एका हातानी देतात; दुसऱ्यानी घेतात

संतोष मुंढे
गुरुवार, 20 जुलै 2017

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना, पाण्याचा नाही पत्ता अन्‌ वीजबिल सुरूच

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना, पाण्याचा नाही पत्ता अन्‌ वीजबिल सुरूच

बीड - काय पाहिजे शेतकऱ्यांना कोण इचारतंय. अडीच पावणेतीन महिन्याच्या उडदा, मुगाच्या पिकाला महिनाभरानंतर थोडं पाणी मिळालंय, काय येणार त्यात. कपाशी एकवेळ मोडून दुबार लागवड केली, ती निघाली नाय. सारं निसर्गाच्या हाती. सरकारनं दुष्काळी मदत दिली, कर्जमाफीची घोषणा केली, पण चार महिने पाणी असताना वर्षभर हजारोंची वीजबिलं येणं सुरू हायेत. बॅगाच्या भुईमुगाला शेंगा लागेना, खुल्या बियाण्याला शेंगा लागताहेत. सरकारचं काय एका हातानं देतंय दुसऱ्या हातानं काढून घेतंय. सरकारनं हे केल्यापेक्षा शेतीला मुबलक पाणी, मोफतवीज, शेतीमालाला दर, चांगल्या दर्जाची बियाणं, खत कमी दरात द्यावं ना! या भावना आहेत अस्मानी आणि सुलतानी लहरीपणाचा फटका सहन करणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या.

गेवराई तालुक्‍यातील पाचेगाव मंडळातील पाचेगाव, जयराम तांडा, तळवट बोरगाव, बीड तालुक्‍यातील मुळूकवाडी, मोरगाव, म्हसेवाडी, सोमनाथवाडी, बेलगाव आदी शेतकऱ्यांनी व्यक्‍त केलेल्या व्यथा कृषी, महसूल व सर्वच शासकीय प्रशासकीय व्यवस्थेव घाव घालणाऱ्या आहेत. यंदा पाऊस चांगला येण्याच्या अंदाजावरून पहिल्या दुसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी आदी खरीप पिकांची पेरणी केली. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्यानं कपाशीच वय वाढलं, पण अपेक्षित वाढ झाली नाही. काहींच्या शेतात पाते लागली, पण तिला बोंड किती येईल याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. पेरणी राहिलेल्या शेतकऱ्यांची रानं काळीच राहिली. तर पहिल्यांदा पेरणी केलेलं उगवलं नाही म्हणून दुसऱ्यांदा पेरलेल्या आता पाणी आल्यानंतर काय होईल याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही.

पीक नाय आलं त जावं लागंल ऊसतोडीला
घरची चार एकर शेती, तिला जोडून ३२ हजार ठोका देऊन चार एकर शेती केली. सारं बी, खतं टक्‍क्‍यानं आणलंय, आता पाणी असा करून राहिला. नाय पिकलं त जावं लागंल पुन्हा ऊसतोडीला, त्याशिवाय काय पर्याय. गेवराई तालुक्‍यातील जयराम तांड्यातील वच्छलाबाई सांगुळे सांगत होत्या.

ऊसतोडीला जावं वाटत नाही, पण पिकलं नाय त गेल्याबिगर पर्याय नाही, म्हतारे राहतील घरी. ऊसतोडीला जायचं तीकडून पैसे आणायचे शेतीत घालायचे, परतं येतचं नायं, पुन्हा ऊसतोडीला जायचं असंच चालू हाय, वच्छलाबाईचं हे सांगणं ग्रामीण भागातील विस्थापनाविषयी बरंच काही सांगून जातं. जयराम तांड्यातीलच नरेंद्र पवार अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेल्या तरुणानं नोकरी सोडून शेळीपालन, भाजीपाला आदी बरंच काही करून पाहिलं. शासन प्रशासनाची नाहीच, पण निसर्गाचीही साथ न मिळाल्यानं वडिलांनी शेती ठोक्‍यानं दिल्याचं ते सांगत होते. त्यांच्या शेतात विहीर, तिला थोडबहुत पाणी, पण पिण्याच्या पाण्यामुळं ठिबक गुंडाळून ठेवण्याशिवाय पर्याय नाही. बोरगावच्या राजेंद्र कावळेच्या चुलत्याच्या शेतातील पीकही वाळून गेलं होतं. तर तळवट बोरगावातील महिला पावसासाठी महादेवाच्या मळीला साकडं घालायला निघाल्या होत्या. 

दोनदा लागवड, कपाशी उगवलीच नाही
गेवराई तालुक्‍यातीलच तळवट बोरगाव येथील सुभाष गाडे यांच्या आठ एकरांतील कपाशीची पहिल्यांदा १० जूनला लागवड केली. त्यानंतर पाऊसच नसल्यानं ती उगवली नाही. त्यामुळं दुसऱ्यांदा २८ जूनला त्यांनी पुन्हा कपाशीची लागवड केली. त्यानंतरही पाऊसच न आल्यानं ती १७ जूनपर्यंत उगवली नव्हती. १७ जूनला सायंकाळी थोडाबहुत पाऊस झाला, पण त्याचा उपयोग होईल की नाही हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पेऱ्याची नोंदच घेतली अजून घेतली गेली नसल्यानं दुसऱ्यांदा लागवड करावी लागली हे कृषी, महसूल विभागाला कळणार कसं हा प्रश्न त्यांनी केला. ३० मेला शासनाच्या खरेदी केंद्रावर २९ क्‍विंटल तूर विकली त्याचे पैसे अजून खात्यावर आले नाही. दुसरीकडे आठ एकरांतील जवळपास ५० हजार आज रोजी मातीत गेल्याची व्यथा त्यांनी मांडली.

गावच्या शिवारात चिंतेचे ढग
थेट बेंगलोरला कांद्याची विक्री करणारे गाव म्हणून बीड तालुक्‍यातील मुळूकवाडीची ओळख. परंतु पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे मुळूकवाडीसह खंडाळा, मोरगाव, म्हसेवाडी, सोमनाथवाडी, बेलगावाच्या शेतशिवारात चिंतेचे ढग गडद झाले आहेत. शेत शिवारात तुरळकच माणसं दिसत होती. गावशिवारातील खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेकांनी दुबार पेरणी केली आहे. ऑगस्टमध्ये कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी कांद्याची रोपं टॅंकरनं वा मिळंल तिथून पाणी आणून टाकून जगविण्याची धडपड चालवली. पण ७ जूननंतर १८ जुलैपर्यंत दांडी मारणारा पाऊस पडलं की नाही हा प्रश्न आहे. १८ जुलैला रात्री काही वेळ भीज पाऊस पडला, पण त्याचा उपयोग कपाशी वगळता इतर पिकांना काही होईल अशी आशा नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

सरकार एकरी कर्ज मिळण्याचा दावा जेवढा करतं ते दावा करतं ते खरं मानाव की मला चार एकरावर केवळ २० हजार मिळालेलं कर्ज खरं म्हणावं. मी नियमित कर्जफेड करतो तरी यापेक्षा जास्त कर्ज मिळतं नाय.
- विष्णू ढास, मुळूकवाडी, जि. बीड

पहिल्यांदा अकरा एकरांवर वीस हजार कर्ज मिळालं. त्यानंतर पाच वर्षांपासून काढणं भरणं सुरू आहे. पण ५० हजारांपेक्षा जास्त कर्ज मिळतच नाय. 
- शेषराव ढास, मुळूकवाडी, जि. बीड

Web Title: agro news farmers feeling