डाळिंब मार्केटमुळे उत्पादकांना आधार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 डिसेंबर 2017

नगर - राज्यात अग्रेसर असलेल्या नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड परिसरात दिवसेंदिवस जागा कमी पडत असल्याने नेप्ती परिसरात उपबाजार समितीची स्थापना करण्यात आली. येथे डाळिंब मार्केट सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. शेतकरी आणि व्यापारी ही बाजार समितीची दोन चाके आहेत, असे मत आमदार शिवाजी कर्डिले यांनी व्यक्‍त केले. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत आमदार कर्डिले यांच्या हस्ते शनिवारी (ता. २) डाळिंब मार्केटचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. 

या वेळी अध्यक्षस्थानी आमदार अरुण जगताप होते. प्रमुख पाहुण्या म्हणून माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेडे, राम कुलकर्णी, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, युवा नेते अक्षय कर्डिले, बाजार समितीचे सभापती विलास शिंदे, उपसभापती रेवण चोभे, सचिव अभय भिसे आदी उपस्थित होते. 

श्री. कर्डिले म्हणाले, ‘‘बाजार समितीतील गर्दीमुळे शहरात वाहतुकीचा मोठा खोळंबा होत होता. नेप्ती उपबाजार समितीमुळे तो काहीसा कमी होण्यास मदत झाली. गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची बाजाराची मागणी होती. ती पूर्णत्वास गेल्याने नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, पाथर्डी, आष्टी, जामखेड, शेवगाव, नेवासे तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. बाजार समितीने शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी सातत्य ठेवले आहे. डाळिंब खरेदी करणाऱ्यांनी आपल्या व्यवहारात पारदर्शीपणा ठेवून शेतकऱ्यांचे हित जपावे. शेतकरी निवासाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध सुविधा पुरविण्यात येतात. आगामी काळात संत्रा व मोसंबीचे मार्केट सुरू करण्याचा मानस आहे.’’ 
श्री. जगताप म्हणाले, ‘‘नगरचा कांदा बाजार राज्यभरात प्रसिद्ध आहे. याच धर्तीवर फळांचा बाजारही प्रसिद्ध व्हावा. बाजार समितीने प्रत्येक शेतकऱ्याची काळजी घेतली पाहिजे.’’ 

डाळिंबाच्या क्रेटला मिळाला अकराशे रुपयांपर्यंत भाव 
डाळिंब खरेदीसाठी राज्याबाहेरून आंध्र, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, जम्मू-काश्‍मीर येथील व्यापारी आले होते. पहिल्या दिवशीच बाजारात बारा हजार क्रेट (अडीच टन) डाळिंब विक्रीसाठी आले होते. प्रतिक्रेट (वीस किलो) तीनशे ते अकराशे रुपयांपर्यंत भाव मिळाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news growers due to pomegranate market