चारठाणा झाले ‘जलयुक्त’ शेती अर्थकारणाला मिळाली गती

नदीवरील बंधारा.
नदीवरील बंधारा.

जलयुक्त शिवार अभियान आणि लोकसहभाग यातून चारठाणा (जि. परभणी) गावशिवारात जलसंधारणाची विविध कामे घडली. त्याद्वारे पावसाचे पाणी अडविण्यात आले. आज विहिरींच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने पीकपद्धती बदलत आहे. रब्बी क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलू लागले आहे.
 

परभणी जिल्ह्यात जिंतूर-मंठा-जालना रस्त्यावर चारठाणा (चारुक्षेत्र) (ता. जिंतूर, जि. परभणी) हे ऐतिहासिक गाव आहे. हेमाडपंथी स्थापत्यकलेची मंदिरे, बारव, झुलता स्तंभ यासाठी चारठाणा प्रसिद्ध आहे. 

चारठाणा गाव दृष्टिक्षेपात 
लोकसंख्या - सुमारे १५ हजार
गाव शिवारातील २,४७६ हेक्टर जमीन लागवडीयोग्य. पैकी १७१ हेक्टर बागायती तर २,२९२ हेक्टर जिरायती
एकूण १,६१५ शेतकरी खातेदार 
खरिपाचे एकूण क्षेत्र १,२४८ हेक्टर. मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कापूस, हळद,ज्वारी ही पिके. 
रब्बी क्षेत्र - ७२० हेक्टर. ज्वारी,गहू, हरभरा, मका, करडई आदी पिके.
उन्हाळी हंगामात भुईमूग, चारापिके.
फळपिके, भाजीपाला, फूलशेतीचे एकूण क्षेत्र - १९ हेक्टर 
शिवारात आठ सूक्ष्म पाणलोट क्षेत्र
गावचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ८१० मिमी

पाणीटंचाईच्या झळा 
गेल्या काही वर्षांपासून चारठाणा भागात पाऊस अनियमित होता. माळरानाच्या जमिनींचा उतार जास्त असल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता मोठ्या प्रमाणात वाहून जायचे. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर जेमतेम डिसेंबरपर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहायचे. त्यामुळे सर्व मदार खरिपावरच अवलंबून असे. 

जलयुक्त अभियानात निवड
जानेवारी-फेब्रुवारीपासूनच गावाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागे. राज्याच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्याच वर्षी (२०१५) चारठाणा गावाची निवड झाली. शिवारफेरीच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करण्यात आले. शिवारातून वाहणारी करपरा नदी तसेच गोदरी नाला यांवर असलेल्या जुन्या बंधाऱ्यांचे खोलीकरण तसेच नवीन साखळी बंधारे घेण्याचे नियोजन करण्यात आले.

पाण्याचा ताळेबंद....
पिण्यासाठी १८३.१० तर पिकांसाठी १,२७६ .३८ टीसीएम अशी गावाची एकूण पाण्याची गरज  १,४५९.४८ टीसीएम 
पावसाच्या पाण्यामुळे एकूण ३,१९८. ०६  टीसीएम अपधाव मिळतो. जलसंधारणाच्या पूर्वीच्या कामांमुळे अडविलेला अपधाव ९०७ टीसीएम, तर ‘जलयुक्त’अंतर्गत झालेल्या कामांमुळे ५५३.०५ टीसीएम अपधाव अडविण्यात आला. 

अशी झाली कामे, असा झाला पाणीसाठा 
अभियानांतर्गत कृषी विभाग, जलसंपदा विभाग (राज्य स्तर), जलसंपदा विभाग (स्थानिक स्तर), जिल्हा परिषदेचा लघू सिंचन विभाग आदी विभागांनी काम केले. यात ढाळीचे बांध, रिचार्ज शाफ्ट, शेततळी, नाला खोलीकरण, सिमेंट बंधारे आदी कामे झाली. 

कृषी विभागाने केलेली कामे - ६१ अनघड दगडी बांध, ५० अर्दन स्ट्रक्चर्स, दहा ठिकाणी ३७४  हेक्टरवर ढाळीचे बांध, तीन शेततळी, पाच साखळी सिमेंट बंधारे, दोन सिमेंट बंधारा दुरुस्ती, नाला खोलीकरणाची चार, तर तीन रिचार्ज शाफ्ट.  

करपरा नदीवर ११ साखळी सिमेंट बंधारे बांधण्यात आले. 

चारठाणा शिवारात एकूण १७ बंधांऱ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध होत आहे.

चार तलावांतील सहाहजार घनमीटर, तसेच दोन तलावांतील ४५ हजार २०० घनमीटर गाळ काढण्यात आला. त्यामुळे पाणी साठवण क्षमता वाढली. 

एकरा मोठ्या बंधाऱ्यांमध्ये १५ ते १९ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध होत आहे.

लोकसहभागातून खोलीकरण
लोकवर्गणीच्या माध्यमातून चार लाख रुपये, नाम फाउंडेशनकडून यंत्रसामग्रीसाठी तीन लाख रुपयांचे इंधन, शिर्डी येथील श्री साई संस्थानमार्फत दोन लाख रुपये निधी उपलब्ध झाला. यातून साडेतीन किलोमीटर नदीचे खोलीकरण केले. गावाने पाणी फाउंडेशन स्पर्धेतही भाग घेतला. 

पीकपद्धतीत बदल...
पूर्वी शिवारातील विहिरींना जेमतेम डिसेंबरपर्यंत पाणी टिके. आता साखळी सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा उपलब्ध होत आहे. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मार्च-एप्रिलपर्यंत पाणी उपलब्ध राहू लागले आहे. ज्वारी, गहू, हरभरा यांच्या सिंचनासाठी सोय झाली. हळद, भूईमूग, पेरू, सीताफळ, पपई, कांदा बीजोत्पादन, बटाटा भाजीपाला पिके शेतकरी घेत आहेत. रब्बी क्षेत्रात सुमारे ८०० ते एक हजार एकरांपर्यंत वाढ झाली आहे.

पूर्वी दरवर्षी उन्हाळ्यात महिलांना पाण्यासाठी दीड किलोमीटर भटकंती करावी लागे. शिरपूर पॅटर्नचे सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवारात जलसंधारणाची कामे झाली. पीक पद्धतीत बदल झाला आहे. लोकसहभागामुळे हे शक्य झाले.
- मीनाताई नानासाहेब राऊत, ९९२१०११२४२, जिल्हा परिषद सदस्या, चारठाणा.
 
साखळी बंधाऱ्यांमुळे शिवारातील विहिरींना पाणी राहू लागले आहे. आमदार विजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात विकासकामे घडत आहेत. 
- बी. जी. चव्हाण, ७७४४९११०१०, सरपंच, चारठाणा.

पूर्वी खरिपावरच समाधान मानावे लागे. आता तीन एकर हळद, दीड एकर पेरू, पपई, कांदा लागवड केली आहे. यंदा २७ दिवस पावसाचा खंड पडला. त्या वेळी सोयाबीनला संरक्षित पाणी दिले. एकरी नऊ क्विंटलपर्यंत उतारा मिळाला.
- गणेश राऊत, शेतकरी

पडीक जमिनीवर दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे तयार केले आहे. त्यात मत्स्यपालन सुरू केले आहे. मुरमाड जमिनीत ड्रॅगन फ्रूट घेतले आहे. हळद, बटाटा, भुईमूग, कांदा बीजोत्पादन घेत आहे.
- भारत तोडकर, शेतकरी

अॅग्रोवनचे नियमित वाचक आहोत. यशकथांमधून प्रेरणा मिळते. आता सिंचनाची सोय झाल्याने शेतकरी गटामार्फत पेरू, सीताफळाची लागवड करणार आहोत.
- कैलास राऊत, शेतकरी

गहू, ज्वारी, हरभरा घेणे शक्य झाल्याने उत्पन्नात वाढ होत आहे. 
- बाळासाहेब घाटुळ, शेतकरी
  
बंधाऱ्याच्या  काठी विहिरी असल्यामुळे रब्बीत भरपूर पाणी मिळते. रब्बीत हरभरा, वाटाणा घेत आहोत.
- उद्धव क्षीरसागर, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com