कापूस संशोधन केंद्राच्या बळकटीसाठी शासन उदासीन

जळगाव कापूस संशोधन केंद्र
जळगाव कापूस संशोधन केंद्र

जळगाव - राज्यात कापूस लागवडीत जळगाव जिल्हा यंदाही पहिला आहे. तब्बल चार लाख ७५ हजार ९४७ हेक्‍टरवर लागवड आहे; पण जळगावातील कापूस संशोधन केंद्राच्या कृषी विद्यापीठ स्तरावर बळकटीकरणाबाबत शासन उदासीन आहे. जिल्ह्यात ९७ टक्के क्षेत्रावर बॅसीलस थुरीलेन्झीस (बीटी) कापूस असतो; पण जळगावातील कापूस संशोधन केंद्रात फक्त देशी कापूस वाणांवर संशोधन चालते. अर्थातच या कापूस संशोधन केंद्राचे बळकटीकरण रखडले असून, त्यासंबंधीचा अहवाल धूळ खात पडला आहे. 

जळगाव जिल्हा मागील दोन हंगामांपासून कापूस लागवडीत राज्यात पहिला आहे. यंदाही पहिला असून, दुसऱ्या क्रमांकाची लागवड यवतमाळ जिल्ह्यात चार लाख ७१ हजार १२५ हेक्‍टरवर झाली आहे. त्यापाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यात चार लाख ६८ हजार ६४ हेक्‍टर क्षेत्र आहे. खानदेशात मिळून आठ लाख २९ हजार १५४ हेक्‍टरवर कापूस आहे. कापूस लागवड व उत्पादनात जळगाव आघाडीवर आहे; परंतु जळगावात कापूस संशोधन केंद्राचे बळकटीकरण तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात करण्याची घोषणा होऊनही झालेले नाही. 

२०१३ मध्येच घोषणा
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जिल्ह्यात आले असता, त्यांनी जळगाव कापूस उत्पादनात आघाडीवर असल्याने कापूस संशोधन केंद्राचे बळकटीकरण केले जाईल. यासोबत टेक्‍सटाइल पार्कला चालना देऊन जळगावला कॉटन हब बनविण्यासाठी पावले उचलली जातील, अशी घोषणा केली होती. यानंतर लागलीच येथील तेलबिया संशोधन केंद्रांतर्गत कार्यरत कापूस संशोधन केंद्राने आपला कापूस संशोधन केंद्र बळकटीकरणाचा प्रस्ताव राहुरी येथील कृषी विद्यापीठाला पाठविला होता. या प्रस्तावात केंद्राला काय गरजा आहेत, या बाबी नमूद केल्या. त्यात कापूस पैदासकार, कीटक व रोगशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा, कृषीविद्यावेत्ता यांची गरज असेल, असे म्हटले आहे; पण या प्रस्तावासंबंधी अजूनही सकारात्मक कार्यवाही वरिष्ठ पातळीवर झालेली नाही. 

फक्त देशी कापूस वाणांवर संशोधन
जळगावात फक्त कोरडवाहू व देशी कापूस वाणांवर संशोधन करण्यासंबंधीचे कापूस संशोधन केंद्र ममुराबाद (जि. जळगाव) येथे आहे. ४५ एकर जमीन त्यासाठी उपलब्ध आहे; पण ते महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या तेलबिया संशोधन केंद्रांतर्गत सुरू असून, फक्त एक कनिष्ठ कापूस पैदासकार येथे कार्यरत आहे. या केंद्रात मागील तीन वर्षांत तीन देशी कापूस वाणांचा शोध लावण्यात आला आहे; पण जळगाव जिल्ह्यात आता देशी कापूस वाण फक्त दोन ते तीनच टक्के क्षेत्रावर लावले जाते. पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस हा ८० हजार हेक्‍टरवर असतो. बीटी कापसाखालील क्षेत्र ९७ टक्के असते. अर्थातच जळगावातील कापूस संशोधन केंद्राचा फारसा उपयोग जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना नाही. 

नगरला कापूस कमी; पण केंद्र मोठे
नगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात अखिल भारतीय समन्वित कापूस सुधार प्रकल्प कार्यरत असून, या केंद्रात रोग व कीटकशास्त्रज्ञ, कापूस पैदासकार, प्रयोगशाळा व इतर यंत्रणा आहे. त्यात पूर्वहंगामी (बागायती) व इतर कापसावर संशोधन केले जाते. नगर जिल्ह्यात फक्त एक लाख तीन हजार ४४० हेक्‍टवर कापूस आहे. नगर जिल्हा पुणे विभागात येतो. या विभागात कापसाची फारशी लागवड नाही. हे केंद्र जळगावात स्थलांतरीत करण्याची मागणी मध्यंतरी कापूस उत्पादकांनी केली होती; पण तीदेखील दुर्लक्षित आहे. 

जळगावात ब्रिटिशांनीदेखील कापसाचा व्यापार केला. त्यांनी १९२७ मध्ये ममुराबाद (जि. जळगाव) येथे कापूस संशोधन केंद्र उभारले होते. जळगावचा कापसाचा इतिहास लक्षात घेता सुसज्ज असे कापूस संशोधन केंद्र असायला हवे. 
- किशोर चौधरी, कापूस उत्पादक, आसोदा (ता. जळगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com