शेडनेटमधील शेती करते आर्थिक प्रगती

दत्तात्रय वाळके
दत्तात्रय वाळके

आर्थिकदृष्ट्या न पडवणाऱ्या पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून वाशीम जिल्ह्यातील वाळकी मजरे येथील दत्तात्रय वाळके हा युवा शेतकरी संरक्षित शेतीकडे म्हणजे शेडनेट शेतीकडे वळला. त्यात कारली, मिरची व व काकडी अशी पिके घेत त्यांनी गुणवत्ताप्राप्त उत्पादन घेतलेच. शिवाय बिगर हंगामात पिके घेण्याचा फायदा घेत दरही चांगला मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.  

वाशीम जिल्ह्यातील वाळकी मजरे येथील शहाजी वाळके यांची चार एकर शेती अाहे. बारमाही पाण्याची सोय नसल्याने पूर्वी पावसाच्या पाण्यावर अाधारीत पिके घेतली जायची. सोयाबीन, तूर, हरभरा या पिकांवरच कुटुंबाचे अर्थकारण अवलंबून होते. त्यातून जेमतेम उत्पन्न व्हायचे. सन २०१४ मध्ये शहाजी यांचा मुलगा दत्तात्रय यांनी संरक्षित शेतीचा म्हणजे शेडनेटमध्ये भाजीपाला घेण्याचा वेगळा विचार केला. पक्के नियोजन करीत २० गुंठ्यांत उभारणीही केली. 

विक्री व्यवस्था 
शेडनेटमधील शेती वगळता उर्वरीत शेतातही काही प्रमाणात भाजीपाला घेतात. दत्ता यांची शेती वाशीमपासून तीन किलोमीटरवरच असल्याने बाजारपेठेची अडचण येत नाही. अाठवड्याला शहाजी स्वतःदेखील हातविक्री करतात. यामुळे व्यापाऱ्यांची मध्यस्थी टळून दोन पैसे अधिक मिळतात.

संघर्षातून शेतीत यश 
घरची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक असल्याने दत्तात्रय यांना पाचवीनंतर शिकता अाले नाही. तीन बहिणी, दोघे भाऊ, अाईवडील अशा कुटुंबाला अापला हातभार लागावा म्हणून त्यांनी तेव्हाच मोलमजुरी करायला सुरवात केली. सन १९९६ मध्ये एका शेतकऱ्याकडे तीनशे रुपये महिना या वेतनावर काम सुरू केले. काही काळाने घरच्या आर्थिक परिस्थितीत थोडीफार सुधारणा झाली. मग मात्र मोलमजुरीला न जाता स्वतःचीच शेती सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला. काही शेतकऱ्यांचे प्रयोग प्रत्यक्ष पाहिले. सन २०१४-१५ च्या हंगामात जेव्हा शेडनेटमध्ये पीक घेण्यास सुरवात केली, त्यावेळी स्वतःच्या विहिरीत पाणी नव्हते. शेजाऱ्याला पैसे देऊन पाणी घेतले व प्रयोग सुरू ठेवला. 

पाण्याचा प्रश्न सोडविला
वाळके यांच्या शेतातील    विहिरीला जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पाणी राहते. त्यानंतर पिके   जगविणे मुश्कील होऊन जाते. यावर उपाय म्हणून गावापासून काही अंतरावरील एकबुर्जी प्रकल्पातून पाण्याची व्यवस्था केली. तीन किलोमीटर  जलवाहिनी टाकून पाणी शेतात अाणले. या पाण्याने विहीर भरून ठेवायची अाणि त्यानंतर उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करायचे असा क्रम असतो. विहिरीतील पाण्यावर शेडनेटमधील पिके घेण्यात येतात. 

ॲपल बोरचा प्रयोग  
एकीकडे २० गुंठ्यांत शेडनेट करून संरक्षित शेतीत पाऊल टाकले. त्याला जोड म्हणून एक एकरात ॲपल बोर लावले अाहे. सध्या सुमारे ४५० झाडे उत्पादनक्षम अाहेत. सध्याच्या काळात प्रति झाड २० ते २५ किलो उत्पादन मिळत आहे. वाशीम मार्केटला सरासरी २५ ते ३० रुपये किलो दर मिळत आहे.   

शेडनेट शेतीची प्रेरणा 
दत्तात्रय यांच्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्याने शेडनेट शेतीत ठेवलेले सातत्य व त्यांचे अनुभव अभ्यासण्यासाठी अनेक शेतकरी, कृषी अधिकारी व तज्ज्ञ यांची येथे ये-जा सुरू असते. काही शेतकऱ्यांनी ही प्रेरणा घेत शेडनेट शेतीला प्रारंभही केला आहे. 

स्वखर्चाने प्रशिक्षण कार्यक्रम
दत्तात्रय यांनी स्वखर्चाने अलीकडेच आपल्या शेतात शेडनेट तंत्र व ॲपल बाेर या विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम घेतला. कृषी अधिकाऱ्यांसह सुमारे तीनशे शेतकरी यावेळी उपस्थित राहिल्याचे दत्तात्रय यांनी सांगितले.
 

शेडनेटमधील शेती दृष्टिक्षेपात 
सन २०१४-१५ पासून दत्तात्रय यांनी अाजवर शेडनेटमध्ये कारली, साधी तसेच लांबट-गोल अशी विशिष्ट प्रकारची मिरची, काकडी अशी विविध पिके घेतली अाहेत. अर्धा एकरातील शेडनेटमधील उत्पादन व उत्पन्न तसेच उर्वरीत साडेतीन एकरांत खुल्या शेतीतील उत्पादन यात बरीच तफावत दिसून येते. 

साध्या मिरचीचे पूर्वी खुल्या शेतात पाच टनांपर्यंत उत्पादन मिळायचे. आता ते १३ टनांपर्यंत नेण्यात दत्ता यशस्वी झाले आहेत. सन २०१७ मध्ये उन्हाळी काकडीचे फार नाही मात्र ८० क्विंटल उत्पादन मिळाले. पण सध्या सुरू असलेल्या हंगामात आत्तापर्यंत १४० क्विंटल काकडीची विक्री करणे शक्य झाले आहे. अजून ८० क्विंटलपर्यंत विक्रीची अपेक्षा आहे.

शेडनेटमधील उत्पादनाची गुणवत्ताही चांगली असल्याने किलोमागे चार ते पाच रुपये दर जादा मिळतात, असा दत्ता यांचा अनुभव आहे. उन्हाळी काकडीस किलोला ३० ते ३५ रुपये तर सध्याच्या काकडीला १५ रुपये दर मिळतो आहे. 

 उन्हाळ्यात खुल्या शेतीत मेथी घेणे कठीण होते. अशावेळी दत्ता यांनी शेडनेटमधील काकडीत मेथी घेतली. या मेथीचा दर्जाही उत्तम असल्याचे ते म्हणाले. त्यास किलोला ६० ते ७० रुपये दरही मिळवला. 

ॲग्रोवन ठरला दिशादर्शक 
सन २०१३ मध्ये दत्तात्रय यांच्या वाचनात ‘ॲग्रोवन’ आला. त्यानंतर ते ‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक झाले. यामध्ये ‘हायटेक’ शेतीअंतर्गत शेडनेट व पाॅलिहाऊस प्रशिक्षणासंबंधीची बातमी वाचनात अाली. त्यातून कृषी विभागाशी संपर्क साधला. पुणे येथे जाऊन सात दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गावच्या कृषी सहायकाची भेट घेत शेडनेट शेतीचा 
इरादा सांगितला. अार्थिक मदतीसाठी बँकेची मदत घेतली.

मजुरांवरील अवलंबित्व कमी केले 
अाज शेतीत मजुरी हा सर्वात मोठा खर्चाचा भाग झाला अाहे. वाळके कुटुंबाने नेमक्या याच बाबीवर अधिक लक्ष दिले. अाई-वडील, दत्ता व त्यांची पत्नी असे चौघेही शेतात राबतात. त्यामुळे मजुरांवरील अवलंबित्व त्यांनी कमी केले आहे. लागवड, पिकाची बांधणी, खते, पाणी देणे, कीडरोग नियंत्रण अशी कामे अधिक करून चौघेच करतात. त्यामुळे मजुरीचा खर्चही कमी होतो. 

- दत्तात्रय वाळके, ९९६०४३६१२७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com