सेंद्रिय भाजीपाल्यासाठी थेट मिळवले ग्राहक

सेंद्रिय भाजीपाल्यासाठी थेट मिळवले ग्राहक

नागपूरचे रहिवासी असलेल्या सुनील कोंडे या उच्चशिक्षित युवकाने कृषी विभागाची नोकरी सोडून  सावंगी तोमर (जि. नागपूर) येथे सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला शेती सुरू केली आहे. नागपूरमध्ये त्यासाठी आपली ग्राहक बाजारपेठ तयार केली आहे. व्यावसायिक कौशल्य, तांत्रिक व बाजारपेठेचे पक्के ज्ञान ही गुणवैशिष्ट्ये जपणारे सुनील आजच्या काळातील स्मार्ट शेतकरीच म्हटले पाहिजेत.
 

नागपूर येथे वास्तव्यास असलेले सुनील कोंडे उच्चशिक्षित असून त्यांचे एमएससी एमबीए पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांचे वडील शिक्षक होते. त्यामुळे सुनील यांचा लहानपणी शेतीशी थेट संपर्क कमीच असायचा. कृषी विभागांतर्गत कृषी ऍग्री पॉलिक्लिनिक विभागात त्यांनी पाच वर्षे नोकरी केली.  सन २००५ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ शेतीतच उतरण्याचा निर्णय घेतला. सावंगी परिसरात शेती खरेदी केली. 

खर्च कमी करणारी १२ एकर सेंद्रिय शेती  
कोंडे यांची १२ एकर शेती आहे. त्यातील दहा एकरांवर ‘रोटेशन’ पद्धतीने बारमाही भाजीपाला घेतला जातो.
काकडी, मिरची, टोमॅटो, वाल, चवळी, भेंडी, वांगी अशी त्यात विविधता
सुमारे ८० टक्‍के सेंद्रिय तर २० टक्‍के रासायनिक शेती पद्धतीचा वापर  
किडीरोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक अर्क, रंगीत सापळे यांचा वापर केला जातो. 

सजीव शेती करण्याचा प्रयत्न
 जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होऊ लागला आहे. त्यामुळे जमीन सजीव ठेवण्याचा सुनील यांचा आग्रह असतो. सेंद्रिय खत निर्मिती व वापरावर भर दिला जातो.
 त्यांच्याकडे वर्षाला तयार होते ७५ ते १०० टन गांडूळखत 
 गोमूत्र, शेणखत, जीवाणू आदींचा समावेश करून द्रवरूप मृदामृत तयार केले जाते. बारा एकरांत वर्षाला दीड लाख लिटरपर्यंत त्याचा वापर होतो.
 सुमारे ५० टन नाडेप तर १५० टन कंपोस्ट खत निर्मिती 

शेणाची उपलब्धता
 पाच गायींचे संगोपन. त्यापासून १५ लिटर दूध मिळते. स्थानिक डेअरीकडे विक्री होते. त्याबरोबर विविध सेंद्रिय खत, गोबरगॅस निर्मितीसाठी शेणाची उपलब्धता होते. 

पाण्याचे स्रोत
शेतीसाठी विहीर, बोअरवेल असे पाण्याचे स्त्रोत आहेत. शेती व्यवस्थापनासाठी चार पुरुष, सहा महिला यांची फार्मवर राहण्याची सोय केली आहे. एक ‘फार्म मॅनेजर’ देखील नियुक्त केला आहे. नागपूरपासून फार्मचे अंतर सुमारे २५ किलोमीटर आहे. संपूर्ण १२ एकरांला ‘ड्रीप ॲटोमेशन’ केले आहे. 

सेंद्रिय मालाला शोधली बाजारपेठ
 नागरिकांत आरोग्याप्रति जागरूकता वाढली आहे. त्यामुळे सेंद्रिय मालाला मागणी वाढल्याचे निरीक्षण सुनील नोंदवितात. आपल्या दर्जेदार सेंद्रिय मालासाठी त्यांनी विशेष ग्राहक बाजारपेठ मिळवली आहे. 
 त्यांच्या मित्राची ‘मूर्ती फार्म’ नावाची डेअरी आहे. येथील दुधाचे नागपूर शहरात सुमारे २०० ग्राहक आहेत. येथील संकरित गायीचे दूध लिटरला ६७ रुपये तर देशी गायीचे दूध ९७ रुपये दराने विकले जाते. 
 दुधाचे हेच ग्राहक सुनील यांनी पटकावले. रोजच्या दुधाबरोबर मित्राच्या व स्वतःच्या फार्मवरील सेंद्रिय  भाजीपाला दररोज पुरवण्यास त्यांनी सुरवात केली आहे. त्याला चांगले यशही मिळाले आहे. 

कळमेश्‍वर बायपास रस्त्याच्या बाजूला सुनील यांचा आयरीस फार्म आहे. तेथेही ‘काउंटर’ सुरू करून ग्राहकांना शेतमालाची थेट विक्री होते. रस्त्याला लागूनच हे केंद्र असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभतो. 

स्वतःच्या शेतातील मालाला बाजार समितीसह स्वतःचे विक्री केंद्र व दुधाचे ग्राहक अशा तिहेरी अंगाने सुनील यांनी बाजारपेठ मिळवून दिली आहे. 
दुधाच्या ग्राहकांसाठी तयार केलेल्या ‘ॲप’च्या माध्यमातूनच भाजीपाल्याची मागणी नोंदविली जाते. त्यानुसार ताजा भाजीपाला पुरवण्यात येतो. 

मिळतो अधिक दर 
विशेष म्हणजे नियमित भाजीपाल्यापेक्षा सेंद्रिय भाजीपाल्याला किलोमागे किमान पाच रूपये दर अधिक मिळवण्यात सुनील यशस्वी झाले आहेत. सेंद्रिय भाजीपाल्याची चवही ग्राहकांना भुरळ घालते. त्यामुळे  मागणीत सातत्य राहते. दररोज एकूण मिळून दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. 

पुरवठा पॅकिंगमधून 
दोघा मित्रांच्या भागीदारीतून पॅकिंग व त्यावर ‘ब्रॅंडनेम’ आहे. त्याद्वारे भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोचविला जातो.   एकाच छताखाली कमी खर्चापासून ते अती खर्चाचे शेती मॉडेल शेतकऱ्यांना अनुभवता यावे, अशा प्रकारचे मॉडेल विकसित करण्याचा विचार त्यांनी केला. त्यानुसार त्यांनी सावंगी परिसरातील शिवारात ते अल्पावधीतच डेव्हल्प केले. 

विकसित केले मॉडेल फार्म 
सुनील यांनी आपल्या क्षेत्रापैकी थोड्या जागेत मॉडेल फार्म विकसित केले आहे. येथे पुढील बाबी पाहण्यास मिळतात.   शेडनेट.  .  पॉलिहाउस मधील पीकपध्दती.  रेशीम शेती.  गांडूळ खतनिर्मिती   ठिबक ऑटोमेशन  भाजीपाला उत्पादन.  स्फुरदयुक्त खत तसेच अझोला निर्मिती   गोबरगॅस, त्यापासून स्वयंपाकासाठी इंधन, मिळणाऱ्या स्लरीचा शेतीत वापर.  : सुनील कोंडे, ९६२३७५६९६३ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com