क्षमतेची साथ; मिळाली पिले सात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

स्थानिक शेळी उत्पादन आणि प्रजनन क्षमतेत सरस आहे. तरी गावठी शेळ्या का पैदास होतात, याचे कोडे मोठे आहे. सात करडे देऊन उस्मानाबादी शेळीने लक्ष वेधले असताना तिच्या रुचकर मांस उत्पादनाचाही विसर पडू नये, यासाठी लोकचळवळ गरजेची आहे.
 

महाराष्ट्र भूषण उस्मानाबादी शेळी स्मृतीशिल्पासाठी नगर परिषदेच्या चर्चेत पराभूत झाली, ही बातमी मनातून विसर पडण्याअगोदर सात करडे देऊन पुन्हा चर्चेत आली आहे. ‘पुतळ्यात नको मला प्रत्यक्ष आजमावे’ असा दाखलाच उस्मानाबादीने दिला आहे. 

स्थानिक शेळी उत्पादन आणि प्रजनन क्षमतेत सरस आहे. तरी गावठी शेळ्या का पैदास होतात, याचे कोडे मोठे आहे. सात करडे देऊन उस्मानाबादी शेळीने लक्ष वेधले असताना तिच्या रुचकर मांस उत्पादनाचाही विसर पडू नये, यासाठी लोकचळवळ गरजेची आहे.
 

महाराष्ट्र भूषण उस्मानाबादी शेळी स्मृतीशिल्पासाठी नगर परिषदेच्या चर्चेत पराभूत झाली, ही बातमी मनातून विसर पडण्याअगोदर सात करडे देऊन पुन्हा चर्चेत आली आहे. ‘पुतळ्यात नको मला प्रत्यक्ष आजमावे’ असा दाखलाच उस्मानाबादीने दिला आहे. 

अद्‌भूत अपप्रकार नव्हे, विज्ञान
सात करडे एकाच वेतात देऊन उस्मानाबादीने आश्चर्यचकीत केले असताना हा अपघात, अद्भुत अपप्रकार असण्याची शंका अजिबात नसावी. का होतात अधिक करडे? आणि नेहमीच का मिळत नाहीत अधिक करडे? या शंका सर्वसामान्यपणे समोर येतात. विज्ञान समजून घेण्याची मानसिकता आणि सुधारित शेळीपालनाचे धडे यातून करडाचे गणित समजू शकते. जास्तीत जास्त शेळ्यांना अधिक करडे मिळण्यासाठी होणारे प्रयत्न सर्वच स्तरावर कमी असल्याने मिळेल पदरात तेवढ्यात समाधान अशी वृत्ती वाढीस लागलेली दिसून येते. सशक्त शेळीच्या माजातील काळात अधिक संख्येने स्त्रीबीजे मिळाली. सिद्ध बोकडाच्या उत्कृष्ट रेतप्रतीमुळे प्रत्येक स्त्रीबीज फलन लाभले. निर्माण झालेले सगळे गर्भ वाढीस लागण्यास शेळीच्या प्रजननसंस्थेची साथ मिळाली. एकही गर्भपात, गर्भमृत्यू, गर्भवाढरोध न होता प्रसूतीपर्यंत सुलभ गर्भ विकास घडून आला, गर्भाशयाला अधिक गर्भ सांभाळण्याची क्षमता बिनचूकपणे राबविता आली आणि सर्व शक्तीच्या वापरातून शेळीची प्रसूती सुलभ झाली हे विज्ञान.

यशाचे वाटेकरी तिघेही
अधिक करडांचे श्रेय कोणाचे - शेळी, बोकड का पशुपालक? प्रकृती आणि प्रजननक्षमता श्रेय असणाऱ्या शेळी, रेत प्रत देणारा नर आणि शुद्ध पैदासीसह व्यवस्थापन तंत्र सांभाळणारा शेळीपालक हे एकत्रितपणे श्रेय आणि यशाचे वाटेकरी ठरतात. आजपर्यंत उस्मानाबादी शेळ्यांनी सहा करडे नेहमी देण्याचे प्रकार खेडोपाडी घडून आले असून किमान ५०० शेळ्यांनी अशी क्षमता दाखविली आहे. पाच करडांचे वेत देणाऱ्या २५ हजारांवर उस्मानाबादी शेळ्या सर्वत्र असल्या तरी त्यांची कागदोपत्री नोंदच नाही. सातत्याने अधिक करडांची क्षमता उस्मानाबादी शेळ्यात दिसून येताना शेळीपालक संघ जबाबदारीने कार्यरत होणे गरजेचे आहे.

काटेकोर सांभाळ हवा
सात करडांचा सांभाळ काटेकोरपणे राबवताना पहिल्या १५ दिवसांत त्यांच्यासाठी ऊब, दूध, स्वच्छ वातावरण आणि नियंत्रण याची मोठी गरज असते. कमी शरीर वजनाची जन्मलेली करडे वजन वाढीचा वेग कमी दाखवतात. मात्र गतिमान शरीर वजनवाढ घडवून आणण्याचे सुधारित तंत्र अवलंबता येते. शेळ्यांची करडे जगविण्यासाठी इतर शेळ्यांचे दूध, अतिशीत दूध पावडर यासह कृत्रिम पोषण वापरता येते. शरीर उंची अधिक असणाऱ्या शेळ्या आणि कटीभाग मोठा असणाऱ्या शेळ्या अधिक करडे देतात. वय वाढताना करडांची संख्या सतत वाढते. म्हणून वेतसंख्या वाढविणे अपेक्षित असते. नर बोकडाची क्षमता चाचणी तपासण्याच्या सोयी राज्य शासनाने निर्माण केल्या आहेत. शेळी सांभाळात सुधारणा करणारा पैदासकार शेळीपालक मोठी भूमिका निभावत आहे. यामुळे एकूण क्षमतेत वाढ आणि एकत्रित सहभाग यामुळे शेळ्या अधिक करडे देऊ शकतात.

क्षमतावृद्धी कशी घडेल
राज्यात जमनापारी, बीटल, सोजत, सिरोही अशा राज्याबाहेरच्या जातींचा कृत्रिम बोलबाला निर्माण करून स्थानिक उस्मानाबादीकडे दुर्लक्ष अपेक्षित नाही. एकही वंशरहित, निकृष्ट पैदाशीची ‘गावठी’ शेळी निर्माण होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न गरजेचे आहेत. उस्मानाबादी शेळीच्या रुचकर, चविष्ट, रसाळ मांसनिर्मितीची क्षमता सर्वदूर पसरल्यास विकास अधिक वेगाने दिसून येईल. उस्मानाबादी शेळीच्या क्षमतेचा अभ्यास करडांच्या संख्येच्या दृष्टीने करण्यात आला असून एकाच क्षमतेची जनुके अनेक शेळ्यात दिसून आली आहेत. प्रयत्नपूर्वक करडांची संख्या वाढविण्याचे प्रयोग झाले असून क्षमता वर्धानाचा पाठपुरावा सुरू आहे. संशोधन, प्रयत्न आणि सातत्याची जोड मिळण्यासाठी लोकचळवळीची गरज आहे. कारण आजही शेळी शासनस्तरावर वाटपात अडकून पडली असून संवर्धन आणि विकासाच्या दृष्टीने बंदिस्तच आहे. जागरूक शेळीपालकांकडून शुद्ध पैदास, तांत्रिक ज्ञानवर्धन, शासन शिफारशींचा अवलंब याबाबत आग्रही पुढाकार घेतल्यास उस्मानाबादी संवर्धन व क्षमतावृद्धी होऊ शकेल. निवड पद्धतीने पैदास, शुद्ध पैदाशीचे धोरण, अनुवंश जतन ही सकारात्मक वाट शोधण्याची दिशा असून उस्मानाबादी संवर्धक मंडळीनी त्याबाबत शाश्वत प्रयत्न करावेत.

ग्रामीण मुलींची मैत्रीण - शेळी
माजी सनदी पशुसंवर्धन सचिवांनी सुचवलेली किशोरवयीन ग्रामीण मुलींची मैत्रीण म्हणून शेळीची दखल आजही गरजेची आहे. महिला बचत गट आणि स्वयंरोजगार प्रकल्पात उस्मानाबादी शेळी उपयुक्त ठरू शकते. शेळी संगोपनात केवळ ४० टक्के फायदा सांभाळणाऱ्या हातात असून त्याचे प्रमाण दुप्पट करण्यासाठी महिलांनी शेळीची विक्रीसाठी बलस्थाने सिद्ध करणे गरजेचे आहे. राज्यात उस्मानाबादी शेळीचे दूध वापरासाठी बाजारात उपलब्ध करण्याचे प्रयत्न महिला बचत गटाकडून अनेक जिल्ह्यात सुरू आहेत. याबाबत अनभिज्ञता अपेक्षित नाही. शेळीचे मांस ऊर्जायुक्त
प्रथिनांची उपलब्धता असणारे, कॅल्शियम पुरवणारे, कमी पोटॅशियम व सोडीयममुळे रक्तदाब नियंत्रित ठेवणारे, अोमेगा ३ स्निग्ध आम्लयुक्त, बी १२ जीवनसत्त्वामुळे ताण व मानसिक स्वास्थ जपणारे, ब जीवनसत्त्वातून शरीराची चरबी कमी करणारे, हृदयरोगात सुलभ पोषण करणारे शेळी मांस चवीसाठी प्रसिद्ध आहे. साधारणपणे १०० ग्रॅम मांसात १४० कॅलरी ऊर्जा असते.

गरज संशोधनासाठी प्रयत्न वाढविण्याची 
करडांची संख्या अनुवंशिकतेत मापन करणाऱ्या संशोधनात संगमनेरी आणि उस्मानाबादी ह्या जाती कमी फरकाच्या असल्याचे सिद्ध करण्यात आले आहे. बीदरी ही जात उस्मानाबादीचाच कर्नाटकी अवतार असून विविध प्रांतात उस्मानाबादी विभागल्याने निकृष्ट पैदाशीस बळी पडली आहे. ‘स्नॅप्स्’ या उपयुक्त अनुवंश मापन तंत्राने जास्तीत जास्त अभ्यास केल्यास उस्मानाबादीचे पूर्ण स्वरूप, क्षमता, उत्पादकता, उपयुक्तता स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. राज्यात पाळीव पशुंच्या संशोधनासाठी एकही राष्ट्रीय संस्था आजपर्यंत लाभलेली नाही. उस्मानाबादीच्या संशोधनासाठी, प्रकल्पांसाठी अल्पकालीन आर्थिक तरतूद फारसे यश संपादीत करू शकली नाही. उस्मानाबादी शेळीच्या संशोधनासाठी जोरदार प्रयत्न करणे काळाची गरज आहे. विविध रंगी शेळ्यांचा कळप नेहमी दिसत असताना केवळ काळ्या रंगाच्या एकसारख्या जातिवंत उस्मानाबादी शेळ्यांचा कळप सांभाळून क्षमता वाढ हेच लक्ष्य ठेवल्यास अनेक शेळ्यात अधिक करडे मिळू शकतील. यातूनच उस्मानाबादीचा पुतळा सिद्धतेची साक्ष पटवण्यास गावोगावी उभारला जाईल.          
- ८२३७६८२१४१ (लेखक पशुवैद्यक महाविद्यालय, परभणी येथे प्राध्यापक आहेत.)

Web Title: agro news goat born 7 Puppies