बाष्पीभवन दरानूसार करा डाळिंबाला सिंचन

बाष्पीभवन पात्र व ओलीत गुणांक यांचा विचार करून पिकास पाण्याची मात्रा ठरवावी.
बाष्पीभवन पात्र व ओलीत गुणांक यांचा विचार करून पिकास पाण्याची मात्रा ठरवावी.

डाळिंब हे महत्त्वाचे फळ पीक आहे. मात्र, डाळिंब लागवडीच्या परिसरात भूजलपातळी खालावत चालली आहे. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे डाळिंब पिकाला सिंचन करताना शास्त्रीय पद्धतीचा आधार घेतला पाहिजे.

डाळिंब पिकाला आवश्यकतेनुसार पाणी देणे गरजेचे असते. ही गरज ठरविताना वय, बहार, स्थान आणि व्यवस्थापन या बाबींचा विचार करणे आवश्‍यक असते. डाळिंबाच्या चांगल्या उत्पादनासाठी व झाडाच्या गरजेनुसार खालील बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे..

 बाष्पीभवन दर 
 पात्र गुणांक 
 पीक गुणांक
 ओलीत गुणांक
 झाडाने व्यापलेले क्षेत्रफळ
 सिंचन कार्यक्षमता
 जमिनीचा प्रकार

बाष्पीभवन दर (मि.मी.)
पाण्याचे रूपांतर वाफेत होण्याच्या प्रक्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. बाष्पीभवनाचा दर बाष्पीभवन पात्राच्या साहाय्याने दररोज मोजता येतो. बाष्पीभवनाचा वेग हा मिमी/दिवस या परिमाणात दररोज सकाळी ८.३० वाजता मोजला जातो. बागेस सिंचनापूर्वी पाऊस पडला, तर बाष्पीभवन कमी होते आणि त्यानुसार सिंचन कमी करावे लागते. बाष्पीभवन पर्जन्यमानापेक्षा अधिक झाल्यास, नंतर जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन सिंचन करावे. दररोजचे बाष्पीभवन त्या त्या ठिकाणच्या हवामानानुसार बदलत असते. ते दररोज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असू सकते. त्या ठिकाणचा महिनावार बाष्पीभवन दर आंबिया बहरावेळी किंवा दररोज सिंचनासाठी उपयुक्त ठरू शकतो. 

पात्र गुणांक
बाष्पीभवनाचा दर लोखंडी पात्राच्या साहाय्याने ठरवत असल्याने मिळणारी संख्या ही होणाऱ्या जमिनीच्या बाष्पीभवनापेक्षा जास्त येते. त्यामुळे येणाऱ्या संख्येला पात्र गुणांकाने गुणल्यास जमिनीच्या बाष्पीभवनाचा दर मिळतो. सोलापूर विभागासाठी सरासरी ०.७० इतका पात्र गुणांक काढण्यात आलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार तो वेगवेगळा असतो. 

पीक गुणांक
हा गुणांक पिकाला लागणारी पाण्याची गरज व संदर्भित पिकाला पाण्याची गरज यांचा भागाकार असतो. पीक गुणांक हा समीकरण वापरून, लायसीमीटर आणि जमिनीची आर्द्रता मोजून काढता येतो. पीक गुणांक पिकाच्या वयानुसार वाढत जातो. डाळिंब पिकाच्या चार अवस्था काढल्या आहेत. सुरवातीचा म्हणजेच नवीन पान येण्याची अवस्था, पीकविकास अवस्था, पीक परिपक्वता अवस्था आणि पीक काढणी अवस्था अशा चार अवस्था आहेत. पिकाची वाढ जोमाने होत असताना पाण्याची गरज जास्त असते.  

पीक गुणांक हा खालील समीकरणाद्वारे काढण्यात आलेला आहे.
पीक गुणांक = ०.०१४ x छायंकित क्षेत्राची टक्केवारी + ०.०८
प्रत्येक पिकाचा पीक गुणांक भिन्न असतो. त्यामुळे प्रत्येक पिकाला लागणारी पाण्याची तंतोतंत आवश्यकता समजते. 

ओलीत गुणांक
प्रत्येक झाडाखालील ओले करावे लागणाऱ्या क्षेत्राला ओलित क्षेत्रफळ म्हणतात. हे झाडाच्या वयाेमानानुसार वाढत जाते. ओलित क्षेत्रफळ हे खालील समीकरणाद्वारे काढले जाते. 
ओलित गुणांक = छायांकित क्षेत्रफळ (चौ. मी.) / झाडाने व्यापलेले क्षेत्रफळ (चौ. मी.).
झाडाने व्यापलेले क्षेत्रफळ : झाडाने व्यापलेले क्षेत्रफळ हे झाडाखाली पडलेली त्याची सावली यावरून काढले जाते. हे झाडाच्या आडव्या वाढीवर अवलंबून असते. झाडाने व्यापलेले क्षेत्रफळ हे खालील समीकरणाद्वारे काढले जाते.  
झाडाने व्यापलेले क्षेत्रफळ = दोन झाडांमधील अंतर A (मीटर) x दोन ओळींमधील अंतर B (मीटर)
B = ४.५ मीटर, A=३.० मीटर 

सिंचन कार्यक्षमता 
सिंचन पद्धतीची पिकास योग्य प्रमाणात पाणी देण्याची क्षमता याला सिंचन कार्यक्षमता असे म्हणतात. ठिबक सिंचनाची कार्यक्षमता इतर सिंचन पद्धतीपेक्षा जास्त आहे. ठिबक सिंचनाची कार्यक्षमता ९० टक्के आहे. ठिबक सिंचन प्रणालीमध्ये लिटर/तास याप्रमाणात पाण्याचे वितरण केले जाते. 

जमिनीचा प्रकार 
सूक्ष्म सिंचन करताना तोट्यांची संख्या व सिंचन पाळीतील अंतर जमिनीच्या प्रकारानुसार ठरवावे लागते. हलक्या जमिनीत पाणी आडवे जास्त पसरत नाही; म्हणून तोट्याची संख्या जास्त ठेवावी लागते; तसेच हलक्या जमिनीत पाणी साठवण्याची क्षमता कमी असल्याने तिला दररोज किंवा दिवसाआड पाणी देणे जास्त उपयुक्त ठरते. मात्र मध्यम ते खोल जमिनीत पाणी दिवसाआड किंवा दोन दिवसांनंतर दिले तरी चालते.
- डॉ. डी. टी. मेश्राम, ७५०७१९२६०६ (लेखक राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर येथे कार्यरत. )

पाण्याची गरज काढण्याची पद्धत 
शेतकऱ्यांना पाच वर्षांच्या वयाच्या बागेत सिंचन करताना पाणी लिटर/दिवस/झाड याप्रमाणात जाणून घेणे आवश्‍यक ठरते. प्रतिझाड पाण्याची आवश्यकता आणि पाणी देण्याची वेळ खालील सूत्रावरून काढता येते. 
पाण्याची आवश्यकता (लिटर/दिवस/झाड) = बाष्पीभवन दर x पात्र गुणांक x पीक गुणांक x झाडाने व्यापलेले क्षेत्रफळ x ओलीत गुणांक / सिंचन कार्यक्षमता संच चालवण्याचा कालावधी = पाण्याची आवश्यकता / तोट्यांची संख्या x तोटीचा प्रवाह x सिंचन कार्यक्षमता

टीप - वरील पाण्याची मात्रा फक्त मार्गदर्शनपर व सूक्ष्म सिंचन पद्धतीसाठी आहे. त्यात प्रत्यक्ष अनुभव, जमिनीचा पोत, झाडाचे वय, पीकवाढीची अवस्था व त्या त्या ठिकाणचे हवामान यानुसार बदल करावेत. जमीन नेहमी वाफसा अवस्थत राहील एवढेच पाणी पिकास द्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com