केळीतील शून्य मशागत तंत्राचे अनुभव

प्रताप चिपळूणकर
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

खानदेशात विशेषतः जळगाव जिल्ह्यात केळी लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. पाण्याची चांगली उपलब्धता असणाऱ्या भागात केळी लागवडीचे प्रमाण वाढत आहे. साधारणपणे १२ ते १४ महिन्यांत पीककापणी होते. पिकाचे एक दोन खोडवेही घेता येतात. यामुळे इतर जिल्ह्यांतही केळी लागवड वाढत आहे. 

खानदेशात विशेषतः जळगाव जिल्ह्यात केळी लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. पाण्याची चांगली उपलब्धता असणाऱ्या भागात केळी लागवडीचे प्रमाण वाढत आहे. साधारणपणे १२ ते १४ महिन्यांत पीककापणी होते. पिकाचे एक दोन खोडवेही घेता येतात. यामुळे इतर जिल्ह्यांतही केळी लागवड वाढत आहे. 

दक्षिण महाराष्ट्रात केळीची लागवड सुरू झाली त्या वेळी शेतकऱ्यांच्या अभ्यासात अशी गोष्ट आली, की केळीचे पीक घ्यावयाचे म्हणजे किमान एकरी चाळीस गाड्या शेणखत जमिनीत मिसळले पाहिजे. त्यामुळे केळी लागवडीचा विचार करणारा शेतकरी पहिल्यांदा सेंद्रीय खत गोळा करण्यास सुरवात करतात. जळगाव जिल्ह्यात फिरत असताना सर्वत्र केळी लागवड दिसते. रस्त्याच्या कडेला केळीचे खोड व अवशेष पडलेले सर्वत्र दिसतात. अवशेष रस्त्याच्या कडेला फेकून देऊन जमिनीची मशागत करून परत केळी लागवडीची तयारी शेतकरी करतात.

ऊस तुटून गेल्यावर जमिनीवर फक्त पाचट राहते. अशा जमिनीची मशागत केली जाते. केळीचे घड कापून बागेचे बाहेर गेल्यानंतर पानांचा पसारा व खोड असे शिल्लक राहणारे घटक बाहेर काढणे हे मोठे कष्टाचे काम आहे. खोडाचे वजन जास्त असल्याने ते उचलून बाहेर नेऊन टाकणे हे मोठे कष्टाचे काम आहे. तरीही जमिनीची नांगरणी करावयाची असल्यास याला पर्याय नाही. खोड कापल्यानंतर केळीचे जमिनीखालील अवशेष मोठे असल्याने बोदाची फाळाच्या नांगराने नांगरणी करणे मोठे अवघड काम असते. आता रोटाव्हेटर उपलब्ध झाल्याने जमिनीखालील अवशेषांचे लहान लहान तुकडे होतात. यामुळे मशागतीचे काम सोपे होते.

सेंद्रीय पदार्थ वाढविण्याचे तंत्र -
केळीचे खोड कापणे, बाहेर नेऊन टाकणे, पानांचा पसारा कापून बाहेर टाकणे आणि ३ ते ४ वेळा औत फिरवून जमिनीची मशागत करणे हे शून्य मशागत तंत्राने आपण टाळू शकतो. दोन वर्षांनंतर ज्या वेळी फेरपालट करावयाची आहे त्या वेळी वाळलेली व हिरवी पाने कापून बोदाच्या दिशेने दोन खोडामध्ये अंथरावीत. बोडके खोड तसेच उभे ठेवावे. दोन ओळींमध्ये साधारण ५ ते ६ फूट अंतर असते. यामध्ये पुढे अशाच अंतराचे ओळीत घेता येण्यासारखे ऊस, कापूस किंवा तूर यासारखे पीक निवडावे. केळीत ठिबक  असल्यास मधल्या सरीत घेऊन त्या ठिकाणी या पिकाची पेरणी अगर लागवड करावी. केळीची लहान बाळे सतत फुटत राहतील. तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत तणनाशक मुख्य पिकांवर न पडता केळीच्या फुटीवर फवारल्यास ती जळून जाते. केळीच अवशेष कुजत जातात. मधील पिकाची वाढ चालू राहते. ऊस लागवडीनंतर ५ते  ६ महिन्यांनंतर पॉवर टिलरने भरणी करता येते. हे अवशेष कुजून त्याचे अतिशय उत्तम सेंद्रीय खत जमिनीत जागेवरच तयार होते. या सेंद्रिय खतावर फेरपालटाचे कोणतेही पीक अतिशय उत्तम वाढते, चांगले उत्पादन देते. 

अवशेषांचा फायदा - 
मी गेली अकरा वर्षे उसाच्या अवशेषांचे खत करीत आहे; परंतु केळीच्या अवशेषांच्या खताचा पुढील पिकावर होणारा परिणाम उसाच्या तुलनेत खूपच चांगला जाणवला. हा प्रयोग स्वतः करून पाहिल्याशिवाय त्याची उपयुक्तता लक्षात येणार नाही.

केळीनंतर फेरपालटाचे पीक संपल्यानंतर त्याचे अवशेष ठेवून परत मधल्या ओळीत केळी लागवड करणे शक्‍य आहे. मागील पिकाचे अवशेष हेच पुढील पिकासाठी सेंद्रीय खत या तत्त्वाचे पालन केल्यास सेंद्रीय खत वापरावरील मोठ्या खर्चात बचत करता येणे शक्‍य आहे. 

जागेलाच सेंद्रीय घटक कुजविणे, दीर्घकाळ कुजवणे, जड पदार्थ कुजविणे आदी सर्व भू-सुक्ष्मजीव शास्त्रीय तत्त्वांचे पालन आपोआप होते. ही सर्वच पिके लांब अंतरावरील असल्याने सुरवातीच्या काळात मुख्य पिकाला त्रास होणार नाही, या पद्धतीने तणे वाढवून त्याचेही खत सहज करणे शक्‍य आहे. पूर्वमशागत, सेंद्रिय खत व तण व्यवस्थापन याव्यतिरिक्त इतर सर्व कामे नेहमी प्रमाणेच करावी लागतात.
- प्रताप चिपळूणकर - ८२७५४५००८८  (लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत)

Web Title: agro news Experience of zero farming techniques in banana