द्रवरूप जिवाणू खतांनी उंचावला मालाचा दर्जा

माणिक रासवे
शुक्रवार, 28 जुलै 2017

कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोचले शेतीच्या बांधावर

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय जैविक खत प्रकल्पांतर्गत विविध जिवाणू खतांवर संशोधन झाले. त्याचाच भाग म्हणून घनरूप खतांच्या पाठोपाठ द्रवरूप जैविक खतेही विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली. प्रयोगशील शेतकरीही त्यांचा वापर करत असून, त्यामुळे शेतमालाचा दर्जा वाढण्यास मदत झालीच, शिवाय जमिनीची सुपिकताही वाढीस लागल्याचा त्यांचा अनुभव आहे. 

कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोचले शेतीच्या बांधावर

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय जैविक खत प्रकल्पांतर्गत विविध जिवाणू खतांवर संशोधन झाले. त्याचाच भाग म्हणून घनरूप खतांच्या पाठोपाठ द्रवरूप जैविक खतेही विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केली. प्रयोगशील शेतकरीही त्यांचा वापर करत असून, त्यामुळे शेतमालाचा दर्जा वाढण्यास मदत झालीच, शिवाय जमिनीची सुपिकताही वाढीस लागल्याचा त्यांचा अनुभव आहे. 

परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विभागांतर्गत १९७६ मध्ये अखिल भारतीय जैविक खत प्रकल्प मंजूर झाला. सन १९७७ पासून येथे जीवाणू खतांवरील संशोधनास सुरवात झाली. सुरवातीच्या काळात नत्र स्थिरीकरण प्रकल्पांतर्गंत कडधान्य पिकांच्या मुळांवरील गाठी काढून त्यातील जिवाणू वेगळे करून प्रयोगशाळेत त्यांची वाढ करण्यात आली. अशा जिवाणू खतांची निर्मिती करून विविध पिकांवर चाचण्या घेण्यात आल्या. त्यांचे तुलनात्मक अभ्यास करून निष्कर्ष काढण्यात आले. त्यानंतर घनरूप (सॉलिड) खतांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून ती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली.

द्रवरूप खतांची निर्मिती 

सन २०१३ पर्यंत जिवाणूखतांचा ‘कॅरिअर बेस’ म्हणून लिग्नाइटचा वापर करुन शेतकऱ्यांना रायझोबियम आणि स्फुरद विरघळणाऱ्या (पीएसबी) घनरूप जिवाणू खतांचा पुरवठा केला जायचा. मात्र त्यांचे आयुष्य कमी असायचे. ट्रॅक्टरचलित पेरणीयंत्राद्वारे त्यांचा वापर करीत असताना यंत्राच्या नळ्यांमध्ये खते अडकून राहिल्यामुळे बियाणे जमिनीमध्ये पडत नसे. शेतकऱ्यांकडून तशा प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर घनरूप खतांना पर्याय शोधणे गरजेचे झाले. त्यातून प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डाॅ. सय्यद इस्माईल यांनी २०११ मध्ये द्रवरूप जीवाणू संवर्धक किंवा खतांवर संशोधन सुरू केले. सन २०१३ पासून रायझोबियम, अॅझोटोबॅक्टर, पीएबी ही खते द्रवरूप स्वरुपात तयार करून उपलब्ध करून देण्यात आली. सन २०१५ पासून जिवाणूंचे मिश्रण असलेल्या द्रवरूप खतांची निर्मिती करण्यात आली. यात रायझोबियम, पीएसबी आदींचा समावेश आहे. कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू, संशोधन संचालक डाॅ. दत्तप्रसाद वासकर, तत्कालीन मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख तथा विद्यमान शिक्षण संचालक डाॅ. विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची वाटचाल सुरू आहे.

संशोधकाचा सन्मान 
डाॅ. इस्माईल यांना द्रवरूप जिवाणू खतांच्या संशोधनाबद्दल डाॅ. राधाकृष्ण शांती मल्होत्रा पारितोषिक देऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने २०१५ मध्ये गौरविले आहे. तसेच २०१६ मध्ये ‘इंडियन सोसायटी आॅफ साॅईल सायन्स’ तर्फे मृदगंध पुरस्कार देऊनही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. दरवर्षी मराठवाडा विभागातील आठ तसेच अन्य जिल्ह्यांतील शेतकरी द्रवरूप खते घेऊन जातात. खरीप  हंगामासाठी दरवर्षी १८ मे रोजी होणाऱ्या शेतकरी मेळाव्यावेळी खतांची मोठ्या प्रमाणात विक्री होते, असे डाॅ. इस्माईल यांनी सांगितले.

- डाॅ. सय्यद इस्माईल, ७५८८०८२०४५
 

द्रवरूप जिवाणू खतांविषयी 
पेरणीसाठी एकरी लागणाऱ्या बियाणाच्या प्रमाणात बीजप्रक्रियेसाठी आवश्यक पॅकिंग 
उदा. सोयाबीनसाठी एकरी २५ ते ३० किलो बियाणे लागते. त्यासाठी २५० मिलिलीटरचे पॅकिंग.  २००, ४०० मिली, ८०० मिली, १ लिटर व पाच  लिटर असेही पॅकिंग. 
द्रवरूप खताच्या वापरासाठी कालमर्यादा एक वर्ष तर घनरूप खतांच्या वापरासाठी कालमर्यादा तीन महिने 
प्रतिलिटर ३७५ रुपये दराने द्रवरूप जिवाणू खतांची विक्री कृषी विद्यापीठातील प्रयोगशाळेतून केली जाते. चाचण्या घेतल्यानंतरच शेतकऱ्यांना विक्रीसाठी ती उपलब्ध केली जातात.  ठिबक सिंचनाद्वारे देण्यासाठी तसेच बीजप्रक्रिया व रोपांच्या मुळांवर प्रक्रिया या माध्यमातून त्यांचा वापर केला जातो. 

शेतकऱ्यांचे अनुभव 
सनपुरी, ता. जि. परभणी येथील नरेश शिंदे सुमारे सात वर्षांपासून मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विविध जीवाणूखतांचा ते वापर करतात. यात अझोटोबॅक्टर, ऱ्हायझोबियम, पीएसबी आदींचा समावेश आहे. अलीकडील काळात विद्यापीठाचे सूक्ष्मजीवांच्या कल्चरचे मिश्रण असलेले खतही फायदेशीर ठरल्याचे ते म्हणाले. द्रवरूप किंवा पावडर स्वरूपातील खतांचा प्रसंगानुरूप वापर होतो. कपाशीला व हळदीला सुरवातीला या खतांची बीजप्रक्रिया व त्यानंतर प्रत्येकी तीन महिन्यांनंतर दोन वेळा एकरी ७०० मिली या स्वरूपात खतांचे ड्रेंचिग केल्यास अत्यंत चांगले रिझल्ट मिळत असल्याचे शिंदे म्हणाले.

असे झाले फायदे 
विद्यापीठाची जीवाणूखते अत्यंत खात्रीशीर असतात. त्यांची ‘प्युरिटी’ महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांचाच वापर करण्यावर शिंदे यांचा आग्रह असतो. ट्रायकोडर्मासारख्या जैविक घटकांचाही ते वापर करतात. या जैविक घटकांचे त्यांना जाणवलेले फायदे असे. 
अतिवृष्टीत कापसाची झाडे उमळतात. त्यावर बुरशी येते. मात्र ट्रायकोडमार्कसारख्या घटकाचा वापर केल्याने हे नुकसान कमी होते.  
 पीएसबी, ऱ्हायझोबियम यासारथे घटक जमिनीतील अन्नद्रव्ये पिकांसाठी उपलब्ध करून देतात. किमान तीन वर्षे सातत्याने जैविक घटक वापरल्यास जमिनीतील जीवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. 
 जमिनीचा भुसभुशीतपणा वाढतो. अलीकडील काळात जमिनी खतांच्या अनियंत्रित वापराने कडक झाल्या आहेत. त्यांचा कडकपणा कमी होतो. तीन ते चार वर्षांनी शेणखताची जोड दिल्यास जमीन अधिक सुपीक होण्यास मदत होते. 

हरभऱ्याच्या मुळांवरील गाठींचा आकार 
शिंदे मागील वर्षाचा हरभरा पिकातील अनुभव सांगताना म्हणाले, की जैविक खताच्या वापरामुळे हरभऱ्याच्या मुळांभोवतीच्या गाठींचे निरीक्षण केले. यापूर्वी इतक्या मोठ्या आकाराच्या गाठी अनुभवल्या नव्हत्या. मुळ्याही खोल गेलेल्या आढळल्या. 
- नरेश शिंदे, ९४२१३८६८३३

परभणीच्या कृषी विद्यापीठातर्फे विकसित जीवाणू संवर्धकांचा वापर मी २००१ पासून करतो आहे. त्या काळात पावडर स्वरुपातील खतांचा वापर व्हायच. मात्र, ही खते बियाणास लावणे अडचणीचे ठरत असे. परंतु, आता द्रवरूप स्वरूप असल्याने त्यांचा वापर अधिक सोपा झाला आहे. मी भुईमूग, सोयाबीन या पिकांत त्यांची बीजप्रक्रिया करतो. हळदीतही ठिबकच्या माध्यमातून त्यांचा वापर करतो. 

भुईमुगात झाले फायदे 
खतांची जोड व एकूण व्यवस्थापन यातून भुईमुगाचे एकरी उत्पादन व दर्जा यात १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे आढळले आहे. या पिकाचे एकरी उत्पादन २२ ते २५ क्विंटलपर्यंत मिळते. जैविक खतांच्या वापरामुळे भुईमुगाच्या मुळांवरील गाठींचा आकार अत्यंत पाहण्यासारखा असतो. याचाच मोठा फायदा केवळ त्याच पिकाला नव्हे, तर पुढील पिकालादेखील होतो. नत्रयुक्त खतांच्या वापरात बचत होते. जमिनीत थोडा अोलावा व सेंद्रिय घटकांचा वापर असेल तर अजून मोठा फायदा दिसून येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

- मधुकर घुगे,  कृषिभूषण शेतकरी, केहाळ, ता. जिंतूर, जि. परभणी. ९७६४९२८८१३

Web Title: agro news Good quality of bacterial fertilizers