Hasta-Village
Hasta-Village

हस्ता गावाने एकजुटीने पकडला विकासाचा रस्ता

अौरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील हस्ता गावाने विविध उपक्रमांच्या जोरावर विविध विकासकामे घडवून आणली आहेत. जलसंधारणाच्या माध्यमातून गावाने पाणीटंचाईवर मात केली. तसेच दुग्ध व्यवसाय, शेती केंद्रित अर्थव्यवस्थाही मजबूत करीत गावाने विकासाचा रस्ता पकडला आहे.

गावानं स्वयंनिर्भर होण्यासाठी नेमकं काय करायला हवं याचं उदाहरण म्हणून हस्ता गावचं देता येतं. अौरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील सव्वाचारशे उंबऱ्याच्या १७६४ लोकसंख्येचं हे गाव आहे. गावातील सुमारे ८० टक्‍के लोकांचे जीवनमान शेतीवर अवलंबून आहे. दुग्ध व्यवसायाची जोड काहींनी दिली आहे.

प्रत्येकाने आपली जबाबदारी अोळखली. शेतीतील प्रगतीच्या वाटा त्यातून ठळक झाल्या. गावातील युवा पिढी विकासासाठी आग्रही झाली. शंभर टक्‍के शौचालययुक्‍त झालेलं हस्ता गाव संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात दोन वेळा औरंगाबाद जिल्ह्यातून दुसरे, एकदा कन्नड तालुक्‍यात स्मार्ट ग्राम म्हणून प्रथम आले. प्रगत विचार आणि पाणी या दोन महत्त्वाच्या विषयांवर लोकांच्या मानसिकतेत झालेला बदल, यामुळं हे परिवर्तन शक्‍य झाल्याचं ग्रामस्थ सांगतात. या सर्व कामी लुपीन फाउंडेशन संस्थेचे सहकार्य गावाच्या प्रगतीच्या वाटेत मैलाचा दगड ठरते आहे.

हस्ता गाव- प्रगतिपथावरील ठळक बाबी
     आले, मका, कपाशी, गहू, कांदा बीजोत्पादन  
     यंदा गव्हाच्या बीजोत्पादनातही सहभाग. 
     सुमारे तीन किलोमीटरपर्यंत नाला खोली-रुंदीकरण 
     नाल्यावरील बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन  
     जलयुक्‍त अंतर्गत डीप सीसीटी, मातीनाला बांध, बांधबंदिस्ती  
     गावातील प्रत्येक कुटुंबाकडे शौचालयाची निर्मिती 
     जवळपास वीस लोकांकडे शेळीपालन व्यवसाय 
     चार ते पाच जणांकडे कुक्‍कुटपालन 
     जवळपास २२० एकरांवर पीक प्रात्यक्षिके  
     भाजीपाला उत्पादन ते विक्रीपर्यंतचा प्रयत्न 
     ग्रामपंचायत पूर्णत: सौरऊर्जेवर  
     जवळपास दीडशे शेतकऱ्यांना प्रशिक्षण व विविध ठिकाणी भेटीची संधी 
     प्रात्यक्षिकांतर्गत जवळपास दीडशे शेतकऱ्यांना बियाण्यांची मदत 
     तेरा गांडूळखत युनीट निर्मिती 
     जवळपास १४० शेतकऱ्यांना शेतीविषयक विविध विषयांतील प्रशिक्षण 
     जनावरे लसीकरणासाठी शिबिराचे आयोजन 
     सुमारे ९० युवतींना शिवणकाम प्रशिक्षण 
     सहा महिला बचत गटांना जवळपास वीस लाखांचे कर्जरूपात अर्थसाह्य  
     सुमारे १२० विद्यार्थ्यांना संस्कारक्षम मार्गदर्शनासाठी शिबिर
     चारशे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स तसेच संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून सोय 
     वृक्ष लागवड, बायोगॅस युनीट, सुमारे ६५ जणांना सौरदिव्यांचे वाटप. 
     शुद्ध जल प्रकल्पासह गावात पेवर ब्लॉक्स बसविण्याचे काम प्रगतिपथावर 
 सुकन्या योजना, विमा योजना, अटल पेन्शन योजनेत ग्रामस्थांचा लक्षणीय सहभाग 

दुग्ध व्यवसायाचा हातभार 
गावात निम्मी कुटुंबे दुग्ध व्यवसाय करतात. कालिका डेअरीच्या माध्यमातून आजघडीला जवळपास दीडशे लिटर दुधाचे संकलन केले जाते. दर दहा दिवसांनी हाती समाधानकारक रक्कम उत्पादकांच्या हाती पडते, अशी माहिती रामदार पंडितराव शिंदे यांनी दिली. 

वर्षभरात दहा ते बारा ग्रामसभा महत्त्वाच्या निर्णयासाठी ग्रामसभा घेण्यावर ग्रामस्थांचा व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा भर असतो.  त्यामुळे गावातील महत्त्वाचे प्रश्न व त्यावरील समस्या कळणे ग्रामस्थांना शक्य होते. 
त्यादृष्टीने सकारात्मक विचाराने विकासकामांना हातभार लावण्यासाठी ते पुढे येतात असा अनुभव येत आहे. वर्षभरातून किमान दहा ते बारा ग्रामसभा होत असल्याचे गावातील आजी-माजी पदाधिकारी सांगतात. 

आर्थिक स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट 
ग्रामस्थांना आर्थिक स्वयंपूर्णतेकडे नेण्याचे धोरण ग्रामपंचायतीने हाती घेतले आहे. सन २०२२ पर्यंत गावातील विकासकामांसाठी ग्रामपंचायतीला शासनावर निर्भर राहावे लागू नये, यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर पुढील तीन वर्षे काम केले जाणार अाहे. असे माजी सरपंच व गावबदलाच्या कामात पुढाकार घेणारे मनोहर निळ सांगतात. शेती उत्पादनातून प्रत्येक कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे तसेच गावातील छोट्या मोठ्या व्यावसासिकांच्या अर्थकारणात वृद्धीही असे उद्दिष्ट समोर ठेवल्याचे निळ यांनी सांगितले.

पुढील उद्दिष्टे 
गांडूळ खतनिर्मितीचे फायदे ओळखलेल्या ग्रामस्थांसाठी गावच्या आसपास कचरा साठविण्याची व्यवस्था निर्माण केली जाईल. त्या माध्यमातून गांडूळ खतनिर्मितीचे काम केले जाणार आहे. यासोबतच ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास दोन एकर शेतीवर येत्या खरिपात दहा बाय तीन फूट अंतरावर आंब्याची लागवड करण्यात येणार आहे.  

गावातील शेतकऱ्यांनी यंदा गहू बीजोत्पादनात योगदान दिले आहे. त्यातून साडेतीन ते चार हजार क्‍विंटल बीजोत्पादन झाले. उत्पादकांना चांगले दर व शाश्वत विक्रीचा मार्ग त्यातून सापडणार आहे. 

प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जवळपास चार हजार गावरान आंब्यांची झाडे आहेत. प्रत्येक झाड किमान वीस हजार ते एक लाख रुपयांचे उत्पन्न देऊन जाते. त्यामुळे आंब्यांच्या संगोपनावर गावकरी विशेष लक्ष देतात. गावरान आंब्यांची लागवड ते विक्री असा हस्ता पॅटर्न विकसित करण्याचा प्रयत्न यंदा ग्रामस्थ करतील.

पुनर्वापर, पुनर्भरणावर भर
गावशिवारात लुपीन फाउंडेशन सोबतच जलयुक्‍त शिवारच्या माध्यमातून डीप सीसीटी, मातीनाला बांध, बांधबंदिस्तीची कामे करण्यात आली. सोबतच गावातील सांडपाणी निश्चित ठिकाणाहून जाण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. पाण्याचा पुनर्वापर किंवा पुनर्भरणाच्या कामाला प्राधान्याने हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी पाणी स्थिरीकरण तळे करण्याचे काम हाती घेतले आहे. जवळपास शंभर शोषखड्डे ‘लुपीन’च्या सहकार्यातून आवश्‍यक ठिकाणी घेण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्यातील घारेवाडी येथील प्रशिक्षण भेटीमुळे गाव विकासासाठी काम करण्याची सकारात्मक ऊर्जा मिळाली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ४५ युवकांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदविला. हीच उर्जा घेऊन गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वयंपूर्ण करण्यावर पुढील तीन वर्षांत आमचा भर असेल. 
- मनोहर निळ, माजी सरपंच, हस्ता, ९८२२११११०५ 

विकासकामे करताना गावकऱ्यांच्या सहकार्याची मोठी मदत होते. प्रत्येक कामात सहभागी होणारे ग्रामस्थ आमचा उत्साह वाढवितात.  
- रावसाहेब बढे, मुख्य कार्यक्रम समन्वयक,
बाळासाहेब गर्जे, लुपीन फाउंडेशन औरंगाबाद, ७७१९९०१५५५ 

सर्वांच्या एकीकरणातून तसेच जिल्हा परिषद, कृषी विभाग यांच्या सहकार्यातून गावाच्या स्वयंपूर्णतेसाठी आमचे प्रयत्न आहेत. गावकुसात झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे कधीकाळी टॅंकरशिवाय पर्याय नसणाऱ्या आमच्या गावाला आता टंचाईची झळ बसत नाही ही वस्तुस्थिती आहे. अनेक विहिरी दिवसभर पाणी पुरवितात. 
- सर्जेराव आव्हाळे, उपसरपंच, हस्ता, ९६०४३६४९७७ 

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नवाढीसाठीचा आमचा प्रयत्न आहे. गावाचे संकेतस्थळ तयार करून गावच्या विकासाची अद्ययावत माहिती लोकांपर्यंत पोचविली जाईल. 
- जी. डी. चव्हाण, ग्रामसेवक, ९०४९२५३२१७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com