शास्त्रीय पद्धतीनेच करा गहू बीजोत्पादन

समीर रासकर, विठ्ठल गिते, डॉ. यशवंतकुमार
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

आनुवंशिक आणि भौतिकदृष्ट्या शुद्ध असणारे गहू बियाणे तयार करणे फायदेशीर ठरते. गव्हामध्ये बीजोत्पादन क्षेत्रापासून तीन मीटर अंतरावर त्याच जातीचे पीक असू नये. बीज प्रमाणीकरण संस्थेने प्रमाणित केलेले बियाणे वापरावे. बियाण्याच्या पिशवीवर असलेले लेबल व बियाणे नमुना जपून ठेवावा.  

आनुवंशिक आणि भौतिकदृष्ट्या शुद्ध असणारे गहू बियाणे तयार करणे फायदेशीर ठरते. गव्हामध्ये बीजोत्पादन क्षेत्रापासून तीन मीटर अंतरावर त्याच जातीचे पीक असू नये. बीज प्रमाणीकरण संस्थेने प्रमाणित केलेले बियाणे वापरावे. बियाण्याच्या पिशवीवर असलेले लेबल व बियाणे नमुना जपून ठेवावा.  

गहू बीजोत्पादनासाठी बियाणे निवड करताना आपल्याला कोणत्या प्रकारचे बियाणे लागवडीसाठी वापरायचे आहे, ते निश्‍चित करावे. पायाभूत बियाणे तयार करण्यासाठी मूलभूत बियाणे आणि प्रमाणित बियाणासाठी पायाभूत बियाणे वापरावे. बियाणे खरेदी करताना बीज प्रमाणीकरण संस्थेने प्रमाणित केलेले बियाणे वापरावे. बियाण्याच्या पिशवीवर असलेले लेबल व बियाणे नमुना जपून ठेवावा. 

बियाणे प्रक्षेत्र नोंदणी 
प्रमाणित बीजोत्पादन घेण्यापूर्वी त्यांची नोंद जिल्हा बीज प्रमाणीकरण कार्यालयात करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी संबंधित कार्यालयात संपर्क करावा. 

लागवडीचे व्यवस्थापन 
बीजोत्पादन करताना शिफारशीप्रमाणे पिकाचे व्यवस्थापन ठेवावे. माती परीक्षणानुसार खतमात्रा, वेळेवर कीड, रोग नियंत्रणाचे उपाय, पिकाच्या गरजेनुसार पाणी व्यवस्थापन योग्य रितीने करावे. लागवड करताना मागच्या वर्षी गहू त्याच क्षेत्रात घेतलेला नसावा. 

विलगीकरण 
बियाणाची अनुवांशिक शुद्धता राखण्यासाठी काही ठराविक अंतरावर त्या पिकाची लागवड असता कामा नये. गव्हामध्ये बीजोत्पादन क्षेत्रापासून ३ मीटर अंतरावर त्याच जातीचे पीक असू नये. 

भेसळ काढणे 
अानुवंशिकता राखण्यासाठी भेसळ काढणे महत्त्वाचे आहे. निवडलेल्या जातीव्यतिरिक्त इतर गव्हाच्या जाती, वेगळे गुणधर्म, रोग व कीड असलेली झाडे फुलावर येण्यापूर्वी काढून नष्ट करावीत.

पानाचा रंग आकार, खोडाचा रंग, ओंब्याची मांडणी, झाडाची उंची, ओंबीचा आकार, केसाळपणा, ठिपके इ. बाबींवरून भेसळ असलेली झाडे ओळखून ती काढून टाकावीत. 

काढणी 
काढणी, मळणी करताना भेसळ अजिबात होऊ देऊ नये. प्रमाणीकरण यंत्रणेकडून तपासणी झालेल्या क्षेत्रात गव्हाची काढणी झाल्यानंतर ते बियाणे प्रक्रिया केंद्रावर पाठवावे. तिथे बियाण्यावर सर्व प्रकारची प्रक्रिया करून उच्च दर्जाचे बियाणे पिशव्यांमध्ये भरून साठवणूक करावी. 

साठवणूक करण्यापूर्वी बियाणामध्ये १२-१३ टक्के आर्द्रता असणे 
आवश्‍यक आहे. त्या प्रमाणे वाळवण करावी, असे बियाणे एक वर्षभर साठवता येते. 

बियाण्याची गुणवत्ता 
पायाभूत व प्रमाणित बियाण्याची शुद्धता ही ९८ टक्के असते. उगवण क्षमता ८० टक्के व ८ ते १३ टक्के आर्द्रता असावी.
अशुद्ध आणि पोचट बियाणे प्रमाण दोन टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असता कामा नये.
बीजोत्पादन केल्यानंतर बियाणे वजन करून त्याला माहितीचे लेबल लावावे. मोहरबंद पिशवीतून विक्रीसाठी पाठवावे.
- समीर रासकर, ९६२३३२१९०५ (अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, पुणे.)

गहू बीजोत्पादनातील टप्पे
मूलभूत बियाणे  

 हे बियाणे गहू पैदासकार संशोधन करून स्वतःच्या देखरेखीखाली तयार करतात.
  आनुवंशिक शुद्धता १०० टक्के असते. बियाणांचे प्रमाणीकरण होत नाही. 
 पैदासकारांच्या देखरेखीखाली संशोधन केंद्रावर उत्पादन. पुढे पायाभूत बियाणे बनविण्यासाठी वापरतात.
  बियाणे पिशवीला पिवळे लेबल असते.

पायाभूत बियाणे 
 मूलभूत बियाण्यापासून बनवितात.  
 कृषी विद्यापीठ, महाबीज व बीजगुणन केंद्रांच्या प्रायोगिक क्षेत्रावर प्रमाणीकरण यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली बनवितात. 
  आनुवंशिक शुद्धता १०० टक्के. प्रमाणित बियाणे तयार करण्यासाठी वापरतात. 
 बियाणे  पिशवीला पांढरे लेबल असते.

प्रमाणित बियाणे 
 प्रगतशील शेतकरी, कृषी विद्यापीठे,शेतकरी मंडळे यांच्या प्रक्षेत्रावर तयार केले जाते.  
 पिशवीला निळे लेबल असते.

सत्य प्रत बियाणे  
 बीजोत्पादक संस्था किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांच्या नियंत्रणाखाली बनवितात.  
 प्रमाणित किंवा पायाभूत बियाणे वापरून बनवितात. 
 या बियाणे क्षेत्राच्या नोंदणीची गरज नसते. 
 पिशव्यांना हिरवे लेबल असते.

Web Title: agro news Grafted wheat seeds through classical method