खरीप गेला...पण कर्जबाजारी करून गेला

खरीप गेला...पण कर्जबाजारी करून गेला

जालना जिल्ह्यात सुरवातीपासूनच सार्वत्रिक पाऊस नाही. तालुकानिहाय आकडे काही अंशी बरे दिसत असले तरी पिकाला पोषक असा पाऊस झालाच नाही. जालना, अंबड, घनसावंगी व बदनापूर या तालुक्‍यांतील खरिपाची स्थिती बिकट आहे. महिनाभरापेक्षा जास्त काळ पावसाने ओढ दिली आहे. मूग, सोयाबीन, मक्याचं जवळपास सर्वच, तर कपाशीचं मोठ नुकसान झालं. पाऊस आता आला तरी खरिपाला त्याचा फायदा होणार नसल्याचं शेतशिवारच सांगतात. त्यामुळे खरीप गेला, आता सारी आस रब्बीवरच आहे. 

कपाशीच्या पिकात नांगर
अंबड तालुक्‍यातील रोहिलागड, जामखेड शिवारातील खरीप संपल्यात जमा आहे. जामखेड शिवारात तर शेतकऱ्यांनी दुबार लागवड करूनही पावसाचा खंड ५० दिवसांपुढे गेल्यानं जमीन न सोडलेल्या कपाशीत शेतकऱ्यांनी नांगर घातला. पाऊस आला तरी कपाशीत काही हाती लागणार नाही. आता हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं निदान रब्बीची ज्वारी पेरून जनावरांना चारा अन् खायला चार दाणे तरी होतील अशी आशा आहे. रोहीलागड व जामखेड शिवारात जलसंधारणाची कामं बऱ्यापैकी झाली. परंतु ही सर्व कामे पाऊसच न पडल्याने मर्यादित राहिली.

खत जसंच्या तसं पडून
जामखेड शिवारातील शेतकऱ्यांनी उगवून आलेल्या कपाशीला देण्यासाठी खताची सोय केली होती. शिवारातील पैठण वाटेवरील शिवारात पाऊस आला तर जाता येणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी खतं शेतात नेऊन झाकून ठेवली. २५ जूनपासून बेपत्ता झालेला पाऊस १८ ऑगस्टपर्यंत गावशिवाराच्या काही भागात शिडकाव्यापलीकडे परतला नाही. त्यामुळे आणलेली खतं एकतर शेतकऱ्यांनी परत घरी नेली तर काहींची अजूनही शेतातच पडून होती. 

दुधाचा जोडधंदाही आला गोत्यात 
यंदा पाऊसकाळ चांगला सांगितल्यामुळे गेल्या वर्षी मालकीच्या अकरा जनावरांना जूनपर्यंत पुरेल एवढी चाऱ्याची सोय करून ठेवली होती. पण पावसानं सारं गणित बिघडविलं दीड महिना झाला चारा सपला. आता आठवड्याला दहा ते बारा हजाराचा ऊस वा चारा विकत घ्यावा लागतो. दुभत्या जनावराचा खुराक वेगळा. म्हशी पुरता चारा मिळत नसल्यानं कमी दूध देतात. त्यात लिटरला ४० रुपयांपुढे दर मिळत नाही. त्यामुळे सात एकर शेतीला केलेला दुधाचा जोडधंदाही गोत्यात आला असल्याचे अंबड   तालुक्‍यातील विठ्ठलवाडी येथील उमेश महाजन सांगत होते. 

मका गेला, ऊसही मोडण्याची वेळ
१३ एकर शेती असलेल्या जामखेडच्या भाऊसाहेब आसाराम जाधव यांना महिनाभरापासून विहिरीला पाणीच नसल्यानं डिसेंबरला काढणीला येणारा तीन एकर ऊस चारा म्हणून विकण्याची वेळ आली. पाण्याच्या सोयीसाठी त्यांनी चार बोअर घेतले, पण उपयोग झाला नाही. चार एकर मका, एक एकर मूग गुरांचा चारा म्हणूनच उपयोगात आला. उसातून किमान तीन- साडेतीन लाख मिळाले असते पण आता झालेला साठ हजार खर्चही निघेल की नाही, असा प्रश्न त्यांना पडला आहे. 

ठिबकचे अनुदानही रखडले
सरकारनं २०१३-१४ व २०१६-१७ मधल्या शेतकऱ्यांना ठिबकचं अनुदान दिलं. पण मी २०१५-१६ ला १ लाख ३७ हजार खर्चून ठिबक केलं. त्यासाठी कर्ज काढलं, पण सरकारनं जाहीर केलेलं अनुदान मिळालं नाही. मागच्याला दिलं पुढच्यालाबी दिलं मग मधल्या सालातल्या शेतकऱ्यांच्या अनुदानानं सरकारचं काय घोडं मारलं. कृषी विभागाला इचारलं तर ते सरकारकडून ज्या वर्षासाठी अनुदान आलं त्यांनाच आम्ही वाटप करतोय असं सांगतात. विहीर, मोटारपंप, पाइपलाइन, ठिबक, पीककर्ज आदी २०१४ मध्ये उचललेल्या सहा लाख कर्जाचा साडेआठ लाखांच्या आसपास बोजा झाल्याचं आता बॅंकेकडून कळलं. आता दीड लाखाची कर्जमाफी जाहीर केली. ती मिळण्यासाठी मला उर्वरित कर्जाची रक्‍कम भरावी लागलं ना, ती आणायची कुठून, पैसे असते त सरकारकडून अनुदानाची अपेक्षा केली असती का? जामखेडच्या रावसाहेब किसनराव जाधव या शेतकऱ्याचे हे प्रश्न आसमानी व सुलतानी संकटात शेतकरी कसा अडकतो या विषयी बरचं काही सांगून गेले. 

विमा कंपन्या म्हणतात कृषी विभागाशी संपर्क साधा

खरिपाची पिकं गेली. त्याचा विमा उतरविला असल्यानं आपण संबंधित क्रमांकावर विमा कंपनीशी संपर्क साधला. त्यांना पिकांची पाहणी, पंचनामे करण्याची विनंती केली तर त्या क्रमांकावरून आपल्याला कृषी विभागाशी संपर्क करण्याचा सल्ला मिळाला. कृषी विभागाला संपर्क केला, तर त्यांच्याकडून शासनाचा आदेश नाही, तुम्ही मागणी केली तर ती शासनाला कळवू असं उत्तर मिळाल्याची माहिती जामखेडचे शेतकरी रावसाहेब जाधव यांनी दिली. 

ग्रामसभेत दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव

स्वातंत्र्यदिनी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते सरसकट कर्जमाफी, खरिपाची नुकसानभरपाई, दुष्काळ जाहीर करावा आदी ठराव घेण्यात आल्याची माहिती जामखेडचे सरपंच प्रमोद तारडे व शेतकऱ्यांनी दिली. जवळपास साडेतीन हजार शेतकऱ्यांपैकी केवळ १२८ शेतकऱ्यांची यादी गावातील बॅंकेच्या शाखेत लागलीय. ऑनलाइन कर्जमाफी अर्ज भरण्याचा गोंधळ सुरूच आहे. सरकारला जी कर्जमाफी द्यायची त्यासाठी आमच्याकडून अर्ज भरून घेण्याची काय गरज. त्यात ऑनलाइनचे गोंधळ किती, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. 

दृष्टिक्षेपात पेरणी (हेक्टरमध्ये)

सरासरी क्षेत्र (ऊस वगळता)    ५ लाख ७९ हजार ३१०
प्रत्यक्ष झालेली पेरणी    ५ लाख ७१ हजार ७०६
पेरणीची टक्‍केवारी    ९८.६९ टक्‍के.

दोन वेळा लागवड करूनही कपाशी साधली नाही. आता पाणी येणार असा हवामानाचा अंदाज असल्यानं निदान जनावरांना चारा व खायला ज्वारी होईल म्हणून सात एकरांतील कपाशी मोडण्याचा निर्णय घेतला.
- सोमीनाथ नेमीनाथ जाधव, शेतकरी, जामखेड ता. अंबड. 

सव्वापाच एकरातील कपाशी दोन वेळा लागवड केल्यानंतरही मोडावी लागली. अंगावर पाच सहा लाख कर्ज झालंय. जमीन इकायला काढाव त त्याला बी गिऱ्हाईक नाही. अन्‌ ती इकाव त मग जगाव कसं.
- तुकाराम विश्वनाथ धुळे, शेतकरी, जामखेड, ता. अंबड

पाच एकर सरकी अन्‌ एक एकर बाजरी जळून गेली. आता पाणी आलं बी त उपयोग नायं. झालेला खर्चा बी वसूल होणार नाय. त्यामुळे खरीप गेला, पण कर्ज बाजारी करून गेला.
- संदीप राठोड, पिंपरखेड, ता. अंबड
 

पीकनिहाय झालेली पेरणी (हेक्‍टरमध्ये)
खरीप ज्वीर    २०७
बाजरी    १९४८३
मका    ५९८७८
तूर    ५३६८७
मूग    २९७९२
उडीद    ९९३०
भूईमूग    १२६१
तीळ    ३२२
कारळ    २०३
सोयाबीन    ११४७७२
कपाशी    २७८८८०

पाऊस आला तरी खरिपाला फारसा उपयोग नाही
कपाशीवरही नांगर फिरविण्याची वेळ
जामखेड शिवारात पावसाचा खंड ५० दिवसांपुढे
ठिबकच्या अनुदानापासूनही शेतकरी वंचित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com