कांद्यावरील निर्यातक्षम प्रक्रिया

कांद्यावरील निर्यातक्षम प्रक्रिया

कांद्यावर प्रक्रिया केल्यामुळे पदार्थ जास्त काळापर्यंत साठवून ठेवता येतात. कांद्याच्या पदार्थांची निर्यातही शक्‍य होते. त्यासाठी कांद्यावर करता येण्याजोग्या प्रक्रियांची माहिती घेऊ. 
 

कांदा या पिकाचे बाजारातील दरामध्ये सातत्याने चढ-उतार होत असतात. कांदा साठवणीसोबतच प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीतून त्यामध्ये किमान शेतकरी आणि त्यांच्या गटाच्या पातळीवर स्थिरता आणणे शक्‍य होईल.  
 कमीत कमी प्रक्रिया केलेले कांदे : कांदे सोलून किंवा कापून त्यांच्यात प्रिझर्वेटिव्हस (परिरक्षके) वापरली जातात. असे सोललेले किंवा कापलेले कांदे उत्तम पॅकेजिंगद्वारे अधिक काळ ताज्या स्वरूपामध्ये राहू शकतात. 

सोललेले कांदे ५ टक्के उर्ध्वपातित व्हिनेगारच्या द्रावणाचा वापर करून संरक्षित केले जातात. 

कापलेल्या कांद्यांसाठी पोटॅशियम सल्फेटचा (०.२५ टक्के) प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापर केला जातो. 

कांदा पेस्ट - बदलत्या जीवनशैलीमुळे कांदा पेस्टला मागणी वाढत आहे. पेस्ट तयार करण्यासाठी कापलेले कांदे तेलामध्ये तळून घेतले जातात. नंतर मिक्‍सरमधून काढून त्यांची पेस्ट केली जाते. कांदा पेस्ट केल्यामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते. स्वयंपाकातही वापरण्यास कांदा पेस्ट सुलभ जाते.  

निर्जलित (डिहायड्रेटेड) कांद्यापासून पावडर व फ्लेक्‍स (काप) : कांद्याचे निर्जलीकरण केल्याने सूक्ष्मजीववाढीस प्रतिबंध होऊन कांद्याची साठवणक्षमता वाढते; तसेच त्याचे आकारमान कमी होत असल्याने वाहतुकीसाठी सोपे जाते. निर्जलीकरणामुळे कांद्याची आर्द्रता कमी होते.

अशा कांद्यांना योग्य प्रकारे काप देऊन, फ्लेक्‍स किंवा भुकटी तयार करता येते.  डिहायड्रेटेड कांद्याचे फ्लेक्‍स आणि पावडर हे वातावरणातील आर्द्रता शोषून घेणारे आहेत, त्यामुळे त्यासाठी योग्य पॅकेजिंग तंत्रज्ञान वापरणे अत्यावश्‍यक आहे. अशा कांदा भुकटी किंवा कापांच्या निर्यातीला मोठा वाव आहे.  

लोणचे - व्हिनेगर किंवा तेलाचा वापर करून कांद्याचे लोणचे तयार करता येते. अमेरिका आणि युरोप बाजारपेठेमध्ये व्हिनेगर वापरून, तर आशिया-आफ्रिका बाजारपेठेमध्ये तेल वापरून बनवलेले कांद्याचे लोणचे लोकप्रिय आहे. 

तेल - कांद्यापासून तेलसुद्धा तयार करता येते. प्रक्रियाकृत उत्पादनांमध्ये कांद्याचा स्वाद आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या तेलाचा वापर होतो. काही उत्पादनांमध्ये प्रिझर्वेटिव्ह (संरक्षक) म्हणूनही त्याचा वापर केला जातो.  

सिरका / वाइन / सॉस : कांद्यामध्ये साखर आणि इतर पोषक पदार्थ जास्त असतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रक्रिया करून व्हिनेगर (सिरका), सॉस आणि वाइन आदींची निर्मिती करता येते.

कांद्याच्या टाकाऊ भागावरील प्रक्रिया - कांद्याच्या घरगुती आणि औद्योगिक वापरातून उरलेला कचरा देखील प्रक्रिया करून वापरता येऊ शकतो. 

कांदा सालीतून रंग मिळवता येतात. ते नैसर्गिक रंग म्हणून वापरले जातात. रंग काढून उरलेला भाग फायबरचा चांगला स्रोत आहे. 

कांद्याच्या कोरड्या सालीमध्ये फ्लेवोनॉइड घटक असतात. त्यापासून स्वाद आणणारे घटक तयार करता येतात. 

कांद्याचा बाहेरील थर, मुळे आणि पात यांचा बायो-गॅसमध्ये पर्यायी ऊर्जा स्रोत निर्माण करण्यासाठी उपयोग करता येतो. 

निर्जलीकरण किंवा प्रक्रिया करण्यासाठी कांद्याची गुणवत्ता
कांद्याचा रंग चमकदार पांढरा असावा. 
आकार गोलाकार असावा. कांदा भोवऱ्यासारखा गोल नसेल तर मशिनमध्ये काप करताना बराच भाग वाया जातो. 
कांद्यामध्ये विद्राव्य घन पदार्थाचे प्रमाण १५ ते १८ टक्के पर्यंत असावे. 
कांद्यामध्ये तिखटपणा जास्त असावा. 
काळी बुरशी वगैरे रोगांचा प्रादुर्भाव नसावा.  
कांदा काढणीनंतर २-३ महिन्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने साठविलेला असावा. कांद्याला हिरवा रंग नसावा; तसेच कोंब आलेले नसावेत.

- डॉ. राजीव काळे, ९५२१६७८५८७ (कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com