ॲग्रोवन यशोगाथांमधील शेतकऱ्यांना बॅंकेचे अर्थसाह्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

अकोला - ॲग्रोवन यशोगाथांमधील शेतकऱ्यांशी संपर्क साधत त्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याचा आगळावेगळा उपक्रम अकोला जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने राबविला आहे. ॲग्रोवनची विश्‍वासार्हता असल्यानेच अशा प्रकारच्या उपक्रमासाठी पुढाकार घेण्यात आल्याची माहिती बॅंकेच्या सूत्रांकडून देण्यात आली. 

अकोला - ॲग्रोवन यशोगाथांमधील शेतकऱ्यांशी संपर्क साधत त्यांना आर्थिक आणि तांत्रिक मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याचा आगळावेगळा उपक्रम अकोला जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने राबविला आहे. ॲग्रोवनची विश्‍वासार्हता असल्यानेच अशा प्रकारच्या उपक्रमासाठी पुढाकार घेण्यात आल्याची माहिती बॅंकेच्या सूत्रांकडून देण्यात आली. 

राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव आणि वेगळेपण ॲग्रोवनमधील यशोगाथांच्या माध्यमातून पुढे आणले जातात. या यशोगाथा वाचून त्यांचे अनुकरण करणारा वर्गही राज्यात मोठा आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने एक पाऊल पुढे टाकत ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध यशोगथांमधील प्रयोगशील शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला. 

अकोला जिल्हा बॅंकेचे अकोला आणि वाशीम जिल्हा कार्यक्षेत्र आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची यशोगाथा ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर बॅंक या शेतकऱ्यांशी संपर्क साधते. संपर्क फोनवरून नाही, तर थेट शेतकऱ्यांशी भावनिक नाते जुळावे याकरिता पत्राद्वारे होतो. या पत्राच्या सुरवातीला शेतकऱ्याच्या संबंधित प्रयोगाबद्दल अभिनंदन केले जाते. त्यानंतर बॅंकेकडून कोणतेही आर्थिक किंवा तांत्रिक सहकार्य अपेक्षित असल्यास संपर्क साधण्यासही सांगण्यात येते. 

बॅंकेच्या याच पुढाकारामुळे वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्‍यात घाटा गावात ३० ते ३५ शेडनेट उभे झाले आणि त्यातून शेतकरी व्यवसायिक पीक घेण्यासाठी सरसावले आहेत. या गावातील शेडनेटसाठी जिल्हा बॅंकेकडूनच अर्थसाह्य करण्यात आले. वाशीम जिल्ह्यातीलच मानोरा तालुक्‍यांतर्गत साखरडोह गावातील शेतकऱ्यांनादेखील शेडनेट उभारणीकामी अर्थसाह्य करण्यासाठी पुन्हा बॅंक पुढे आली आहे. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष संतोषकुमार कोरपे यांची ही संकल्पना असून, गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे.

‘ॲग्रोवन’ शेतकरी उत्कर्षाकरिता काम करतो. जिल्हा बँकेचा उद्देशही शेतकरी उत्कर्ष हाच आहे. त्यामुळे आम्ही ॲग्रोवनच्या यशोगाथांची दखल घेत, संबंधित शेतकऱ्यांना पत्र पाठवून त्यांचा उत्साह वाढवतो. गरज पडल्यास त्यांना अर्थसाह्य करण्याचीदेखील आमची तयारी असते. 
- डॉ. संतोषकुमार कोरपे, अध्यक्ष जिल्हा बँक, अकोला.

Web Title: agro news farmer bank finance