमीनक्षेत्राचे त्यांनी विविध पिकांमध्ये पद्धतशीर वर्गीकरण केले आहे. विविध फळबागांसाठी काही क्षेत्र, काही जनावरांच्या चाऱ्यासाठी तर दहा एकरांवर सोयाबीन, तूर आदी पारंपरिक पिके ते घेतात. काही माळरान आणि काही सुपीक जमीन अाहे. 
बजगुडे यांना दोन मुले आहेत. पैकी विक्रम शेती करतो. अजितने कृषी शाखेतून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. संपूर्ण कुटुंब शेतीत रमलेले पाहायला मिळते. शेतातच घर बांधून तेथे कुटुंब राहते. 

शेतीतील विविधता 
बजगुडे यांच्या शेतात कोणकोणती पिके आहेत ते एका दमात सांगणे तसे अशक्यच. अांबा, चिकू, लिंबू, नारळ, केळी, अंजीर, मोसंबी, संत्रा, पपई, फणस, आवळा, डाळिंब, रामफळ, सीताफळ, आवळा, जांभळ, कडुलिंब अशी पिकांची समृद्धी त्यांच्याकडे आहे.

काही झाडे केवळ खाण्यासाठी लावली आहेत. यात केळीची २०, अंजिराची ८ तर आवळ्याची दोन झाडे आहेत.  

कोकणातून कापा फणसाची दोन झाडे आणून लावली. प्रत्येक झाड २५ ते ३० फळे देते. बीडला प्रत्येक फळाला १०० ते १५० रुपयांपर्यंत दर मिळतो. म्हणजे फणसासारखे झाड बीड जिल्ह्यात लावून त्यापासून अतिरिक्त उत्पन्नदेखील घेतले आहे. 

विविधता हीच संधी पकडून त्याचे व्यावसायीकरण केले आहे. बागेत लावलेल्या बहुतांश झाडांची रोपे तयार करून दोन एकरांत रोपवाटिका तयार केली आहे. प्रति रोपाची पीकनिहाय २० रुपयांपासून ते ५० रुपये दराने विक्री केली जाते. वर्षाला त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळते. 

काही झाडे वनीकरणाच्या उद्देशाने लावली आहेत. यात रेन ट्री, काशीद, करंज यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत वा शासनाला त्याची रोपे दिली जातात. शिवाय कढीपत्ता, चिंच, विलायती चिंच, सुबाभूळ, अशी झाडेही आहेत. 

‘ॲग्रोवन’चा फायदा
सकाळ- ॲग्रोवन आयोजित ॲग्रो संवाद कार्यक्रमांसह विविध ठिकाणी आयोजित कृषी प्रदर्शने व फळप्रदर्शनांना बगजुडे यांनी हजेरी लावली. ॲग्रोवनचा अंक ते नियमित बीडहून नेतात. त्यातील तंत्रज्ञानाचा अवलंब शेतीत होतो.

बजगुडे यांच्याविषयी ठळक नोंदी 
शेतीतील उत्पन्नातूनच शेतात चांगले घर बांधले. मुलांची शिक्षणे आणि मुलीचे लग्न केले. एका मुलाचे बीडमध्ये जनरल स्टोअर्स व शैक्षणिक साहित्याचे दुकान आहे.

ट्रॅक्टर, नवीन फवारणी यंत्राचा वापर. अनुभवातून काही यंत्रांमध्ये नव्या सुधारणा. बैलगाडीच्या चाकांवर मोठे जनरेटर बसवून त्यावर पाण्याची टाकी ठेवली आहे. शेतातील आंब्याच्या मोठ्या झाडांच्या शेंड्यांपर्यंत फवारणी करण्यासाठी या यंत्राचा ते वापर करतात. पाण्यासाठी दोन विहिरींसह तलावातून शेतापर्यंत एक किलोमीटर अंतराची पाइपलाइन केली आहे.

बाजारपेठेत विक्रीबरोबरच ग्राहकही बांधापर्यंत येतात. त्यामुळे घरातच बाजारपेठ तयार झाली आहे. ४)आंबे पारंपरिक पद्धतीने पिकवतात. अनेक फळे वानवळा (भेट) म्हणून मित्र आणि नातेवाइकांना दिली जातात. पैशांचे काय? समाधान मिळते, अशी भावना बजगुडे व्यक्त करतात. 

झाडांसह आले, कढीपत्ता, लिंबू, कोथिंबीर, टोमॅटो, बटाटा, पालक, शेपू, चुका, कांदा, कारले, गाजर, दोडका, मिरची ही पिकेही  हंगामनिहाय असतात. त्यामुळे बाजारात जाऊन खरेदीची वेळ फार कमी असते. 

आंब्याच्या ३० वाणांचे संगोपन 
सुमारे अडीच एकरांत आंब्याच्या देशी व सुधारित जाती मिळून सुमारे ३० वाण आहेत. बजगुडे फार शिक्षित नसले, तरी त्यांच्यात नवीन शिकण्याची आणि वेगळे करण्याची वृत्ती आहे. घरच्या अंगणातील गावरान अांब्याच्या झाडाच्या एकवीस फांद्यांना २१ प्रकारची कलमे केली आहेत. एकच झाड मात्र सर्व फांद्यांना वेगवेगळ्या आकारांचे, रंगांचे आणि चवीचे अांबे लागतात. 

आंब्याचे वैशिष्ट्यपूर्ण वाण पाहायला मिळतात. उदा. केसर, हापूस, बजरंग, वनराज, लंगडा, चंद्रमा, साई, रत्ना, राजापुरी, नारळ्या, शेंद्र्या, काळा पहाड, साखरगोटी  
काळा खोबरा- गावरान- रसात तूप टाकून खाल्यासारखा स्वाद. दरवर्षी भरपूर आंबा.
हूर- मे महिन्याच्या आधी येतो. फळ मोठे, तीनशे ग्रॅमपर्यंत
सिंधू- रत्नागिरी भागातून आणलेला. कोय सुमारे १० ग्रॅम वजनापर्यंत. आकार मोठा
जीवनराज- पावसाळ्यातही येतो. कच्च्या आंब्यासाठी त्याची विक्री 
जीवनराज व बजरंगी हे वर्षातील दोन वेळा येतात. काही उन्हाळ्याचा हंगाम संपल्यानंतर दीपावलीतही असतात. 

कच्च्या आंब्यांची विक्री 
गावरान व सुधारित जाती अशा दोन्ही प्रकारचे आंबे आहेत. बहुतांश विक्री कच्च्या आंब्यांची होते. त्यासाठी बीड, अौरंगाबाद ही मुख्य मार्केट्स तर पुणेदेखील पूरक मार्केट आहे. किलोला ३० ते ३५ रुपये दराने विक्री होते.

Web Title: agro news dilip bajgude fruit agriculturedevelopment