मुळ्या वाळल्या; खरीपही वाया गेला

माणिक रासवे
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

हिंगोली जिल्ह्यातील स्थिती - '...तर गावं भिकेला लागलीच समजा'

हिंगोली जिल्ह्यातील स्थिती - '...तर गावं भिकेला लागलीच समजा'

यंदा सोयाबीनची पेरणी करत असतानाच तिफणीमाग धुराळा उडत होता. त्यानंतर दोन महिने पावसाचा पत्ता नव्हता. खांदेमळणीच्या आदल्या दिवशी वेळ चूकवून आलेला पाऊस दोन-तीन दिवस झाला. त्यामुळं मरगळेल सोयाबीन वरवर हिरव झाल्याचं दिसतयं; पण मुळ्या वाळून गेल्या आहेत. पिवळं होऊन पानगळ, फुलगळ होत आहे. बगर शेंगांचा सोयाबीन कापणी करायला देखील महाग आहे. खरीप वाया गेलेलाच आहे. भुरभुर पावसामुळे जमिनीचं पोट अजून भरलं नाही. येथून पुढे मोठा पाऊस पडून तळ भरलं तर रबीची फिकीर राहणार नाही. सगळीकडे आनंदी -आनंद होईल नाही, तर केळी, केळी तांडा, पारडी, येळी, हिवरखेडा ही गावं भिकाला लागलीच म्हणून समजा, असे चिंताजनक भाकित हिंगोली जिल्ह्यातील साळणा मंडळातील अनेक गावांतील शेतकरी वर्तवित आहेत.

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) तालुक्यातील साळणा मंडलामध्ये पेरणीनंतर शनिवार (ता.१९)पर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे वाटोळे झाले. पावसामुळे रस्त्याने जाणाऱ्यांना पिक हिरवी दिसत असल्यामुळे दुष्काळ दूर झाल्यासारख वाटतयं; परंतु जवळ जाऊन पिकांचे निरीक्षण केल्यानंतर फुलगळ झाल्याचे दिसते. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार आहे. 

साळणा मंडलातील केळी, केळी तांड, पार्डी, सावळी, येळी, साळणा, गोजेगाव आदी गावशिवारात माळारानाची दगड गोट्याची हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन आहे. हिवरखेडा, रामेश्वर, उंडेगाव, दौडगाव, उखळी, अनखळी, पोटा, पेरजाबाद, चिंचोली, नांदखेडा, एक बुरजी वाडी आदी गाव शिवारात मध्यम ते भारी जमीन आहे. कोरडवाहू क्षेत्रबहुल असलेल्या या मंडलातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. केळी तलावात पाणीसाठा उपलब्ध झाला, तर चार-पाच गावांतील शेतकऱ्यांना रबी हंगामात हरभरा, गहू आदी पिके घेता येतात. 
खरिपातील सोयाबीन, तूर, कापूस ही प्रमुख पिके आहेत. अनेक शेतकरी हळद उत्पादन घेत आहेत. सर्वच खरीप पिकांना पावसाचा मोठा ताण बसला. मूग, उडीद पिके जेमतेम १०-१५ टक्के हाती लागली आहेत. सोयाबीनची फुलगळ झाल्यामुळे शेंगा कमी लागल्या आहेत. जागीच वाळून गेलेल्या सोयाबीन पिकांच्या सांगाड्यांना पावसाचा काहीही उपयोग होणार नाही.

जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, हिंगोली तालुक्यातील अनेक मंडलांमध्ये पाण्याचा ताण बसलेली पिके वाळून गेली आहेत. सोयाबीनच्या उत्पादनात ५० ते ८० टक्के घट, हळदीमध्ये ३० ते ४० टक्के, कपाशीमध्ये २० ते ४० टक्के घट येण्याचा अंदाज आहे.

प्रकल्पांतील पाणीसाठा स्थिती
जिल्ह्यातील २७ लघुसिंचन तलावांपैकी बाभुळगाव तलाव उद्याप कोरडा आहे. पारोळा, वडद, चोरजवळा, हिरडी, हातगाव, सवना, वाळकी, सेंदुरसना, पुरजळ, केळी, कळमनुरी, देवधरी या तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा जमा झालेला नाही. बुधवारी (ता.२३) येलदरी धरणामध्ये ३.९४ टक्के, सिद्धेश्वर धरणात ८.५६ टक्के, इसापूर धरणामध्ये ५.५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती आहे.

पीककर्ज वाटप कासवगतीने
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात ८८५ कोटी २५ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. १८ आॅगस्टपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने २२,९४९ शेतकऱ्यांना ४५ कोटी १२ लाख ३० हजार रुपये (३३. १८ टक्के), राष्ट्रीयीकृत, व्यापारी बॅंकांनी ५,२०२ शेतकऱ्यांना ५६ कोटी १८ लाख रुपये (८.५७ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेने २,०६४ शेतकऱ्यांना १६ कोटी ५१ लाख असे एकूण ३० हजार २१५ शेतकऱ्यांना ११७ कोटी ८१ लाख ३० हजार रुपये (१३.३१ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.

शेतातील मजुरांना पिण्यासाठी ‘जार’चं पाणी
गेल्या वर्षी मुलीच्या लग्नात खर्च झाला. मुलगा इंजिनिअरिंगला आहे त्यालाही पैसे लागत आहेत. कपाशीतील शेंगा न लागलेला उडीद उपटून टाकावा लागला. तलाव कोरडाठाक आहे. विहिरींना शिपभरसुद्धा पाणी आलेल नाही. शेतकामांसाठी लावलेल्या मजुरांना पिण्यासाठी ‘जार’चं पाणी न्यावं लागत आहे, असे केळी येथील शेतकरी निवास सांगळे यांनी सांगितले.

कर्जमाफीचा लाभ या परिसरातील गावातील बोटावर मोजण्याएवढ्या शेतकऱ्यांनाच झाला आहे. दहा हजाराचं तातडी कर्जदेखील मिळालं नाही. बॅंकेत कर्जमाफीची विचारणा केल्यानंतर मॅनेजर अजून जीआर आला नसल्याचे दरडावून सांगत आहेत. टीव्हीवरच कर्जमाफी बघत बसा, असा सल्ला बँकेतील कर्मचारी देत आहेत. पाऊस पडला म्हणून कसा तरी पोळा साजरा झाला. नाहीतर पिकांत ढोर सोडायच काम होतं. सोयाबीनचे नुसते शेंडे हिरवे झालेत पण खाली फुलं, शेंगा नाहीत. सिद्धेश्वर धरण उशाला असून त्याचा उपयोग नाही.
- सतीश नागरे, पार्डी, ता. औंढा-नागनाथ. 

सोयाबीनच पेरलेल्या बियाणाएवढं उत्पादन निघणे मुश्किल आहे. तळ भरलं तर रब्बीत हरभरा, गहू घेता येईल.
-कैलास फड, शेतकरी, केळी, ता. औंढा नागनाथ.

गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. जनावरांना चारा नाही. पिकांचे पंचनामे करण्यासाठी अजून कोणीही फिरकलं नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे. सहाशे शेतकऱ्यांपैकी केवळ २ जणांना कर्जमाफीचा फायदा झाला.
- शिवाजी कावरे, सरपंच, केळी, ता. औंढा नागनाथ.

साडेनऊ एकर सोयाबीन-तुरीच्या पिकास पाण्याचा ताण बसलाय. यंदा गतवर्षीएवढ्या उत्पादनाची खात्री नाही. मजुरी, बियाणे, खतासाठी केलेल्या खर्चाची चिंता आहे.
- शिवाजीराव शिंदे-देशमुख, रामेश्वर, ता.औंढा नागनाथ.

एकरभर मूग होता. सात किलो मग झाले. तीन एकर सोयाबीनला फुलंही नाहीत शेंगा नाहीत.
- उत्तम गिते, हिवरखेडा, ता.औंढा नागनाथ.

आठ एकर हळद आहे. पावसाअभावी वाढ खुंटली आहे. आता २५ ते ३० टक्के उत्पादन घट येणार आहे. अजून पाऊस नाही आला, तर नुकसान वाढणार आहे.
- मधुकर सांगळे, येळी, ता.औंढा नागनाथ.

सोयाबीन सुकल्यानंतर पंचनाम्यासाठी विमा कंपनी तसेच कृषी विभागाच्या कर्माचाऱ्यास फोन केला; परंतु कुणीही दखल घेतली नाही. विहीर कोरडीठाक असल्यामुळे सोयाबीन वर कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी पाणी नाही.
- ज्ञानदेव गोरख, साळणा, ता.औंढा नागनाथ.

Web Title: agro news kharip loss by rain