कोपा मांडवीतील शेतकऱ्यांनी बनवला मधाचा ‘मधुर’ ब्रॅंड

कोपा मांडवीतील शेतकऱ्यांनी बनवला मधाचा ‘मधुर’ ब्रॅंड

‘बी.एससी. मायक्रोबॉयोलॉजी’पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता कोपा मांडवी (जि. यवतमाळ) येथील विकास क्षीरसागर या युवकाने शेतीतच करीअर करण्याचा निर्णय घेतला. विचारांना कृतीत आणत शेतीला मधमाशीपालनाची जोड दिली. गावातील अन्य शेतकऱ्यांनाही या व्यवसायात समाविष्ट करीत त्यांनाही विकासाच्या प्रवाहात आणले आहे. आज ‘मधुर आॅरगॅनिक हनी’ नावाने उत्पादीत मधाचे ब्रॅंडिंग व विक्री करण्यात गटाला यश आले आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात हैदराबाद पांढरकवडा मार्गावर कोपा मांडवी (ता. पांढरकवडा) हे जेमतेम लोकवस्तीचे गाव. याच गावातील विकास क्षीरसागर या युवकाने सूक्ष्मजीवशास्त्र विषयातून पदवी प्राप्त केली. आपल्या आठ एकरांत कपाशी घेण्यावर त्यांचा भर राहतो. गावापासून टिपेश्‍वर अभयारण्य सुमारे पाचशे मीटरवर आहे. अभयारण्यालगतच्या गावांमध्ये जनवन विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे सचिव वन संरक्षक म्हणूनही विकास जबाबजारी पाहतात. रोजगार निर्मिती आणि ग्रामविकास असा समितीचा उद्देश आहे. गावात रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी शेतीपूरक उद्योगाचे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेची मदत वनविभाग घेतो. त्यानुसार मधमाशीपालन प्रशिक्षणाचा लाभ गावातील युवकांना देण्यात आला आहे. प्रशिक्षणानंतर या युवकांना प्रत्येकी दोन मधपेट्याही मोफत देण्यात आल्या. 

प्रशिक्षणाद्वारे ज्ञानात पारंगत
जनवन विकास समितीअंतर्गत जसा गट आहे, तसाच तो ‘आत्मा’ यंत्रणेअंतर्गतदेखील आहे. विकास यांनी मधमाशीपालन करण्यापूर्वी खादी व ग्रामोद्योग संस्थेमार्फत तसेच राष्ट्रीय मधमाशीपालन बोर्ड यांच्यातर्फे अमृतसर येथे जाऊन काही कालावधींचे प्रशिक्षण पूर्ण केले. सेंटर ऑफ सायन्स फॉर व्हिलेजेस या वर्धा येथील संस्थेत यातील काही प्रशिक्षण झाले. उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. राहूल सातपुते, आत्माचे प्रकल्प संचालक दत्ता काळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धीरज वानखेडे यांनी विकास यांचा उत्साह पाहता त्यांना प्रोत्साहन दिले 

मधउत्पादन व विक्री 
विकास यांच्या पेट्या- ३२- संवर्धन- सातेरी मधमाशांचे- मिळणार मध- ३० किलो प्रति पेटी- वर्षभरात  
 गटाच्या मिळून पेट्या- ८० यात अेपीस मेलिफेरा- संवर्धन- युरोपीय मधमाशी-  एकूण मध संकलन- ७० ते ८० किलो व कमाल १०० क्विंटल, सरासरी ५० क्विंटल
 वनविभागाला मुख्य विक्री. प्रदर्शनातूनही विक्रीवर भर. 
 मधुर ऑरगॅनीक हनी'' नावाने ब्रॅंडिंग
 अन्न सुरक्षिततताविषयक (फूड सेफ्टी) संस्थेचा परवानाही मिळाला.
 पंधरा ग्रॅमपासून ५०, १००, २५०, ५०० ग्रॅम व एक किलो पॅकिंगमधून विक्री. 
 एक किलो मधाचा दर- ३६० रुपये 
 आग्यामोहोळ मधमाशांपासूनचा मधही २८० रुपये किलो विकला जातो.  
 धार्मिक विधी तसेच औषधी म्हणून छोट्या बॉटलमधील मधाला मागणी असल्याचे लक्षात आल्यानंतर पंधरा ग्रॅमसारखे छोटे पॅकिंग करण्यात आले. 
 विकास यांनी वर्षात वैयक्तिकरीत्या सुमारे सव्वा तीन क्‍विंटल तर गटातर्फे चार क्विंटल विक्री.
 प्लॅस्टीक बॉटलचा वापर पॅकींगसाठी होतो. ‘फ्लिप’ प्रकारातील झाकण असलेल्या बॉटल हव्यात अशी ग्राहकांची मागणी होती. त्यानुसार तशा प्रकारच्या बॉटल्स नागपूरहून आणल्या. एक किलोच्या अशा बॉटलसाठी १२ रुपये मोजावे लागतात. 
   
सातेरी माशांचे संगोपन
सातेरी मधमाशा स्वभावाने शांत असतात. यांच्या मधात औषधी गुणधर्मही जास्त असतात. टिपेश्‍वर अभयारण्य जवळच असल्याने मधमाशीपालक याच भागातून त्यांचे शास्त्रीय दृष्ट्या संकलन करतात. मिरची, मोहरी, झेंडू, कोथिंबीर, कांदा यासारख्या पिकांचा वापर पराग किंवा मकरंद संकलनासाठी होतो. टिपेश्‍वर अभयारण्यातील जंगली फुलेही त्यासाठी उपयुक्त ठरतात. 
यंदाच्या वर्षी झेंडू, गॅलार्डिया या फुलांची लागवड विकास यांनी केली आहे. व्यापार संबंधित एका संकेतस्थळावर ‘मधुर हनी’ ब्रॅंडची नोंदणीही केली आहे. त्यामार्फतही ग्राहकांचा प्रतिसाद येऊ लागला आहे. पुढील काळात निर्यातीवर भर देणार असल्याचे विकास यांनी सांगितले.  

युवकांना मिळाला रोजगार
आत्माअंतर्गत आदर्श कृषक शेतकरी गट नोंदणीकृत आहे. यात ११ जणांचा समावेश अाहे.
विकास क्षीरसागर, हनुमंत कायपेल्लीवार, लोकेश देशेट्टीवार, पंकज नागरकर, श्रीनिवास गौरवार, गणेश पार्लावार, प्रसाद क्षीरसागर हे त्यातील काही सदस्य आहेत. गटातील काही सदस्यांकडे मार्केटिंगची जबाबदारी सोपविली आहे. दोन वर्षांपूर्वी व्यवसायाला सुुरवात झाली.  

ॲग्रोवनमधील यशकथेने केले मार्गदर्शन  
विकास यांना मधमाशीपालनाविषयी अधिक मार्गदर्शन ॲग्रोवनमधील यशकथेतून झाले. ॲग्रोवनमध्ये मागील वर्षी कोसबाड- दळवीपाडा (ता. डहाणू, जि. पालघर) येथील कल्लू वांगड या मधमाशीपालकाची यशकथा प्रसिद्ध झाली होती. या शेतकऱ्याशी विकास यांनी संपर्क साधला व प्रत्यक्ष मार्गदर्शनाची विनंती केली. मात्र दोन्ही गावांतील अंतर पाहता ते कल्लू यांना शक्य नव्हते. अखेर फोनद्वारेच दोघे एकमेकांच्या सतत संपर्कात राहिले. त्यातून मधमाशीपालनाचे तांत्रिक धडे आपण घेतल्याचे विकास यांनी सांगितले. 

पेट्या विक्रीतूनही अतिरिक्त उत्पन्न 
मधमाशांच्या वसाहती असलेल्या पेट्यांनाही मागणी राहते. आजवर विकास यांनी सुमारे ७० पेट्या विकल्या आहेत. रिकाम्या पेट्या ते प्रति नग १८०० रुपयांना चंद्रपूर येथील मित्राकडून आणतात. मधमाशांची वसाहत असलेली पेटी साडेपाच हजार रुपयांना विकली जाते. त्याचा अन्य शेतकऱ्यांना फायदा होतोच. शिवाय विकास यांना अतिरिक्तच उत्पन्न मिळते. 

- विकास क्षीरसागर, ९७६७७२६८७८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com