कपाशीतील करपा, मर रोग ओळखा

कपाशीतील करपा, मर रोग ओळखा

कपाशीमध्ये मर, कवडी, करपा, आकस्मित मर, दहिया या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो.

मर रोग
हा रोग जमिनीत राहणाऱ्या फ्युजारीयम बुरशीमुळे होता. रोगाचा प्रसार रोगट बियाण्यांद्वारे व दूषित जमिनीद्वारे होतो.
लक्षणे : सुरवातीस पाने पिवळे पडून, कोमेजतात आणि पानगळ होते, शेवटी संपूर्ण झाड वाळते.
नियंत्रण 
रोगप्रतिबंधक जातींचा वापर करावा. 
पिकाची फेरपालट करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास दीड ग्रॅम कार्बेनडाझिमची किंवा ३ ग्रॅम थायरमची प्रतिकिलो प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

कवडी (अॅन्थ्रॅकनोज)
हा रोग कोलेटोट्रीकम इन्डिकम बुरशीमुळे होतो. प्रसार दूषित व रोगट बियाणे तसेच जमिनीतील रोगट झाडांच्या अवशेषांपासून होतो. दुय्यम प्रसार बुरशीच्या बीजाणूद्वारे हवा व जमिनीतून होतो.  
लक्षणे : रोपाच्या सुरवातीच्या बीजदलावर गोलाकार तपकिरी ठिपके येतात. जमिनीलगतच्या कोवळ्या देठावर चट्टे येऊन रोपे मरतात. बोंडावर लहान, गोलाकार, काळपट-करड्या रंगाचे व किंचित खोलगट चट्टे पडतात. 
नियंत्रण 
शेतातील पाला पाचोळा, रोगट झाडे, फांद्या गोळा करून त्या नष्ट कराव्यात.
रोग दिसताच कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
 

लाल्या 
प्रारंभी पाने टोकाकडून व कडेने पिवळसर पडण्यास सुरवात होते. त्यानंतर पानामधील हरितद्रव्य नष्ट होऊन अँथेासायनिन नावाचे लाल रंगाचे द्रव्य जमा होते. त्यामुळे पाने लाल रंगाची दिसू लागतात. यासच लाल्या असे म्हटले जाते. लाल्या हा कपाशीतील रोग नसून प्रामुख्याने अन्नद्रव्यांची कमरता (त्यातही मुख्यत्वे नायट्रोजन व मॅग्नेशियम) व अन्य काही कारणांमुळे दिसून येणारा परिणाम आहे.
नियंत्रण 
शेतात पाणी साचल्यास त्वरीत चर काढून ते शेताबाहेर काढून द्यावे.
पावसाने बराच काळ उघडीप दिल्यास संरक्षित पाणी द्यावे.
खतांची मात्रा शिफारशीप्रमाणे द्यावी. त्यातही नत्राच्या मात्रा २ ते ३ वेळेस विभागून देणे अतिशय आवश्यक आहे.
पाते लागणे, बोंडे भरणे यांसारख्या महत्त्वाच्या वाढीच्या अवस्थेत २ ते ३ वेळेस २ टक्के युरिया किंवा डीएपीची फवारणी द्यावी.
लाल्याची लक्षणे दिसताच १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मॅग्नेशिअम सल्फेटच्या २ ते ३ फवारण्या द्याव्यात. किंवा २० ते ३० किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रतिहेक्टर या प्रमाणात जमिनीतून द्यावे.
रसशोषक किडी आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर आढळून आल्यास आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण करावे.

आकस्मिक मर (पॅरा विल्ट) 
लक्षणे : कपाशीच्या रोगग्रस्त झाडावरील पाने मलूल होतात. झाडातील ताठरपणा कमी होऊन झाड सुकू लागते. पाने पिवळी होतात व झाडावरील बोंडे जलद गतीने फुटून तशीच जलद वाळतात. 
नियंत्रण 
शेतात भेगा पडू देऊ नयेत.
जमेल तोपर्यंत कोळपण्या कराव्यात.
पाण्याचा ताण पडल्यास शक्य असल्यास संरक्षित पाणी द्यावे.
कपाशीचे शेत स्वच्छ ठेवावे.
रोगाची लक्षणे दिसताच २४ ते २८ तासांत कोबाल्ट क्लोराईड १० पीपीएमची फवारणी करावी.

पानांवरील अल्टरनेरियाचे ठिपके 
हा बुरशीजन्य रोग असून मुख्यत्वे करून पानांवर येतो. रोगाची बुरशी पालापाचोळ्यावर असते.ती पुढील हंगामातील पिकास रोग होण्यास कारणीभूत ठरते. दुय्यम प्रसार बुरशीच्या बीजाणूद्वारे हवेतून होतो.
नियंत्रण 
रोगाचा प्रादुर्भाव दिसताच पायरॅक्लोस्ट्राॅबीन (२० टक्के डब्ल्यूजी) १० ग्रॅम प्रति १०  लिटर पाणी किंवा मेटीराम ५५ टक्के अधिक पायरॅक्लोस्ट्राॅबीन ५ टक्के डब्ल्यूजी २० ते २३ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा कार्बेन्डाझिम ५० टक्के डब्ल्यूपी २५० ग्रॅम प्रति ७५० लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टर फवारणी करावी.
रोगाचा प्रादुर्भाव दिसताच कॉपर ऑक्सिक्लोराईड देखील २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारता येईल. 
 

करपा
झॅन्थोमोनास या जीवाणूमुळे होतो. रोगाचा प्रसार दूषित व रोगट बियाणे, शेतातील झाडांचे रोगट अवशेष यामुळे प्रथम होतो. तर दुय्यम प्रसार हवा, पावसाचे थेंब यांच्यामार्फत होतो.
लक्षणे : पानाच्या खालील बाजूस शिरांशेजारी प्रथम लहान, पानथळ हिरवे ठिपके दिसून येतात. असे ठिपके तांबूस होऊन पुढे काळसर होतात. कालांतराने हे ठिपके एकमेकांत मिसळून पाने करपल्यासारखे दिसू लागतात. पानांच्या कडा काळ्या पडून पाने गळून पडतात. बोंडावर कोनात्मक काळपट ठिपके दिसतात, रोगग्रस्त बोंड न उमलता त्यातील कापूस कवडीसारखा होऊन कपाशीची प्रत बिगडते.
नियंत्रण 
रोग दिसताच कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० टक्के) १२५० ग्रॅम व स्ट्रेप्टोमायसीन * ५० ग्रॅम (१०० पीपीएम) प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
किंवा सुडोमोनास फलुरोसन्स दोन टक्के द्रावणाच्या ३०, ६० व ९० दिवसांनी गरजेनुसार सल्ल्याने पुढील फवारण्या घ्याव्यात.

दहिया रोग (ग्रे मील्ड्यू) 
पीकवाढीच्या काळात रोग वाढण्यास सुरवात होते. रोगाच्या वाढीस आर्द्रतेची गरज असते. अनुकूल हवामानात पुढील वर्षाच्या पिकावर रोग येण्यास बुरशी कारणीभूत ठरते. रोगाचा दुय्यम प्रसार बुरशीच्या बीजांद्वारे हवेतून होतो.
नियंत्रण 
रोगट पालापाचोळा जमा करुन नष्ट करावा.
रोगाचा प्रादुर्भाव दिसताच ३०० पोताची गंधकाची भुकटी २० किलो प्रति हेक्टरी धुरळावी.
कार्बेन्डाझिम ०.१ टक्के तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी करावी. 

- डॉ. डी. पी. कुळधर, ७०८३९४९६७० (लेखक कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com