भातावरील रोगांची लक्षणे अोळखणे महत्त्वाचे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

सध्या काही ठिकाणी भात पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत अाहे. येत्या काळामध्ये पिकावर बुरशीजन्य पर्ण करपा, करपा, कडा करपा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रोगांची लक्षणे ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

सध्या काही ठिकाणी भात पीक फुटवे येण्याच्या अवस्थेत अाहे. येत्या काळामध्ये पिकावर बुरशीजन्य पर्ण करपा, करपा, कडा करपा या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. रोगांची लक्षणे ओळखून नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.

साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पीक फुटवे येण्याच्या उत्तर अवस्थेत आणि पोटरी अवस्थेत असताना पिकावर बुरशीजन्य पर्ण करपा, खोड करपा, जिवाणूजन्य करपा आणि काही भागात पर्णकोष करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. त्यानंतर पुढील टप्प्यात फुलोरा अवस्थेत वातावरण सतत ढगाळ राहिल्यास तसेच नियमित मध्यम ते तुरळक पाऊस सतत राहिल्यास पिकांवर पर्णकोष कुजवा, आभासमय काजळी आणि लोंबीतील दाणे काळे पडणे या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

ज्या शेतकऱ्यांनी सातत्याने सुवर्णा आणि रत्नागिरी २४ या जातींची लागवड केली आहे, अशा शेतामध्ये गेल्या काही वर्षांपासून बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतो आहे.
बहुतांश संकरीत जातीवर आभासमय काजळी रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.
रायगड जिल्ह्यातील सखल पाणथळ भागामध्ये भातावर जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे.

कडा करपा (जिवाणूजन्य करपा)
रोगग्रस्त रोपांची पाने कडेकडून मध्य शिरेच्या दिशेने करपतात. कालांतराने संपूर्ण पान करपते.
सकाळी पानांचे निरीक्षण केले असता पानांच्या खालच्या बाजूला दुधाळ रंगाचे जिवाणूंचे दवबिंदू साचलेले दिसतात.
चुडातील पाने करपून रोपे मरतात. या अवस्थेस क्रेसेक किंवा रोपांची मर असे म्हणतात.
रोगाचा प्रादुर्भाव पीक फुलोऱ्यात असताना झाल्यास दाणे कमी भरतात. पळींजाचे प्रमाण वाढते.

नियंत्रणाचे उपाय -
पावसाची उघडीप बघून कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम आणि स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट * ५  ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी, १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. 
शेतातील जादा पाण्याचा निचरा करावा.
पिकाला नत्रजन्य खतांची पुढील मात्रा कमी प्रमाणात द्यावी.

करपा (बुरशीजन्य करपा) 
सर्व अवस्थांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होतो.
पानांवर शंखाकृती किंवा डोळ्याच्या आकाराचे करड्या रंगाचे ठिपके आढळतात.
पानांवरील ठिपका मध्यभागी राखाडी रंगाचा आणि कडा तपकिरी असलेला दिसून येतो. असंख्य ठिपके एकत्र मिसळून पान करपते.
रोगाचा प्रादुर्भाव रोपाच्या पेरावर झाल्यास रोगग्रस्त भाग काळा पडून कुजतो, रोप पेरात मोडते.
लोंबीच्या देठाचा भाग काळा पडून कुजतो. लोंबी रोगग्रस्त भागात मोडून लोंबत राहते. 
लोंबीतील दाण्यावर रोगाचे तपकिरी काळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात.

नियंत्रणाचे उपाय -
ट्रायसायक्लॅझोल (७५ टक्के) १० ग्रॅम  प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी. १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या घ्याव्यात. 
नत्रयुक्त खतांची पुढील मात्रा कमी प्रमाणात द्यावी.
 

पर्णकोष करपा
चुडाच्या तळाशी खोडावर तपकिरी रंगाचे अनियमित आकाराचे लांबट ठिपके तयार होतात.
रोगट भागात बुरशी आत शिरून खोड कमकुवत करते. खोडाचा चिवटपणा कमी होऊन रोप कोलमडते.
पीक करपते. लोंबी भरत नाही.
दाटीने वाढलेल्या शेतात रोग मोठ्या प्रमाणात पसरतो.

नियंत्रणाचे उपाय -
प्रोपीकोनॅझोल १० मि.लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
शेतातील पाण्याचा पूर्णपणे निचरा केल्यानंतर फवारणी करावी.
बुरशीनाशकाची फवारणी चुडातील आतल्या भागातील खोडावर होईल याकडे लक्ष द्यावे.

- डॉ. मकरंद जोशी - ९४२०६३९३२० (लेखक वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी येथे कार्यरत आहेत)

Web Title: agro news It is important to know the symptoms of rice diseases